Tuesday, October 27, 2015

मराठवाडयातील दुर्गम अश्‍या आदिवासीबहुल भागातही विद्यापीठ तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहचत आहे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

ज्‍वार संशोधन केंद्रातर्फे आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी शेतकरी मेळावा संपन्‍न 


विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा लाभ मराठवाड्याच्‍या दुर्गम भागातील शेतक-यांना व्‍हावा हे उद्दीष्‍ट ठेऊन नांदेड व हिंगोली जिल्‍हयातील आदीवासीबहुल गावात आदिवासी उपयोजनेंतर्गत विद्यापीठ विविध संशोधन केंद्राच्‍या माध्‍यमातुन पोहचत आहे. त्‍यात प्रमुख्‍याने जल व्‍यवस्‍थापनासह विविध विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाच्‍या प्रसारावर भर देण्‍यात येत आहे. आदीवासी शेतक-यांनी बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेऊन एक बीजोत्‍पादन ग्राम तयार करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र व हैद्राबाद येथील भारतीय कदन्‍न अनुसंधान संस्‍था यांच्‍या वतीने आदिवासी उपयोजनेंतर्गत दि २७ ऑक्‍टोबर रोजी आयोजीत आदिवासी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य व माजी शिक्षण संचालक मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, माजी संशोधन संचालक डॉ. एस. टी. बोरीकर, हैद्राबाद येथील वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आर. आर. चापके, मौजे रामवाडीचे सरपंचा सरस्‍वतीताई डाखोरे, उपसरपंच श्री. व्‍यंकोजी ठोंबरे, यशोदाताई टाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरूलु पुढे म्‍हणाले की, ज्‍वारी हे पिक बदलत्‍या हवामानाला प्रतिकारक पीक असल्‍याने शेतकरी बंधुनी आपल्‍या पिक पध्‍दतीत ज्‍वारीचा समावेश करावा, जेणे करून जनावरांसाठी वैरण व खाण्‍यासाठी धान्‍य उत्‍पादन घेता येईल. अनेक शेतक-यांनी ठिबंक सिंचनाच्‍या सहाय्याने ज्‍वारीचे विक्रमी उत्‍पादन घेतले आहे. ज्‍वारीचे पीक शेतक-यांना फायदेशीर ठरण्‍यासाठी ज्‍वारी काढणी यंत्र विकसीत करण्‍याचे प्रयत्‍न विद्यापीठाचे चालु आहेत.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रास ८७ वर्षाचा इतिहास असुन ज्‍वारीच्‍या विविध सुधारित जाती राज्‍याला दिल्‍या आहेत. लवकरच विद्यापीठाच्‍या वतीने ज्‍वार लागवड तंत्रज्ञानावर आधारीत मोबाईल अॅप्‍सची निर्मिती करण्‍यात येणार असुन कापुस व ज्‍वार या पिकाचे स्‍वतंत्र संकेतस्‍थळ ही मराठीत शेतक-यांसाठी उपलब्ध करण्‍यात येईल. हैद्राबाद येथील वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. आर. आर. चापके यांनी आपल्‍या भाषणात ज्‍वारीवर आधारीत प्रक्रिया उद्योगाच्‍या विकासाची गरज असल्‍याचे प्रतिपादित केले तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे यांनी ज्‍वार संशोधन केंद्राने राबविलेले ज्‍वार तंत्रज्ञानाचे विविध प्रात्‍यक्षिके शेतक-यांना मार्गदर्शक ठरतील अशी आशा व्‍यक्‍त केले.
मानवाच्‍या अन्‍न पोषणात ज्‍वारीचे महत्‍व वाढत असल्‍याचे मत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे यांनी व्‍यक्‍त केले तर माजी संशोधन संचालक डॉ एस टि बोरीकर यांनी विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र हे निजाम काळातील संशोधन केंद्र असुन आदिवासी शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या विविध तंत्रज्ञानाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन केले. मौजे रामवाडी येथील प्रगतशील शेतकरी भारत बोडखे, संतोषीमाता बचतगटाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती पुण्‍यरत्‍नाताई मोरे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

मेळाव्‍यात आदिवासी उपयोजनेतंर्गत निवडक ७० आदिवासी शेतक-यांना व सहा आदिवासी महिला बचत गटांना कोळपे, बियाणे, बीजप्रक्रिया औषधे, विद्यपीठ कृषि दैनंदिनी व पेरणी यंत्र आदींचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर नियोजीत ३० मी x ३० मी आकाराच्‍या शेततळयाचे उद्घाटन करण्‍यात आले तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिदुतांच्‍या मदतीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित ज्‍वारी पिकावर आधारित विविध घडीपत्रिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ऋषिकेश औढेंकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ विक्रम घोळवे यांनी केले. मेळाव्‍यास हिगोंली जिल्‍ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील मौजे रामवाडी येथील आदिवासी शेतकरी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व रावेच्‍या कृषिदुतांनी परिश्रम घेतले.