***************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे
राबविण्यात आलेल्या रब्बी ज्वारीच्या उत्पादनवाढीच्या प्रकल्प अर्थात होप
प्रकल्पाला ‘आऊट स्टॅडींग पार्टनरशिप अवार्ड – आशिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हैद्राबाद येथे दि १२ डिसेंबर
रोजी पार पडलेल्या इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रमात
हा पुरस्कार विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर व ज्वार संशोधन
केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्हि काळपांडे यांनी स्वीकारला. या वेळी
इक्रिसॅट हैद्राबादचे महासंचालक डॉ विल्यम डर, संचालक डॉ स्टेफानिया ग्रॅन्डो,
डॉ अशोक कुमार, डॉ रविंद्र रेड्डी यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ
उपस्थित हेाते.
आगामी काळातील
अन्नसुरक्षा, जनावरांसाठी पौष्टिक चा-याचा प्रश्न लक्षात घेता ज्वारीची उत्पादकता
वाढविणे आवश्यक आहे. यासाठी सन २००९ पासुन मराठवाडयातील परभणी, बीड, जालना जिल्हयांत
‘बिल मिलींडा गेट फाऊंडेशन’ च्या आर्थिक साहयाने
इक्रिसॅट, हैद्राबाद मार्फत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत होप प्रकल्प (रब्बी ज्वारी उत्पाकता वाढीचा प्रकल्प)
राबविला जात आहे.
मागील पाच
वर्षात या प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठवाडयातील सुमारे २११९० शेतक-यांमार्फत
रब्बी ज्वारीच्या सुधारित जाती व लागवड तंत्रज्ञान पोचविण्यात आले. मागील पाच
वर्षातील रब्बी ज्वारी धान्य व कडबा उत्पादनाची सरासरी पाहता सुधारित
जातीपासुन स्थानिक जातीपेक्षा सरासरी ४० टक्के जास्त धान्य उत्पादन तर २३ टक्के
जास्त कडब्याचे उत्पादन वाढले तसेच चा-याची गुणवत्ता वाढली. त्याचा जनावरांचे
आरोग्य व दुग्धोत्पादन वाढीसाठी फायदा झाला असुन प्रकल्पामार्फत देण्यात
येणा-या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अनेक शेतक-यांनी रब्बी ज्वारीचे दर्जेदार उत्पादन
मिळविले.
हा प्रकल्प
राबविण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु, संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्पाच्या पाच वर्षाच्या
कालावधीत माजी संशोधन संचालक डॉ एस टी बोरीकर यांनी इक्रिसॅटचे सल्लागार या नात्याने
वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी ज्वार संशोधन केंद्राचे
माजी प्रभारी अधिकारी डॉ एस एस अंबेकर, डॉ एस पी म्हेत्रे, सध्याचे प्रभारी अधिकारी
डॉ एच व्हि काळपांडे, उपसमन्वयक प्रा अंबिका मोरे, प्रा सचिन मोरे, प्रा रणजित
चव्हाण, आर एल औढेंकर व प्रकल्पातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.