Monday, January 2, 2017

वनामकृविच्‍या वतीने डिसेंबर, २०१७ मध्‍ये औरंगाबाद येथे “जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम“ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद

विविध देशातील शास्‍त्रज्ञांचा राहणार सहभाग
महाराष्ट्र राज्‍यातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था आणि पुणे येथील कृषि संशोधन व तंत्रज्ञान नियतकालिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ डिसेंबर २०१७ दरम्यान “जागतिक वातावरण बदल : शेती व जलक्षेत्रावर होणारे परिणाम“ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये वातावरण बदल व परिवर्तन‍शिलता व प्रक्रिया, शेतीवरील परिणाम, हवामान बदलास जुळवून घेण्याची प्रक्रिया, हवामान बदलाची तीव्रता कमी करणे, हवामान बदल व जलसाठे, जनावरे व मत्‍स्‍य मध्ये हवामान बदलास जुळवून घेण्याची प्रक्रिया, वातावरण बदल व वारंवारता, आपत्ती व्यवस्थापन, पावसातील खंड, वातावरणातील उच्च घटना, हवामान बदलानुसार शेती, हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर अल्पभुधारक शेतकरी सक्षम होणे, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट या विषयावर विचारमंथन होणार आहे. महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ याबरोबरच युरोपातील अनेक राष्ट्रांमधून या समस्या अलीकडच्या काळात वारंवार अनुभवास येत असल्याने त्यांचा कृषी उत्पादनावर व जलसाठ्यांवर अनिष्ठ परिणाम होऊन शेतक­यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर सदरिल परिसंवादाचे औरंगाबाद येथे आयोजन करण्‍यात आले असुन मुख्‍य आयोजक परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे.
सदरील आंतरराष्ट्रीय परिसंवादास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक तथा प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मभुषण मा. डॉ. राजेंद्रसिंह परोडा, हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाडू संस्थेचे (इक्रिसॅट) महासंचालक मा. डॉ. डेव्हीड बर्गव्हिन्सन, पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाघ्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिसंवादाच्‍या आयोजन समितीमध्ये वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरूलू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. आर. जी. दाणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. तपस भट्टाचार्या, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांचा समावेश असुन सल्‍लागार समितीमध्‍ये श्रीलंका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील प्रख्यात शास्त्रज्ञ व देशातील विविध कृषि विद्यापीठांचे कुलगुरूंचा समावेश आहे. परिसंवादामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, विद्यार्थी, अशासकीय संस्था तसेच प्रगतशील शेतकरी सहभागी होणार आहेत.
या परिसंवादाचे व्यवस्थापन करण्यासाठी सल्‍लागार व आयोजन समितिचे गठण करण्यात आले असुन परिवसंवादासंबंधी संपुर्ण माहिती www.ccaw2017.org या संकेत स्थळावर उपलब्ध असल्‍याचे वनामकृविचे संशोधन संचालक तथा मुख्‍य आयोजक डॉ. दत्तप्रसाद वासकर परभणी यांनी कळविले आहे.