सद्यपरिस्थितीत तूर पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून
मागील 3
- 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण
असल्यामुळे तुरीवरील घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच
आंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ
शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या
शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येऊ शकतो. काही ठिकाणी
अळीने तुरीवरील कळया व फुले फस्त करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कीडींचा
प्रादुर्भाव कळया, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत
आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठया
प्रमाणावर नुकसान होते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी
खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.
शेंगा पोखरणारी अळी सुरुवातीच्या काळात अळया पिकाच्या कोवळया
पानांवर,
फुलावर किंवा शेंगावर
उपजीवीका करतात, नंतर शेंगा भरतांना त्या
दाणे खातात. दाणे खात असतांना त्या शरीराचा पूढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा
भाग बाहेर ठेऊन आतील कोवळया दाण्यावर उपजीवीका करतात. या कीडींमुळे तुर पिकाचे
जळपास 60-80
टक्के नुकसान होते.
प्रथीनांचे प्रमाण जास्त असलेल्या शेंगा/ दाण्यावर अळी उपजीवीका करतात.
किडींचे व्यवस्थापन :
1. तुरीमध्ये एकरी 4 कामगंध
सापळे (फेरोमोन ट्रॅप) घाटेअळीच्या पतंगासाठी पिकांच्यावर एक फुट उंचीवर लावावेत.
2. तुरीवरील मोठया अळया वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
3. पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
4. अळया लहान अवस्थेत असतांनाच एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची 250 एल.ई. प्रति हेक्टरप्रमाणे फवारणी करावी.
5. जर कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून
आल्यास क्विनलफॉस 25 ईसी. 28 मिली., लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6. अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेझोएट 5 एस जी 4.5 ग्रॅम, इंडोक्झाकार्ब 14.5 एस सी. 8 मिली किंवा स्पिनोसॅड 45 एस सी 3 मिली किंवा
फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एस. सी. 2 मि.ली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एस सी 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
Ø पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे.
Ø किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसाच्या अंतराने करावा.
Ø शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हतमोजे व तोंडावर मास्कचा वापर
करावा व सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी.
अशा प्रकारे तुरीवरील शेंगा पोखणारी अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर, सहाय्यक
प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर, डॉ.
बस्वराज भेदे यांनी केले आहे.