Showing posts with label NAHEP. Show all posts
Showing posts with label NAHEP. Show all posts

Saturday, July 3, 2021

जगातील नामांकित वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीशी वनामकृविचा सामंजस्य करार

परभणी कृषि विद्यापीठात जागतिक पातळीवरील संशोधनास मिळणार चालना 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि जगातील नामांकित वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी (पुलमन, अमेरिका) यांमध्ये दिनांक २ जुलै रोजी कृषि शिक्षण व संशोधन या विषयी सामंजस्य करार झाला, हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने पार पडला. या प्रसंगी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष डॉ. असीफ चौधरी, सेंटर फॉर प्रीसीजन अॅन्ड ऑटोमेटेड अॅग्रीकल्चर चे संचालक डॉ. कीन झॅग, अधिष्ठाता (कृषि) डॉ. रीचर्ड झॅग, नवी दिल्ली येथील नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अग्रवाल, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ डी एन गोखले, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ गोपाळ शिंदे, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे वरिष्‍ठ प्राध्यापक डॉ. मनोज कारकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनांत वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष डॉ. असीफ चौधरी म्‍हणाले की, जागतिकस्तरावर वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी ही संस्था नावाजलेली संस्था असुन कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन एकुणच जागतिक स्तरावरील कृषि उत्पादकता वाढ होऊ शकते, त्‍यामुळे या सामंजस्य करारास मानवतेच्या दृष्टीने फार महत्व आहे. मागील पाच वर्षात अमेरिकेसह संपुर्ण जग वेगवेगळ्या जागतिक आव्हानावर काम करीत आहे, त्यात बदलत्‍या परिस्थितीत कृषि, कृषि शिक्षण व संशोधन यांचे समोरही आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्‍याचे आव्‍हाने आहेत. कृषि क्षेत्रातील समास्‍यांवर आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करुन मात करणे शक्‍य आहे, याकरिता हा सामंजस्य करार अत्‍यंत महत्वाचा ठरेल. कृषि क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीत उपलब्ध असुन याचा फायदा भारतातील कृषि संशोधक व विद्यार्थी यांना निश्चितच होणार, यामुळे डिजिटल शेतीस चालना मिळणार आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून भारतातील कृषि विषयक विविध शिक्षण व संशोधन जागतिककरण होत असल्‍याचे सांगितले.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण मनोगतात म्‍हणाले की, जगातील अग्रगण्‍य वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीशी परभणी कृषि विद्यापीठाने केलेल्‍या करारामुळे आधुनिक व डिजिटल शेती तंत्रज्ञानबाबत विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांच्या कौशल्य विकासात भर पडणार आहे, त्याचा फायदा मराठवाडा तसेच देशातील कृषि क्षेत्राला होईल. यामुळे परभणी कृषि विद्यापीठात जागतिक पातळीवरील संशोधनास चालना मिळणार आहे.

नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी सामंजस्य कराराविषयी समाधान व्यक्त करून राष्ट्रीयस्तरावरील नाहेप प्रकल्पाचे कार्य यावर प्रकाश टाकला. या प्रकल्पाचा विद्यार्थी, संशोधक, शेतकरी यांना निश्चितच फायदा होईल अशी आशा व्यक्त करून परभणी येथील नाहेप प्रकल्पाचे कार्याविषयी समाधान व्यक्त केले.

वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. क्वीन झॅग यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य कराराविषयी सविस्‍तर माहिती देऊन विविध संशोधन प्रकल्प व संशोधक आदान-प्रदान याविषयी मार्गदर्शन केले. तर वरिष्ठ प्राध्यापक डॉ. रीचर्ड झॅक यांनी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सुविधा केंद्र यांची माहिती दिली.

डॉ. मनोज कारकी म्‍हणाले की, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीत स्वयंचलित यंत्रे, रोबोटिक्सचा कृषि क्षेत्रात उपयोग यावर मोठे संशोधन झाले असुन अनेक संशोधन प्रकल्प चालु आहे, याचा वापर करुन मराठवाडा कृषि क्षेत्रासाठी प्रारुप बनविण्‍यास होणार असल्‍याचे सांगितले तर शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांनी या करारामुळे विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्या‍र्थ्‍यांना विशेष लाभ होणार असल्‍याचे म्‍हणाले.

