वनामकृवित आयोजित खरीप पिक परिसंवादास मोठा प्रतिसाद
शेतकरी बांधवांचे कठोर परिश्रम, शासनाचे धोरण व कृषी तंत्रज्ञान यांच्या आधारे देश अन्नधान्यात आत्मनिर्भर झाला असुन अन्नपोषण सुरक्षा देशाचे लक्ष आहे. शेतकरी व शेतीचा विकास म्हणजेचे देशाचा विकास आहे. शेतकरी हा समाजाकरिता देवच असुन शेतकरी देवो भव: असे मी मानतो. परभणी कृषि विद्यापीठ निर्मित बियाणास शेतकरी बांधवाची मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठाचे बीजोत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. विद्यापीठाची गेल्या काही वर्षापासुन लागवडीखाली नसलेली एक हजार एकर जमीन लागवडी योग्य करण्यात आली आहे. या प्रक्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी, तुर आदी पिकांचे पैदासकार बियाणे उत्पादन घेतले जाणार आहे. परिणामी विद्यापीठाचे बीजोत्पादनात दुप्पट वाढ होईल. विद्यापीठात जलसंधारण व संरक्षित सिंचनाकरिता प्रक्षेत्रावर प्रत्येकी १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे सहा शेततळयाची निर्मिती केली जात आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप पिक परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर अहमदाबाद (गुजरात) येथील बन्सी गीर गोशाळेचे अध्यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कृषि अधिकारी श्री रवि हारणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, शेतीक्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाकरिता विद्यापीठ पुढाकार घेत असुन विद्यापीठ ड्रोन तंत्रज्ञान प्रसाराकरिता प्रयत्न करित आहे. ड्रोन स्कुल तसेच भाडेतत्वावरील ड्रोन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान शेतक-यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी संपुर्ण मराठवाडयात ड्रोन यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाडा विभागात कृषि यांत्रिकीकरणाकरिता विद्यापीठाने न्यु हॉलंड कंपनीशी सामंजस्य करार केला असुन यावर्षी दीड हजार शेतकज्यांना कृषी यंत्राचा कार्यक्षम वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यापीठाने टाफे कंपनीशी करार केला असुन याव्दारे परभणी येथे महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र स्थापन करून यांत्रिकीकरण व सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्याकरिता प्रयत्न केला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व संशोधनासाठी प्रयोगशाळांचे बळकटीकरण केले जात आहे. नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन विद्यापीठाचे २६ विद्यार्थी थायलंड, स्पेन येथे प्रशिक्षण घेऊन आले असुन जास्तीत जास्त विद्यार्थी व प्राध्यापकांना देश-विदेशात प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी जागतिक भरड धान्य वर्ष साजरे केले जात असुन भरड धान्य प्रसारात परभणी कृषि विद्यापीठाची भुमिका महत्वाची राहणार आहे, कारण परभणी विद्यापीठाने ‘परभणी शक्ती' हा ज्वारीचा देशातील पहिला जैव-संपृक्त वाण विकसित केला असुन बाजरा पिकांचे दोन वाण विकसित केले आहेत, यात लोह व जस्ताचे प्रमाण सर्वसाधारण वाणापेक्षा जास्त आहे, यामुळे हे वाण आरोग्यवर्धक अन्न म्हणुन वापर होऊ शकतो.
मुख्य अतिथी मा डॉ इंद्रजीत चौबे म्हणाले की, जगासमोर हवामान बदला हा मुख्य प्रश्न असुन नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरण पुरक तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता संशोधन करण्यात येत आहे. आरोग्यवर्धक अन्न निर्मितीवर भर दिला जात असुन डिजिटल तंत्रज्ञानाचा याकरिता उपयोग होणार आहे. परभणी कृषि विद्यापीठ या क्षेत्रात कार्यकरिता आहे, याकरिता अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठ सामजंस्य करार करून सहकार्य करणार आहे.
मा श्री गोपालभाई सुतारीया म्हणाले की, देशी बंसी गीर गोवंश आधारीत शेती केल्यास निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा लाभ होऊ शकतो. देशातील अनेक भागातील शेतकरी बांधवानी देशी गायीच्या शेण व मलमुत्रापासुन तयार केले गो-कृपा अमृत वापर करून मोठे उत्पादन घेतले आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने संपुर्ण सेंद्रीय शेतीच्या माध्यमातुन विषमुक्त अन्न निर्मिती केली पाहिजे. देशी गायी पासुन तयार केलेले पंचगव्यात अनेक उपयुक्त जीवाणुचे प्रमाण मोठया प्रमाण असते, हेच शेतमाल उत्पादन वाढीस मदत करतात, असे सांगुन देशी बंसी गीर गोवंश आधारीत शेतीबाबत सादरिकरण केले.
प्रास्ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी
विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण आणि विस्तार कार्याची माहिती देऊन पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार मुख्य शिक्षण विस्तार
अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. परिसंवादात विविध खरीप पीक लागवड, सोयाबीन, कापुस, ज्वारी, बाजरी, कडधान्य
लागवड, भरड धान्याचे महत्व, किड – रोग
व्यवस्थापन आदी डॉ गजानन गडदे, डॉ अरविंद
पंडागळे, डॉ प्रशांत पगार, डॉ प्रशांत
सोनटक्के, प्रा प्रितम भुतडा, प्रा अरूण
गुट्टे, डॉ दिगंबर पटाईत, आदींसह
इतर विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्या कृषी विषयक
विविध शंकाचे निरासरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ
लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती
मासिकांचे विमोचन करण्यात आले तसेच विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्यात
आले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे, अॅड मंचकराव
सोळंके, जनार्धन आवरगंड, महिला शेतकरी
श्रीमती सरिता बाराहाते, महिला शास्त्रज्ञ
डॉ स्मिता सोळंकी, ग्लोबल ट्रस्ट चे श्री वांगी दादा आदींंचा कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यापीठ बियाणे खरेदी व परिसंवादास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
प्रास्ताविक करतांना डॉ देवराव देवसरकर