Thursday, October 1, 2015

शेतक-यांनी जमिनीचा प्रकार व जमिनीतील ओलावा विचारत घेऊन पिकांची निवड करावी..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृविचा "विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमास पुनश्‍च: प्रारंभ


गेल्‍या काही वर्षात मराठवाडयातील पिक पध्‍दतीत अनेक बदल झाले कडधान्‍य, दालवर्गीय पिकांचे क्षेत्रात घट होऊन सोयाबीन व कापसाचे क्षेत्रात वाढ झाली आहे, या पिक पध्‍दतीत साठ टक्‍के पाण्‍याची गरज वाढली असुन पाऊसात खंड पडल्‍यास मोठे नुकसान होत आहे. शेतक-यांनी जमिनीचा प्रकार व जमिनीतील ओलावा विचारत घेऊन पिकांची निवड करावी तरच होणारे संभाव्‍य नुकसान टाळता येईल. विद्यापीठाकडे मर्यादीत मनुष्‍यबळ असुनही विद्यापीठ आपल्‍या दारी उपक्रम राबवित असुन यात रबी हंगामाचे नियोजन व पिक संरक्षणावर भर देण्‍यात येणार असुन शेतक-यांना याचा निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.  
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने परभणी व हिंगोली जिल्‍हात राबविण्‍यात येणा-या "विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी" उपक्रमाच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्रगतशील शेतकरी श्री सोपनराव अवचार, श्री रामप्रभु निरस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, जलसंधारण व कोरडवाहु शेती प्रगतीसाठी कृषि विद्यापीठ व शासनस्‍तरावर सातत्‍यने प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. जलसंधारणावर भर दयावा लागेल, जलयुक्‍त शिवार उपक्रमामुळे हंगामात पाण्‍याची पातळी वाढतांना दिसत आहे, पंरतु यावर शास्‍त्रीयरित्‍या संशोधन होणे गरजेचे आहे. हवामान बदलामुळे शेती पध्‍दतीत अनेक बदल घडत असुन शेतक-यांना बदलत्‍या हंगामानुसार तंत्रज्ञान दयावे लागेल. विद्यापीठाचे विस्‍तार कार्य अधिक बळकट करण्‍यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी व प्रसार माध्‍यामांनी सहकार्य करावे. विद्यापीठाकडे ज्‍वारी, करडई व हरभरा पिकांचे दर्जादार बियाणे उपलब्‍ध असुन रब्‍बी हंगामात याची लागवड करावी, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार आपल्‍या मनोगतात विद्यापीठाचे कुलगुरू कोरडवाहु संशोधनात देशापातळीवर मोठे संशोधक असुन त्‍यांच्‍या ज्ञानाचा फायदा शेतक-यांना व्‍हावा असे मत व्‍यक्‍त केले तर प्रगतशील शेतकरी श्री रामप्रभु निरस आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, यावर्षी कमी पाऊसमानात विद्यापीठाने शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्‍या शेतक-यांना लाभ झाला असुन विद्यापीठ आपल्‍या दारी उपक्रम वर्षभर राबविण्‍यात यावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.   
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सांगितले की, प्रत्‍येक गावातील व प्रत्‍येक शेतक-यांच्‍या शेती विषयक विविध समस्‍या आहेत, विद्यापीठ आपल्‍या दारी उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन त्‍यांच्‍या प्रश्‍नांना थेट विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उत्‍तर देऊ शकतील. तसेच मराठवाडयात झालेल्‍या पर‍तीच्‍या पाऊसाचा रब्‍बी पिकांना लाभ होण्‍याच्‍या दृष्‍टीने हा उपक्रम उपयुक्‍त ठरेल.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री के डि कौसडीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ पी आर देशमुख, प्रा पी एस चव्‍हाण, प्रा डि डि पटाईत, प्रा एस बी जाधव, डॉ मधुमती कुलकर्णी, गणेश कटारे, एकनाथ डिकळे, हनुमंत बनसोड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, वि‍भाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विविध शास्‍त्रज्ञांना चमुच्‍या वाहनास हिरवा झेंडा दाखविण्‍यात आला.