कार्यक्रमात कुलगुरु मा डॉ अशोक ढवण आणि उपाध्यक्ष डॉ. असीफ चौधरी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. या दोन संस्थामधील सामंजस्य करारामुळे कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान यात ड्रोन तंत्रज्ञान, यंत्रमानव, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, प्रीसीजन अॅग्रीकल्चर, स्वयंचलित यंत्रे आदी बाबत एकत्र संशोधन होणार असुन अत्‍याधूनिक कृषि विषयक शिक्षण व संशोधन याबाबत आदान-प्रदान होणार आहे तसेच दोन्‍ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यात देखिल आदान-प्रदान होणार आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्तविकात प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी विद्यापीठातील नाहेप प्रकल्पातील विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. राजेश कदम, डॉ. भगवान आसेवार, प्रा. संजय पवार, डॉ. मेघा जगताप, डॉ. कैलास डाखोरे आदींनी केले. तर तांत्रिक सहाय्य नाहेपचे इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी, खेमचंद कापगते, डॉ. नरेंद्र खत्री, डॉ. अविनाश काकडे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. हेमंत रोकडे, इंजी. सचिन कराड, डॉ. शिवराज शिंदे, रहिम खान, शिवानंद शिवपुजे, इंजी. संजीवनी कनवटे, इंजी. तनझीम खान, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. विश्वप्रताप जाधव, प्रदीप मोकाशे, रामदास शिंपले, गंगाधर जाधव, मारोती रनेर, जगदीश माने, मुक्ता शिंदे, रेखा ढगे आदींनी काम पाहिले.


Friday, September 4, 2020

वनामकृविच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्यांना मुंबई आयआयटीच्‍या माध्‍यामातुन डिजिटल शेतीवर संशोधनाची संधी ..... कुलगुरु मा डॉ अशोक ढवण

स्मार्ट कृषिसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावरील राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षणाचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍था यांच्या संयुक्‍त विद्यमाने “स्मार्ट कृषिसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग” यावर दिनांक १० ते २८ ऑगस्ट दरम्‍यान तीन आठवड्याच्या राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले होते, प्रशिक्षण वर्गाचा समारोप दिनांक २८ ऑगस्ट रोजी झाला. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सतीश अग्निहोत्री, प्रा. अमित अरोरा, प्रा. कवी आर्या, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा डॉ. आर. पी. कदम, मुख्य अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, सहमुख्य अन्वेषक प्रा. संजय पवार (नाहेप) आदींची प्रमुख सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या सहकार्याने संशोधनाची संधी विद्यापीठातील पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना प्राप्‍त झाली असुन स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. सध्याच्या विषाणूंचा प्रादुर्भवाच्या परिस्थितीत डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातुन विद्यापीठातील विद्यार्थ्यां व  प्राध्यापकांना डिजिटल व्यासपीठावरून अधिकाधिक मार्गदर्शन करून सक्षम करावे., असे मत व्‍यक्‍त केले.

प्रमुख पाहुणे डॉ. सतीश अग्निहोत्री यांनी स्मार्ट कृषिसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावर मार्गदर्शन केले. डॉ. धर्मराज गोखले यांनी मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापकांनी सहभागी विद्यार्थ्‍यी व प्राध्यापकांशी डिजिटल तंत्रज्ञानाबाबत खूप प्रभावी प्रशिक्षण दिल्‍याचे मत आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले.

प्रास्‍ताविक प्रशिक्षणाचे आयोजक प्रा.अमित अरोरा यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.संजय पवार यांनी केले तर आभार डॉ. आर. पी. कदम आभार यांनी मानले. प्रशिक्षणात कृषीचे विद्यार्थी, प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ अविनाश काकडे, इंजि खेमचंद कापगाते, इंजि रविकुमार, डॉ हेमंत रोकडे, डॉ रश्मी बंगाळे, जगदीश माने आदींनी सहाय्य केले.

