वनामकृवित शिक्षण व संशोधन
क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या कौशल्य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन
कोणत्याही संस्थेचे भविष्य
हे उपलब्ध मनुष्यबळावर अवलंबुन असते, हे मनुष्यबळ प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य
विकासावर भर द्यावा लागेल. कृषि संशोधनात उपयोजित
संशोधनावर आपण जास्त भर देतो, परंतु भविष्यात मुलभूत संशोधनाकरिता गुंतवणूक
वाढवावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास
या विषयावरील एकवीस दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २० जानेवारी ते ९ फेब्रूवारी दरम्यान करण्यात आले असुन सदरिल
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम हे
उपस्थित होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ पी आर शिवपुजे,
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, मुलभूत संशोधनात कार्य करण्यासाठी
कृषि शास्त्रज्ञांना मोठा वाव आहे. विविध विषयात ही आंतर शाखीय संशोधन झाले पाहिजे
तरच आपण नवनवीन शोध लावु शकु. संशोधन करतांना शास्त्रज्ञांनी विशिष्ट चौकटीबाहेर
पडुन संशोधन केल्यास निश्चितच समाजाचा फायदा होईल. विदेशात प्राध्यापक वर्गास
समाजात मोठा मान असतो, आपल्याही देशात प्रत्येक प्राध्यापकांनी समाजासाठी
संशोधनातुन कार्य केलयास निश्चितच ते स्थान प्राप्त होऊ शकते.
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस.
कदम आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, आज शेतीत अतिरिक्त रासायनिक
खते व पाण्याचा वापरामुळे मोठे नुकसान होत आहे. कृषि विकासासाठी काटेकोर शेती तंत्रज्ञानावर
अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी विविध
विषयात आंतर शाखीय संशोधन करावे लागेल. संशोधनास गती देण्यासाठी विद्यापीठातील संशोधन
व प्राध्यापकांच्या कौशल्य विकासावर भर द्यावा लागेल, यासाठी सदरिल प्रशिक्षणासारखे
कार्यक्रय उपयूक्त ठरतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जल व मृदाच्या गुणधर्मात
वरचेवर –हास होत असुन समाजाच्या कल्याणासाठी जल व मृदाचे गुणधर्मात सुधारणा करणे
गरजेचे असल्याचे मत कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ पी आर शिवपुजे यांनी व्यक्त
केले तर केंद्र शासनाने हाती घेतलेला मृदा आरोग्य पत्रिका वाटप व त्याचा वापर
यशस्वीतेसाठी कृषि शास्त्रज्ञांना प्रयत्न करावा लागेल, असे मत शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात
प्रशिक्षण आयोजक कुलसचिव तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती
दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ
सुरेश वाईकर यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील मृदाशास्त्रज्ञ लिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सदरिल प्रशिक्षणात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या पर्यावरण विषयक तसेच अन्नधान्य, मृदा, जल, पिके, प्राणी आदीवर होणाऱ्या परिणामाबाबत मान्यवरांचे व्याख्यानेे होणार आहेत. कौशल्य विकासासोबत
व्यक्तीमत्व विकास या विषयावार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी भारतातील
नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ.
पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद), डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणात शिक्षण व संशोधन क्षेत्रातील
३० शास्त्रज्ञ सहभागी झाले
आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर
अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव
अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी परिश्रम घेतले.