वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे
आभिनव उपक्रम
नवीन शैक्षणिक धोरणात (२०२०) पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेशही शालेय
अभ्यासक्रमात करण्यात आला असून ३ ते ८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पायाभूत
साक्षरता व संख्याज्ञान यावर अधिक भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने या धोरणाची यशस्वीरित्या
अंमलबजावणी करण्यासाठी तसेच याविषयी शिक्षक व पालकांना जागरुक करण्याकरिता वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातीच्या मानव
विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातर्फे पूर्व प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे
आयोजन करण्यात आले. सदरील प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी
म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक मा. डॉ. उदय खोडके उपस्थित होते. सामुदायिक
विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास
विभागातील डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव यांची व्यासपीठावर
उपस्थिती होती.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणाविषयी पूर्व प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्याकरिता या कार्यक्रमाचे
आयोजन उचीत वेळी केल्याबद्दल डॉ. उदय खोडके आयोजकांचे अभिनंदन केले. लहान बालकांना
घडवणे हे अतिशय जिकरीचे कार्य असून त्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षकांनी त्यांचे
संपुर्णपणे योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना व्यक्त केले. तद्वतच सर्व सहभागी प्रशिक्षणार्थिनींना प्रमाणपत्रे प्रदान
करुन त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी
शिक्षकांना अवगत करुन बालकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उद्युक्त करण्याकरिता
हे प्रशिक्षण घेण्यात आले असे या प्रशिक्षणाच्या आयोजिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया
बंगाळे, यांनी आपल्या
प्रास्ताविकात विशद केले. दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण देत असतांना
विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान साध्य करुन देण्यासाठी विविध
अध्यापन पध्दती, कार्ये, शैक्षणिक
साहित्य, चैतन्यदायी शालेय वातावरण निर्मिती बालकांच्या
मूल्यांकनाच्या पध्दती आदी बाबींचा समावेश या प्रशिक्षणामध्ये करण्यात आल्याचे
त्यांनी यावेळी नमुद केले. यावेळी श्रीमती अमृता काळे, श्रीमती
शोभा वाघमारे, श्रीमती दिपाली औरातकर या प्रशिक्षणार्थींनी
आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूचत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन डॉ. वीणा
भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. प्रियंका स्वामी,
प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षिका, मदतनीस व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.