मातीशिवाय कमी पाण्यात पौष्टिक मक्याचा हिरवा चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक
सध्याची पीक परिस्थिती व कमी झालेले पर्जन्यमान
लक्षात घेता येत्या काळात जनावरांसाठी चा-याची कमतरता भासणार आहे, ही बाब लक्षात
घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गंत असलेल्या औरंगाबाद येथील कृषि
विज्ञान केंद्रात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून कमी पाण्यात, कमी जागेत व
कमी खर्चात अधिक पौष्टीक मक्याचा हिरवा चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक प्रकल्प
राबविण्यात येत आहे. सदरील प्रकल्पास विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल व
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी नुकतीच भेट दिली. प्रकल्पाबाबत कृषि विज्ञान
केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ एस बी पवार व पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विषय
विशेषज्ञ प्रा विजय जाधव यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशनराव
लवांडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी बी चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक
शामराव सोळुंके, उपसंचालक सतीश शिरडकर, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे तांत्रिक
सल्लागार बबनराव कापसे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रा दिप्ती पाटगांवकर, डॉ के के
झाडे, डॉ एन डी देशमुख व आत्मा औरंगाबादचे कर्मचारी उपस्थित होते. सदरील शेतक-यांना
हिरवा चारा तयार करण्यास लागणार खर्चात अधिक कपात कशी करता येईल यावर संशोधन करून
आवश्यकते बदल या तंत्रज्ञानात करण्याचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल
यांनी सुचविले.
हायड्रोपोनिक्स
तंत्रज्ञान प्रकल्पाबाबत कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ एस बी
पवार म्हणाले की, 10 ते 11 दिवसांत केवळ मक्याचे बियाणे, ट्रे, पाणी योग्य व्यवस्थापनाचा
वापर करून एक किलो बियाण्यापासुन 4 ते 5 किलोग्रॅम हिरवा पौष्टिक चारा मिळु शकतो. अशाप्रकारे चारा तयार करण्यासाठी गहु, मका, बार्ली, मोट या तृणधान्याचा वापर
करता येतो. हा चारा जनावरांच्या दररोजच्या आहारासोबत वापरून काही प्रमाणात
हिरव्या चा-याची गरज भागविल्या जाऊ शकते. हिरवा चारा विकत घेण्यापेक्षा
तुलनात्मकदृष्टया या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेला चारा कमी
खर्चात उपलब्ध होणार आहे.
|
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विषय विशेषज्ञ प्रा
विजय जाधव हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रकल्पाबाबत म्हणाले की, हायड्रोपोनिक्स
म्हणजे मातीशिवाय किंवा जमिनीशिवाय वनस्पती वाढविणे, बियाणास आर्द्रता, पाणी,
अन्नद्रव्ये देऊन मातीशिवाय वाढ केली जाते. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत, कमी
पाण्यात, कमी कालावधीत अधिक पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होतो. प्रथम तृणधान्य
12 तास मोड आणण्यासाठी पाण्यात भिजत ठेऊन पाणी काढुन ते धान्य गोणीत 24 ते 36
तास दाबुन ठेवावे. या कालावधीत मोड येण्यास
सुरूवात होते. मोड आलेले बियाणे, प्लॉस्टिक ट्रे मध्ये पसरून लाकडी मांडणीवर
ठेवावे. त्यावर दर दोन तासांनी पाणी फवारावे. यामुळे पीक वाढीसाठी आवश्यक
आर्द्रता, ओलावा ठेवला जातो. प्लॉस्टिक रॅकमध्ये 8 ते 10 दिवसात 20 ते 30 सेमी
उंचीचे हिरवे पिक तयार होते. हे तयार झालेले पिक जनावरांना मुळांसकट खाऊ घालावे.
एक किलो धान्यापासुन 5 ते 6 किलो हिरवा चारा 8 ते 10 दिवसात उपलब्ध होतो. तसेच
या चा-यात धान्याच्या तुलनेत 2 ते 2.5 पट अधिक प्रथिने व इत्र पौष्टीक घटक
असतात. या पध्दतीने वर्षभर हिरवा पौष्टीक चारा जनावरांसाठी तयार करता येतो. हायड्रोपोनिक्स
तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे म्हणजे दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळयात
हिरव्या चा-याची उपलब्धता होते. कमी कालावधीत अधिक पोषणमुल्य असलेल्या चारा
उपलब्ध होतो. या पध्दतीने वर्षभर हिरव्या चा-याचे उत्पादन घेता येते. दुष्काळी
परिस्थितीत शेतक-यांना भेडसावणारा वैरणाचा प्रश्न गंभीर बनत असुन हायड्रोपोनिक्स
तसेच शेतातील पिकांच्या टाकाऊ पदार्थापासुन (सोयाबीन, मका, ज्वारी व बाजरीचे कुटार आदीं)
प्रक्रिया करून पौष्टीक खाद्य बनविण्याचे प्रात्यक्षिक कृषि विज्ञान केंद्रामार्फत
देण्यात येणार आहे.
|
सौजन्य
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद