अभ्यासदौर्यात वनामकृविचे माननीय कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांचा सक्रीय सहभाग व सादरीकरण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जर्मनचे आतंरराष्ट्रीय संस्था - जीआयझेड, सन
सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामकृवि यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ॲग्री-फोटोव्होल्टेईक
तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ
ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ॲग्री-फोटोव्होल्टेईक
तंत्रज्ञान जर्मनी, जपान, इटली
या प्रगत देशात प्रचलित होत असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतजमिनीवर सौर
ऊर्जा निर्मिती आणि पिक लागवड हे दोन्ही बाबी शक्य होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर एका उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळाचा जर्मनीतील अॅग्रीव्होल्टेईक्स प्रकल्प भेटीचा अभ्यासदौरा दिनांक २९ जुन ते ५ जुलै दरम्यान पार पडला. या दौर्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी सहभाग नोदवुन विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. अॅग्रीव्होल्टेईक्स तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत-जर्मनी सहकार्याला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असुन या दौर्याच्या निमित्ताने शिष्टमंडळाने फ्रायबुर्ग, जर्मनी येथे आयोजित "अॅग्रीव्होल्टेईक्स वर्ल्ड कॉन्फरन्स २०२५" मध्ये सहभाग घेतला. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅग्रीव्होल्टेईक्स तंत्रज्ञानावर चालु असलेले विविध देशातील संशोधन व प्रकल्पांचे सादरीकरण तज्ञांनी केले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी परभणी कृषि विद्यापीठात कार्यरत अॅग्रीव्होल्टेईक्स संशोधन प्रकल्पातील उपलब्धीचे सादरीकरण केले. तसेच भारतातील अॅग्रीपीव्ही प्रकल्पांसाठी व्यवसाय मॉडेल्स यावर चर्चा झाली. यावेळी जर्मनीतील कृषी, पर्यावरण आणि ऊर्जा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व तज्ञांशी संवाद साधण्यात आला. शिष्टमंडळाने नेक्स्ट टू सन ए.जी. या कंपनीचा ३.५ मेगावॅट क्षमतेचा उभा अॅग्रीपीव्ही प्रकल्पाची पाहणी केली, जो बॅटरी संचयनासह ९० टक्के शेती कार्यक्षमतेस टिकवून ठेवतो. याशिवाय पारंपरिक फळबाग शेतीत तीन वेगवेगळ्या अॅग्रीपीव्ही तंत्रज्ञानांची अंमलबजावणी करणाऱ्या फळबाग वोल्मर या प्रकल्पाची देखील पाहणी केली. दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भारत-जर्मनी गोलमेज परिषदेत दोन्ही देशांतील धोरणकर्ते, संशोधक, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि वित्तीय संस्थांनी अॅग्रीव्होल्टेईक्स संदर्भातील धोरणात्मक बाबींवर सखोल विचारविनिमय केला. पुढील वर्षी २०२६ मध्ये अॅग्रीव्होल्टेईक्स तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असुन या दौ-यामुळे अॅग्रीव्होल्टेईक्स तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही देशांतील संयुक्त सहकार्याचा पुढचा टप्पा निश्चित झाला आहे.