कावलगांवच्या शेतक-यांनी समाजापुढे ठेवला आदर्श
पुर्णा तालुक्यातील कावलगांवचे शेतकरी शिवाजीराव पिसाळ यांच्या मातोश्री कै
गिरजाबाई केरबाजी पिसाळ यांच्या गोडजेवनाचा कार्यक्रम दि १७ जुन रोजी होता.
यानिमित्त भजन व किर्तनाचा कार्यक्रम न ठेवता, गांवातील शेतक-यांचे कृषि
तंत्रज्ञानाबाबत प्रबोधन व्हावे म्हणुन शेतकरी मेळावयाचे आयोजन करण्यात आले. यात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ यु एन
आळसे यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध
कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन मारोतराव पिसाळ होते तर शिवसांब देशमुख, सरपंच
शंकररावजी पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या नाविण्यपुर्ण उपक्रमाचे
परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ यु
एन आळसे म्हणाले की, शेतक-यांनी शेती पुरक व्यवसाय म्हणुन प्रत्येक दोन संकरित
गाईची जोपासना करावी जेणे करून शेतीला सेंद्रिय खत, मुलांना दुध व रोज खर्चास
पैसाची तरतुद होऊन शेतक-यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. तसेच आंतरपिक पध्दतीचा
अवलंब करून शेतीत शाश्वतता निर्माण करावी व कापुस लागवड करतांना नॉन बीटीच्या बियांची
सभोवताली लागवड करून पर्यावरणाचे संतुलन राखावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाषराव पिसाळ यांनी केले. या नाविण्यपुर्ण उपक्रमाच्या
माध्यमातुन समाजापुढे एक आदर्श ठेवल्याबाबत शिवाजीराव पिसाळ व डॉ यु एन आळसे
यांचे परिसरांतील शेतक-यांनी कौतुक केले.