प्रशिक्षणात प्रा. अमित अरोरा यांनी शेतीतील स्वंयचलीत यंत्रणा, ग्रींनहाऊस, फार्म अवजारे, अन्नप्रक्रिया स्‍वयंचलित, डेटा विश्लेषण आदींवर मार्गदर्शन केले तर प्रा. कवि आर्या यांनी ई-यंत्राद्वारे आणि कृषीयंत्राचा स्मार्ट डिजिटल शेती, प्रा. मरियम शुजाई यांनी शेती अचूक आणि सुलभ करण्यासाठी सेन्सर्सचे महत्त्व, प्रा दिव्या सिंह यांनी इलेक्टॉन्सीक्सच्या मूलभूत तत्व, डॉ. इप्सिता दास यांनी अचुक शेती यांत्रिकीकरण, प्रा. असिम तिवारी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन शिक्षण, प्रा. विशाल देशपांडे यांनी स्वयंचलित गुळ प्रक्रिया तंत्रज्ञान, प्रा. अनिकेत देव यांनी पीक नियोजन व्यवस्थापन, मयुर निलावार यांनी स्मार्ट स्टोरेज स्ट्रकचर, प्रा. पेन्नर चिन्नास्वामी यांनी सॉफ्टवेअरच्‍या माध्यमातून शेतकरी शेतीच्या झाडांशी संबंधित विविध अंतर्दृष्टी आणि पाण्याचे व्यवस्थापन, प्रा कौशिकभाई भट यांनी मशीन लर्निग डेटा बायोलॉजी, प्रा शिमुल रेडडी यांनी स्थानिक विश्लेषणाच्या अनुषंगाणे रिमोट सेंन्सिगसाठी साधनांचा वापर तसेच प्रा अमण लोणारे यांनी जीआएस मधिल रिमोट सेन्सिंगची मुलभुत माहिती आदीवर मार्गदर्शन केले.

Monday, August 17, 2020

डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतमाल मागणी व पुरवठा संतुलन साधने शक्‍य……. कुलगुरू मा डॉ विलास भाले

वनामकृविच्‍या वतीने आयोजित डिजीटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेती यावरील ऑनलाईन आतंरराष्‍ट्रीय परिषदेचा समारोप

आज देशात मुबलक प्रमाणात अन्‍नधान्‍य उत्‍पादन होत असुन कधी अतिरिक्‍त शेतमाल उत्‍पादीत होतो, त्‍यामुळे शेतमालास बाजारभाव मिळत नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिक लागवडीचे नियोजन केल्‍यास शेतमाल मागणी व पुरवठा यात संतुलन साधुन शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला मिळु शकेल. शेतमाल नासाडी कमी करण्‍याकरिता आपणास प्रयत्‍न करावे लागतील. हवामानातील बदलामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. यावर्षी सोयाबीनच्‍या कमी उगवण क्षमतेमुळे शेतकरी बांधवाचे नुकसान झाले. झालेल्‍या नुकसानीबाबत शासनाने सर्वेक्षण केले, यात अनेक अडचणी येतात. शेतकरी बांधवाचे झालेले नुकसान पुर्णपणे भरून शक्‍य नाही. पंरतु भविष्‍यात किड व रोगाचा प्रादुर्भाव, नैसर्गिक व आत्‍पकालीन परिस्थितीत शेतमालाचे होणारे नुकसान आदींचे अचुक सर्वेक्षण डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन करून शेतक-यांना योग्‍य मोबदला त्‍वरीत देणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत सेंटर ऑफ एक्‍सलंसराष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेपआणि आयएसए व आयएसजीपीबी शाखा परभणी  वतीने ‘डिजीटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेतीभविष्‍यात्‍मक योजना’ यावर ऑनलाईन आतंरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक १० ते १३ ऑगस्‍ट दरम्‍यान करण्‍यात आले होते, या परिषदेच्‍या समारोपाप्रसंगी (दि १३ ऑगस्‍ट) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन रायपुर छत्‍तीसगड ये‍थील कृषि विद्यापीठाचे कुलगरू  मा डॉ पी के घोष, नवी दिल्‍ली येथील आयसीएआरचे डॉ एस भास्‍कर, भारतीय कृषिविद्या संस्‍थेचे उपाध्‍यक्ष डॉ यु व्‍ही महाडकर, ईस्‍त्राईल तंत्रज्ञान संस्‍थेचे डॉ राफेल लिंकर, आयोजक नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ डि एन गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू  मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वाढत्‍या  लोकसंख्‍येला पोषक आहार, शेतकरी बांधवांना योग्‍य मोबदला, दर्जेदार अन्‍न निर्मिती, सार्वजनिक वितरण प्रणाली, प्रक्रिया व पॅकेजिंग सुविधाचे बळकटीकरण आदीकरिता डिजिटल तंत्रज्ञानाचा भविष्‍यात मोठा वापर होणार असल्‍याचे सांगुन सद्याच्‍या कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात मनुष्‍याचा कमीत कमी शेतकामात वावर होण्‍याच्‍या दृष्‍टीने डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ पी के घोष म्‍हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वापर वाढण्‍याकरिता लागणा-या मनुष्‍यबळ निर्मितीची मोठी जबाबदारी सेंटर ऑफ एक्‍सलंस म्‍हणजेचे नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठास दिली असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रमात डॉ एस भास्‍कर, डॉ प्रभात कुमार, डॉ यु व्‍ही महाडकर, डॉ राफेल लिंकर आदींनेही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर यांनी केले तर डॉ गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ आय ए बी मिर्झा व डॉ सुनिता पवार यांनी केले तर आभार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी मानले. डॉ ए के गोरे यांनी सदरिल आंतरराष्‍ट्रीय  परिषदेचा अहवाल मांडला.  

