अखिल भारतीय समन्वीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्पातर्फे आयोजित शेतकरी
मेळाव्यात प्रतिपादन
बदलत्या हवामानामुळे शेतक-यांपुढे अनेक समस्या निर्माण होत असुन शेतक-यांनी कोरडवाहु
शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी विद्यापीठ विकसीत कमी खर्चाचे तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
एक पीक पध्दतीपेक्षा आंतरपीक पध्दतीमुळे शेतीत जोखीम कमी होईल. असे प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी
केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत कोरडवाहु शेती
संशोधन प्रकल्पातर्फे हवामान बदलानुरूप राष्ट्रीय उपक्रमार्तंगत खरीप पुर्व नियोजन
व शेतकरी मेळाव्याचे दि 16 जुन रोजी आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून
ते बोलत होते. हवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान व किफायतशीर
कोरडवाहु शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा यादृष्टीने या मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर,
कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, मुख्यशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही.
असेवार, प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठलराव पारधे, श्री. ज्ञानोबा पारधे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले
की, सोयाबीन पीकामध्ये शक्यतो रूंद वरंबा व सरी पध्दतीने पेरणी करावी, एकात्मिक
अन्नद्रव्य व्यवस्थापन करून योग्य खतांची मात्रा पिकांना दयावी, जेणे करून
अनावश्यक खतांवरील खर्च कमी करता येईल.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्या
भाषणात म्हणाले की, शेतक-यांनी विहीर व कुपनलीका पुर्नभरण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,
मुख्य पीकासोबतच बांधावर देखील शेवगा, कडीपत्ता याचे पीक घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत
वाढवावेत असा सल्ला दिला. कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी पीकांना संरक्षीत सिंचनाची
सोय करावी जेणे करून पाऊसाचा खंड पडल्यास त्याचा उपयोग करता येईल असे सांगितले. प्राचार्य
डॉ. धर्मराज गोखले यांनी कोरडवाहु शेतीमध्ये शेतकरी बांधवांनी पेरणीची योग्य वेळ
व योग्य पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
याप्रंसगी विद्यापीठ विकसीत सोयाबीन, तुर, मुग,
उडीद आदी पिकांच्या बियाण्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री ज्ञानोबा पारधे यांचा प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण
यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरडवाहु शेती संशोधन केंद्रातर्फे सलग तिस-या
वर्षी हा उपक्रम परभणी तालुक्यातील बाभळगांव येथे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे
शेतक-यांना लाभ होत असल्याचे शेतकरी श्री गिरीष पारधे व श्री बाबाराव पारधे यांनी
मनोगत सांगितले. मुख्य शास्त्रज्ञ डॉ. बी.व्ही. आसेवार यांनी प्रास्ताविकात योजनेची
उदिष्टे सांगुन शेतक-यांच्या गरजेनुसार संशोधन कार्याबाबत व कोरडवाहु शेतीसाठी
एकात्मिक शेती पध्दती मॉडेल बाबत माहिती दिली.
तांत्रिक सत्रात प्रा. मदन पेंडके यांनी विहीर व
कुपनलिका पुर्नभरण तर डॉ. आनंद गोरे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान यावर माहिती दिली.
कार्यक्रमास विविध संशोधन योजनांचे प्रमुख, प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी, शेतकरी
विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे
तर आभार प्रदर्शन मृदाशास्त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
डॉ. मेघा सुर्यवंशी, श्रीमती सारीका नारळे, माणीक समीद्रे, सय्यद जावेद, सुनिल चोपडे, भंडारे, चतुर कटारे आदींनी
परिश्रम घेतले.