मराठवाडाच्या कृषि विकासासाठी शिफारशी उपयुक्त .... माननीय
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची ५२ वी बैठक दिनांक ७ ते ९ जून दरम्यान अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीमध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या भाजीपाला पिकांमध्ये भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) आणि फळ पिकामध्ये केळीचा वनामकृवि - एम ३ या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहार, पशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता देण्यात आली.
मराठवाड्यातील वातावरण आणि सामाजिक परिस्थिती विचारात घेवून शिफारशी विकसित केल्या जातात म्हणून या शिफाराशीद्वारे मराठवाड्यांच्या कृषि विकासास चालना मिळणार असून शेती उत्पादने मूल्यवर्धित करून पोषण आहार निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत असे प्रतिपादन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
वाणाप्रसारामधील भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) हा वाण अधिक उत्पादन देणारा असून खरीप हंगामात लागवडीसाठी मराठवाडा विभागात प्रसारित करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच केळीच्या उत्परिवर्तीत पैदास पद्धतीने विकसित केलेला कमी कालावधी, मध्यम उंची, चांगले उत्पादन आणि तसेच उभे पाने असलेला वनामकृवि - एम ३ या केळीच्या वाणाची मराठवाडा विभागात लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
याबरोबरच शिफारशी मध्ये कृषि विद्या विभागाच्या ८, उद्यानविद्या विभागाची १, पीक संरक्षणच्या ७, पशुविज्ञानची १, कृषि अभियांत्रिकीच्या ७, अन्न तंत्रज्ञानाच्या ११, सामुदायिक विज्ञानच्या ४, मृद विज्ञानच्या २, कृषि विस्तार शिक्षणच्या -३, कृषि अर्थशास्त्राच्या ४ अशा एकूण ४८ शिफारशीना मान्यता मिळालेली आहे. यासाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली संशोधक संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, बिजोत्पादन संचालक, डॉ देवराव देवसरकर, यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञाना मार्गदर्शन केले.