Thursday, December 19, 2019

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात केशर आंबा लागवड प्रशिक्षण संपन्‍न

देशांतर्गतच आंबा विक्रीसाठी मोठी संधी.......संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांचे प्रतिपादन
भविष्‍यात आंबा लागवडी खालील क्षेत्र विस्तारले आणि अधिक उत्पादन मिळाले, तरीही विक्रीची काळजी करण्याचे कारण नाही. फळामध्‍ये आंबा फळास देशातील तसेच राज्यातील ग्राहक मोठया प्रमाणात पंसती असुन देशाची लोकसंख्यचा विचार करता आपल्या देशातंंर्गतच आंब्‍याची बाजारपेठ मोठी आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेले हिमायतबाग औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्रात कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा – आत्‍मा औरंगाबाद यांच्या सहकार्याने दिनांक 19 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकरिता केशर आंबा लागवड विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजीत केले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, संशोधन उपसंचालक डॉ एस बी पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री प्रकाश अव्हाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर पुढे म्‍हणाले की, आंबा फळाच्‍या विक्रीचे तंत्र अवगत करून या फळपिकातून शेतक-यांना समृद्धी साधणे शक्‍य होईल. दर्जेदार आंबासाठी काही ग्राहकांची जास्‍त किंमत देण्‍याची तयारी असते. त्‍यासाठी प्रतवारी, पॅकिंग आणि गुणवत्ता याची कास आंबा उत्‍पादकांनी धरावी, असा सल्‍ला देऊन देशाच्या वेगवेगळ्या भागातील शेतकरी लागवड करीत असलेल्या जातीची विशेष वैशिष्ट्ये देखील सांगितले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ तुकाराम मोटे यांनी आंबा लागवड करण्यासाठी कृषी विभाग राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाश अव्हाळे यांनी केले. सूत्रसंचालन आत्मा कार्यालयाचे बीटीएम श्री मकरंद ननावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ आर व्ही नयनवाड यांनी मानले.

तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एम बी पाटील यांनी जमिनीच्या निवडीपासून तर फळधारणेपर्यंत केशर आंबा लागवडीचे तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आंबा फळ पिकावरील रोग व त्याचे व्यवस्थापनावर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ गजेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले तर आंब्यावरील कीड व्यवस्थापन या विषयावर डॉ एन आर पतंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास शंभरपेक्षा जास्त आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री प्रकाश आव्हाळे आणि त्यांचा चमूंनी परिश्रम घेतले   

सौजन्‍य
श्री रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद