Thursday, June 13, 2024

वनामकृविचा माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या अभिनव उपक्रमाद्वारे शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 सेंद्रिय शेतीमधील संधीचा लाभ घ्यावा ..... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा अभिनव उपक्रम दिनांक १२ जून संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात आला. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण १६ चमूमधिल ४७ शास्त्रज्ञांनी आणि सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ५६३ शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण केले.
या उपक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि कै. संभाजीराव पवार शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती व सेंद्रिय आंबा लागवड यातील संधी व आव्हाने या विषयावर मौजे मुगाव, ता. नायगाव, जिल्हा नांदेड येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बऱ्हाटे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पुनमताई पवार, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी.आर. देशमुख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की शाश्वत शेती उद्योगासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून यामध्ये ड्रोन-तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने सामावेश करावा लागेल तसेच रासायनिक खते व औषधीचा अतिरिक्त वापर टाळावा. याबरोबरच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा व खर्चामध्ये बचत करावी आणि सेंद्रिय शेती द्वारे उत्पादित फळे, भाजीपाला व अन्नधान्य यांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे यामुळे या संधीचा लाभ मिळवून आर्थिक उन्नती साधावी असे नमूद केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पुनमताई राजेशजी पवार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व विशद करून रासायनिक निविष्ठा यांचा मर्यादित वापर करून जमीन सदृढ ठेवण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यापीठातील चमूने श्री.राजेश फत्ते यांच्या शेतात प्रक्षेत्र भेट दिली. भेटी दरम्यान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी खरीप पिक लागवडीचे योग्य नियोजन आणि अवलंबनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली. याबरोबरच सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रिय शेतीमधील विविध संधी आणि आव्हाने व त्यावरील उपाय सांगितले तर उद्यानविद्या तज्ञ डॉ. बी एम कलालबंडी यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून फळबागेचे नियोजन व फळबागेसाठी जमिनीची निवड याबाबत माहिती दिली आणि मृदशास्त्र विभागाचे डॉ. सुदाम शिराळे यांनी जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. याबरोबरच डॉ. अरविंद पंडागळे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि प्रा. अरुण गुट्टे सोयाबीन लागवडीबाबत प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच परभणी जिल्यातील असोला येथे विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठाचे मुख्य रावे समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, डॉ. गणपत कोटे, डॉ. प्रवीण कापसे आणि डॉ. अनुराधा लाड यांनी सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम राबविला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुढेही सहा महिने विद्यापीठाच्या सर्व कृषि महाविद्यालयातील सातव्या सत्रातील ग्रामीण जागुरुकता कार्यानुभव कार्यक्रमाचे विद्यार्थी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात त्यांना दिलेल्या गावात राहून त्यांच्या संपर्क शेतकऱ्याना आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार असुन ग्रामीण भागाचा आणि शेती कार्याचा अनुभव घेणार आहेत.