Sunday, February 1, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ज्वारी संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रास भेट देऊन तेथील चालू संशोधन उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान ज्वारी पिकातील नवीन वाण व संकरीत (हायब्रिड) विकास, उत्पादनक्षमता वाढविणारे संशोधन तसेच ज्वार विविधता पॅनेल (Sorghum Diversity Panel) अंतर्गत सुरू असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.

माननीय कुलगुरूंनी ज्वारी पिकाचे बदलत्या हवामानातील महत्त्व अधोरेखित करताना, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे, कीड-रोग प्रतिकारक्षम व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे वाण विकसित करण्यावर भर दिला. तसेच संशोधन हे केवळ प्रयोगशाळा किंवा शेतमर्यादित न राहता, त्याचे निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान पदव्युत्तर (पीजी) व पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून शेतकरीकेंद्रित, समस्या-आधारित व व्यवहार्य संशोधन प्रकल्प राबविण्याबाबत माननीय कुलगुरूंनी महत्वपूर्ण  मार्गदर्शन केले. संशोधन, विस्तार व शेतकरी यांच्यात सुसूत्रता निर्माण होणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी श्रीमती जयश्री मिश्रा, ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी व ज्वार पैदासकार डॉ. अंबिका मोरे, कृषि सहायक श्री इंगळे तसेच संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शास्त्रज्ञांनी सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली.

माननीय कुलगुरूंच्या या प्रेरणादायी व मार्गदर्शक भेटीमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ज्वारी संशोधन केंद्राच्या वतीने त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रावर सुरू असलेल्या विविध संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी माननीय कुलगुरूंनी करडई पिकाच्या वाणनिर्मिती कार्यक्रमात विशेष रुची दाखवून एफ–१ संकरांची निर्मिती व मूल्यांकन, तसेच विभाजन पिढ्यांची प्रगती व निवड प्रक्रियेबाबत सखोल माहिती घेतली. तसेच जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नेटवर्क प्रकल्पातील कार्यवाहीचाही त्यांनी आढावा घेतला.

यासोबतच ४०० विदेशी व देशी गुणविशेषाधारित करडई ओळींच्या मूल्यांकनाची पाहणीही माननीय कुलगुरूंनी केली. करडई पिकामध्ये अधिक तेलांश असलेले, जैविक ताणतणावांना प्रतिकारक्षम तसेच लवकर पक्व होणारे वाण विकसित करण्याबाबत त्यांनी संशोधकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनामुळे करडई संशोधनास निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पांतर्गत २५० विविध करडई जर्मप्लाझम ओळींचे फिनोटायपिंग कार्य सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. माननीय कुलगुरूंच्या भेटीबद्दल व प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल केंद्रातील शास्त्रज्ञांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. व्ही. आर. घुगे उपस्थित होते.