Wednesday, July 9, 2025

वनामकृवि विकसित सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कापसाच्या दोन सरळ वाणांची सघन लागवडीसाठी शिफारस

 वाण विकासासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन लाभले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ या दोन बीजी २ सरळ वाणांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत केंद्रीय वाण निवड समितीच्या दिनांक १९.०६.२०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत, मध्य भारत विभागातील महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

या संशोधनामागे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन लाभले असून, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांचे मोलाचे योगदान आहे. एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ हे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बीजी २ तंत्रज्ञानाचे पहिलेच सरळ वाण असून, सघन लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहेत. हे वाण सरळ स्वरूपाचे असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः उत्पादित बियाणे पुढील दोन ते तीन वर्षे वापरता येईल, त्यामुळे बियाण्यावरील खर्चात मोठी बचत होऊ शकते, असे या वाणाच्या विकासातील प्रमुख शास्त्रज्ञ यांनी सांगितले.

या वाणांच्या विकासामध्ये कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, सहयोगी पैदासकार डॉ. विजयकुमार चिंचाणे, सहायक पैदासकार डॉ. अरुण गायकवाड तसेच कापूस संशोधन केंद्रातील इतर वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

या उल्लेखनीय संशोधनासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

वाणांची वैशिष्ट्ये

एनएच २२०३७ बीटी बीजी २

एनएच २२०३७ बीटी बीजी २ हा वाणही सघन लागवडीस योग्य असून त्याची उंची ९० ते ९५ सेमी आहे. याच्या धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी असून धाग्याची मजबूती व तलमपणा विशेषतः चांगला आहे. बोंडाचे वजन ४.५ ते ४.७ ग्रॅम असूनहा वाण देखील रसशोषक कीड व विविध रोगांपासून सहनशील आहे.

एनएच २२०३८ बीटी बीजी २

एनएच २२०३८ बीटी बीजी २ हा वाण सुमारे १६० ते १७० दिवसात तयार होतो व प्रती हेक्टर १८ ते १९ क्विंटल उत्पादन देतो. सघन लागवडीसाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. या वाणाच्या धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी असून धाग्याची मजबूती २८ ते २९ ग्रॅम/टेक्स आहे. बोंडाचे वजन ४.८ ते ५.० ग्रॅम आहे. तसेच हा वाण रसशोषक कीड, जिवाणूजन्य करपा व पानावरील ठिपक्यांच्या रोगास सहनशील आहे.


एनएच २२०३७ बीटी बीजी २


एनएच २२०३८ बीटी बीजी २