नैसर्गिक शेती ही काळाची गरज; शेतकरी व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती स्वीकारावी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल, विद्यापीठाचे
माननीय कुलपती तसेच नैसर्गिक शेतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक श्री. आचार्य देवव्रतजी
यांच्या मार्गदर्शनानुसार व माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे नैसर्गिक शेतीचा वैज्ञानिक व शाश्वत मॉडेल विकसित करण्याचा
उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ स्तरावर ३ एकर क्षेत्रावर ‘माननीय कुलगुरू
नैसर्गिक शेती – पवित्र शेती मॉडेल फार्म’ विकसित करण्यात येत आहे. तसेच विद्यापीठाच्या
१४ संशोधन केंद्रांमध्ये व १२ कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रत्येकी एक एकर
क्षेत्रावर ‘नैसर्गिक शेती- पवित्र शेती मॉडेल फार्म’ स्थापन करण्यात आले आहेत.
तसेच प्रत्येक संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्राशी संलग्न ३ शेतकऱ्यांच्या
शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके सुरू करण्यात
आली आहेत. अशा प्रकारे एकूण १०५ ‘वनामकृवि एक एकर नैसर्गिक शेती मॉडेल फार्म’
विकसित करण्याचे काम सुरू असून विद्यापीठाच्या अंतर्गत घटक व संलग्न महाविद्यालये
यांच्या माध्यमातून ५९ ‘नैसर्गिक शेती – पवित्र शेती मॉडेल फार्म’ विकसित करण्याचे
नियोजित असून एकूण १६४ ‘वनामकृवि नैसर्गिक शेती- पवित्र शेती मॉडेल फार्म’ विकसित
करण्यात येणार आहेत. या क्षेत्रावर नैसर्गिक शेतीची मॉडेल्स, प्रात्यक्षिके
व संशोधन प्रयोग राबविले जात आहेत.
हा उपक्रम कमी खर्चिक, शाश्वत, पर्यावरणपूरक
व शेतकरी–अनुकूल शेती पद्धतीचे वैज्ञानिक प्रमाणीकरण, प्रात्यक्षिके
व प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मॉडेलमध्ये देशी नैसर्गिक शेतीच्या
तत्त्वांचा व आधुनिक संशोधनाधारित पद्धतींचा समन्वय साधण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक २ जानेवारी
२०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सिम्पोजियम हॉल
येथे सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या वतीने विद्यापीठाच्या घटक व सलग्न महाविद्यालयांतील शिक्षकवर्गीय अधिकारी एकदिवसीय
प्रशिक्षण कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, सेंद्रिय शेती संशोधन योजनेचे मुख्य अन्वेषक डॉ.
आनंद गोरे, प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे, श्री विश्वनाथ होळगे यांची व्यासपीठावर
उपस्थिती
होती.
यावेळी माननीय
कुलगुरूंनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रतजी
यांनी मांडलेले नैसर्गिक शेतीचे मॉडेल संपूर्ण देशात स्वीकारले जात आहे. ही शेतीपद्धती
आपण समजून घेऊन तिचा अवलंब करणे आवश्यक आहे,
असे त्यांनी सूचित केले. महाराष्ट्रातील शेतकरी प्रगत असून महाराष्ट्रातील
शेती देशाला दिशादर्शक ठरते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती स्वीकारणे
अधिक सोपे जाणार आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती स्वेच्छेने स्वीकारल्यास ती अधिक सोपी
होईल आणि अधिक उत्पादन मिळविता येईल, असे त्यांनी सांगितले.
शास्त्रज्ञांनी
शेतकऱ्यांसोबत अधिक संवाद साधून नैसर्गिक शेतीविषयीचे ज्ञान आणि माहिती देवाणघेवाण
करावी, असे त्यांनी आवर्जून नमूद
केले. नैसर्गिक शेतीतून फायदा होईल की तोटा होईल, ही संकल्पना
आता संपुष्टात आली असून नैसर्गिक शेती स्वीकारण्याची मानसिकता समाजात रुजत आहे. नैसर्गिक
शेती व निसर्ग यातून मिळणारे समाधान अद्वितीय असून यामुळे आरोग्य व पर्यावरण दोन्ही
उच्च दर्जाचे राहते. त्यामुळे नैसर्गिक शेती ही सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने काळाची
गरज बनली आहे.
सध्या रासायनिक
शेतीमुळे उत्पादन खर्च वाढत आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याची संकल्पना मागे
पडून रसायनमुक्त शेती पुढे येत आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्यास खर्चात बचत होऊन
कर्जमुक्त शेती आणि शेतकरी कल्याण साध्य होऊ शकते. नैसर्गिक शेतीबाबत माननीय राज्यपालांचा
संदेश आपण सर्वांनी समजून घ्यावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की नैसर्गिक शेती
स्वीकारावी, ती समजून घ्यावी आणि त्यासाठी
अधिकाधिक प्रशिक्षण घ्यावे.
नैसर्गिक शेती
ही नवीन नसून जुनी आणि समृद्ध तंत्रज्ञानावर आधारित आहे. भारतातील देशी वाण समृद्ध
असून त्यांचा विकास करून त्यांचा अवलंब करणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीत प्रगती हळूहळू
होईल, पण निश्चितच यश मिळेल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सन २०२६ हे वर्ष
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ दरवर्षी
आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी महिला
शेतकरी दिन साजरा करते. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आणि सावित्रीबाई
फुले यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ विद्यापीठातील सर्व महाविद्यालये व संशोधन केंद्रांनी
शेतकरी महिलांच्या कल्याणासाठी वर्षभरासाठी विविध उपक्रम व योजनांचा आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, विद्यापीठ
नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने
सातत्याने कार्य करत असून, या संशोधनाच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध, व्यवहार्य व उपयुक्त
शिफारसी उपलब्ध करून दिल्या जातील. या शिफारसींच्या आधारे नैसर्गिक शेती अधिक
उत्पादनक्षम, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व पर्यावरणपूरक बनवून
ती दीर्घकालीनदृष्ट्या शाश्वत करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. यामुळे
शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल, तसेच मातीची सुपीकता, पाणी व पर्यावरणाचे संवर्धन
साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नैसर्गिक शेतीचे
मानवी जीवनातील तसेच पर्यावरणीय दृष्टीने असलेले बहुआयामी महत्त्व सविस्तरपणे विशद
केले. नैसर्गिक शेतीमुळे मातीची सुपीकता टिकून राहते, पाण्याची
गुणवत्ता सुधारते, जैवविविधतेचे संवर्धन होते आणि रासायनिक
खत-कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात, असे
त्यांनी नमूद केले. तसेच नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन
त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होतो आणि समाजाला आरोग्यदायी, विषमुक्त अन्न मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात
डॉ. आनंद गोरे यांनी नमूद केले की माननीय राज्यपालांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार
व अंमलबजावणी गुजरात, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश
आदी राज्यांमध्ये सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात माननीय राज्यपालांच्या
मार्गदर्शनाखाली माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार
घेतल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात माननीय कुलगुरू यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात
येत असलेल्या नैसर्गिक शेती मॉडेलच्या आराखड्यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
.jpeg)
.jpeg)









.jpeg)

.jpeg)











