महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, यांच्या प्रमुख उपस्थित ‘शासन आपल्या दारी’ हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक २७ ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास परभणी जिल्हयातील विविध शासकीय योजनेचे लाभार्थी शेतकरी, युवक, विद्यार्थी, ग्रामीण महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ तंत्रज्ञानावर आधारीत विशेष दालन लावण्यात आले होते. विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या बैलचलित कृषी अवजारांची माननीय मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहणी केली, यावेळी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाबाबत माहिती देऊन ड्रोन व आधुनिक तंत्रज्ञान विकास व प्रसारावर विद्यापीठाचा भर असल्याचे सांगितले. कृषि अभियंत्या डॉ स्मिता सोळंकी यांनी बैलचलित कृषी अवजारांची माहिती दिली.
कृषि दालनात विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाणाचे पिक नमुने, ड्रोन्स, स्वयंचलित अवजारे, बैलचलित व ट्रक्टर चलित अवजारे, रेशीम उद्योग, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा समावेश होता. कार्यक्रमानिमित्त आलेल्या शेतकरी बांधव आणि महिला शेतकरी यांनी विद्यापीठाच्या दालनास भेटी देऊन माहिती घेतली, यावेळी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध लाभार्थींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच माननीय कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या ही हस्ते उल्लेखनिय कार्य केलेल्या सरपंच आणि पोलिस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.