चार दिवस चालेल्‍या या परिषदेच्‍या तांत्रिक सत्रात अमेरिकेच्‍या कृषि विभागाचे संचालक मा डॉ पराग चिटणीस, अमेरीकन युनीवर्सीटी ऑफ टेक्‍नॉलॉजीचे संचालक डॉ मोस्‍तफा एमएल कुर्डी, बेलारूसयन विद्यापीठाचे तज्ञ प्राध्‍यापक डॉ मिखाईल तातुर, अमेरिकेतील ऑरल रोर्बोट युनिवर्सीटीतील तज्ञ डॉ पावेल नवीटक्‍सी, अर्जेटीना येथील रोसारीओ राष्‍ट्रीय विद्यापीठाचे प्राध्‍यापक तज्ञ डॉ जेसल क्रिस्‍टोफर, अमेरिका येथील वाशिंग्टन स्‍टेट युनिवर्सीडीचे तज्ञ डॉ लव आर खोत, अल्‍गेरीया येथील फरहात अब्‍बास विद्यापीठाचे प्राध्‍यापक तज्ञ डॉ लाबाड रायमा, प्रा जयशंकर तेलंगाणा राज्‍य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ व्ही प्रविणराव, रायपुर (छत्‍तीसगडयेथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पी के घोष आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेत विदेशातील तसेच देशातील विविध राज्‍यातील कृषि तज्ञशास्‍त्रज्ञप्राध्‍यापक व पदव्‍युत्‍तर विद्यार्थी यांनी सहभागासाठी नोंदविला होता. आयोजन समितीत डॉ जे ई जहागिरदारडॉ भगवान आसेवारडॉ एच व्‍ही काळपांडेडॉ आर व्‍ही चव्‍हाणडॉ आय ए बी मिर्झाडॉ एस व्‍ही कल्‍याणकरडॉ जे डी देशमुखडॉ पी के वाघमारे आदीचा सहभाग होता, तर तांत्रिक सहाय्य  नाहेप टीम सदस्‍य इं खेमचंद कापगातेडॉ अविनाश काकडेडॉ रश्‍मी बंगाळेइं रहीम खानइं ताझीम खान , इं शैलेश शिंदे आदींनी केले.

