शेतकऱ्यांमध्ये डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांना शास्त्रोक्त कृषी शिक्षण व अचूक तांत्रीक माहिती देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ, परभणी व ॲडराईज इंडिया यांच्या दिनांक १५ मे रोजी सामंजस्य करार करण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त व अधिकृत शिक्षण देणे हि काळाची गरज असून त्यासाठी विद्यापीठ कायमच अग्रेसर असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांनी केले. तंत्रज्ञानाच्या वापराने ‘वंदे किसान’ ह्या मोबाईल ॲप द्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या संधी पोहचवत त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवला जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी समर्पित विशेष प्रकल्प लवकरच राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती ॲडराईज इंडियाचे व्यवसाय प्रमुख श्री प्रसाद कुलकर्णी ह्यांनी दिली. यावेळी विस्तार संचालक डॉ. देवराव देवसरकर, विस्तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे उपस्थित होते.