Tuesday, July 1, 2025

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना वनामकृवित अभिवादन; कृषिदिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या हस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात हरितक्रांतीला चालना देऊन महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. सिंचन, खते, बियाणे यांचा प्रसार करून कृषि उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणली. त्यांनी १९७२ साली महाराष्ट्रात विभागनिहाय चार कृषि विद्यापीठांची स्थापना करून कृषि शिक्षणास मोठी चालना दिली.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असून त्यांनी राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी अनेक दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. शेतकरी कल्याणकारी योजना, सहकारी संस्थांचा विकास तसेच कृषि आधारित उद्योगांना चालना दिली. त्यांनी ज्वार या पिकाच्या संशोधनात विशेष लक्ष दिले.

या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ राहुल रामटेके, प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील रावे उपक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना, कृषि महाविद्यालय परभणी यांच्या वतीने शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.