Thursday, June 11, 2015

वनामकृविच्‍या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेस पुरस्‍काराचे तिहेरी मुकुट

राज्‍याचे उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना श्री विनोद तावडे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार स्‍वीकारतांना प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रा रविंद्र शिंदे, प्रा संजय पवार सोबत कुलगुरू मा डॉ तुकाराम मोरे.
...................................
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेस महाराष्‍ट्र शासनाचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा  पुरस्कार, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार तर विद्यार्थी रमाकांत कारेगांवकर यास उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवडी झाली होती. दि. ०८ जुन रोजी मुंबई येथील शाहीर अमरशेख सभागृहात एका सोहळयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा ना श्री विनोद तावडे यांच्या हस्ते हे पुरस्‍कार प्रदान करण्यात आले. प्राचार्य डॉ. उदय खोडके, कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे व प्रा संजय पवार यांनी हे पुरस्‍कार स्‍वीकारले. यावेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. तुकाराम मोरे व रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषि अभियांत्रिकी महाविद्यालाने राष्‍ट्रीय सेवा योजनेंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम यशस्‍वीपणे राबविली यात परिसर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, अंधश्रध्‍दा निर्मुलन, गाजरगवत निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, इंधन बचत, शेतीविषयक नवनवीन तंत्र, औजारांच्या वापराबाबत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन समावेश असुन यावर्षी शेतकरी बांधवाना दुष्‍काळ परिस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी विद्यापीठातर्फे राबविण्‍यात येत असलेल्‍या ‘उमेद’ कार्यक्रमांतर्गत या रासेयोने पथनाटय व प्रभातफेरीच्‍या माध्‍यमातुन विशेष कार्य केले, यासर्व बाबींची दखल घेत, नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी राज्यस्तरीय निवड समितीच्या शिफारसीनुसार ही निवड करण्‍यात आली.
या यशाबद्दल कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू, खासदार मा श्री संजय जाधव, आमदार मा डॉ. राहुल पाटील, आमदार मा श्री विक्रम काळे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार मा श्री सतीश चव्हाण, मा. श्री रवींद्र पतंगे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींनी अभिनंदन केले.