छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, महात्मा फुले, भगवान बौध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगी नितिमत्ता, शील व त्याग होता. त्यांच्या विचारधारा समान होत्या, आदर्श मानवी जीवन घडवण्यासाठी याच विचारांची आजही गरज असुन यासाठी नि:स्वार्थपणे सर्व
समाजास एकत्र यावे लागेल, असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान
सचिव मा. श्याम तागडे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या
वतीने महात्मा ज्यातिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोवत्सानिमित्य दि. 6 मे रोजी आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे
सामाजिक विचार आणि मिशन’ या विषयांवरील व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, महासंघाचे अध्यक्ष डॉ गिरीधारी वाघमारे, महासचिव प्रा. अनिष कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. श्याम तागडे पुढे म्हणाले की, मानवांनी लोभ, क्रोध, मोह आदी गोष्टी बाजूला सारुन एकमेकांचा आदर केला तर मानवी जीवनाचे निश्चितच कल्याण होईल. महापुरूषांमध्ये उच्च पातळीचे शील होते, त्यांच्या कार्यामध्ये मोठे बळ होते, म्हणुनच त्यांच्या ज्ञानाचा
उपयोग भारतीय समाजाची विषमता दुर करण्यासाठी झाला आहे. प्रत्येक मनुष्याच्या अंगी नित्तिमता, शील, करूणा असेल आणि अष्टशिलांचे पालन केले तर मानवी जीवनाचे कल्याण होऊन आदर्श राष्ट्र निर्माण होऊ शकते. महापुरूषांच्या जयंत्या सोंग
करून साज-या करू नका तर शुध्द आचरणाने, शीलाचे पालन करुनच जयंती साजरी
करण्यात अर्थ आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असुन भरपुर धन-दौलत असुन देखील शाश्वत सुख, शांती लाभत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केल.
अध्यक्षीय समारोप कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू म्हणाले की, आजही राष्ट्राला डॉ. बाबासाहेंबाच्या विचाराची गरज असुन शिक्षणाचे महत्व त्यांनी ओळखले होते, त्यांनी अनेक पदव्या
विदेशातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थेतुन प्राप्त केल्या. विद्यापीठातील प्राध्यापकांना परदेशात
प्रशिक्षणाच्या सुविधासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, असे सांगुन मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित
प्रश्नांसाठी विद्यापीठ शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करील असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात संबोधी अकादमीचे अध्यक्ष भिमराव हत्तिअंबिरे यांना महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्माननित केल्याबाबत मान्यवरांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीधारी वाघमारे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. निता गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. अनिस कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास
विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.