Friday, June 5, 2020

शेतीत जैवतंत्रज्ञान आधारे विकसित केलेल्या जैविक किटकनाशकांचा वापर करण्‍याची गरज ...... ऑस्ट्रेलियातील संशोधिका मा डॉ निना मित्तर

वनामकृवित आयोजित जैवतंत्रज्ञानवरील आंतरराष्‍ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन 

प्रशिक्षण वर्गात अमेरिका, कॅनडा,  ऑस्‍ट्रोलिया आदीसह अनेक देशातील कृषि शास्‍त्रज्ञाचा सहभाग    

शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठया प्रमाणात होत आहे, त्‍यास निश्चितच मर्यादा आहेत. रासायनिक किटकनाशकांच्‍या ऐवजी जैवतंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेले जैविक किटकनाशकांचा वापर केल्‍यास पर्यावरण संतुलन साधता येईल, असे प्रतिपादन आस्‍ट्रेलिया येथील क्‍वीन्‍सलॅड युनिवर्सिटीच्‍या संचालिका डॉ निना मित्‍तर यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) वतीने आधुनिक शेतीतील अद्ययावत डिजिटल व जैवतंत्रज्ञान साधने यावर ऑनलाईन आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 4 ते 8 जुन दरम्‍यान करण्‍यात आले असुन या प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या नाहेप प्रकल्‍पाचे  राष्‍ट्रीय संचालक  मा डॉ आर सी अगरवाल, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, प्रशिक्षण वर्गाचे आयोजक डॉ अच्‍युत भरोसे आदींचा प्रमुख सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गामुळे जागतिक पातळीवर जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाची माहिती देशातील कृषि संशोधकांना होणार असुन जागतिक दर्जाचे संशोधन कार्यास गती प्राप्‍त होईल.  

मा डॉ आर सी अगरवाल यांनी नाहेप प्रकल्‍पामुळे जागतिक स्‍तरावरील कृषि संशोधनाबाबत देशातील कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना ज्ञान होऊन, देशातील कृषि संशोधन कार्यास दिशा प्राप्‍त होईल. यावेळी डॉ धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.  

सदरिल आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षणात अमेरिका, ऑस्‍ट्रोलिया, नेपाळ, अफगाणीस्‍थान, कॅनडा आदीसह देशातील विविध राज्‍यातुन कृषि शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी झाले असुन जैवतंत्रज्ञानाशी निगडीत विविध विषयावर ऑस्‍ट्रेलियातील मेलबोर्न विद्यापीठातील डॉ जार्ल्‍स राबीन, अमेरिकेतील वॉशिंग्‍टन स्‍टेट युनिवर्सिटीचे शास्‍त्रज्ञ डॉ प्रशांत स्‍वामी, मोहाली येथील राष्‍ट्रीय कृषि अन्‍न जैवतंत्रज्ञान संस्‍थेच्‍या डॉ संस्‍कृती, गुजरात येथील जुनागड कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ रूकामसिंग तोमर, पुणे येथील डिएफआर चे डॉ प्रशांत कवर, ऑस्‍ट्रेलियातील वेस्‍टेर्न सिडनी युनिवर्सिटीचे डॉ सचिन चव्‍हाण, पुणे येथील डॉ माधुरी पगारिया,  किन्‍स युनिवर्सिटचे डॉ अमोल घोडके, नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे डॉ चिना बाबु नाईक, काश्‍मीर कृषि विद्यापीठातील डॉ साजेद माजिद झरगर आदी मार्गदर्शन करणार आहेत. 

डॉ गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन आयोजक डॉ अच्‍युत भरोसे यांनी केले तर आभार डॉ के एम शर्मा यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ अनिकेत वाईकर, डॉ स्‍वाती मुंडे, श्री सचिन कराड, श्रीमती अपुर्वा वाईकर आदींनी परिश्रम घेतले.

Friday, March 13, 2020

जागतिक शेतीची वाटचाल काटेकोर शेती कडुन डिजिटल शेतीकडे .....मलेशिया येथील शास्‍त्रज्ञ डॉ सिवा बालसुंदरम

वनामकृवित डिजिटल शेतीवर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन
सद्या जागतिकस्तरावर काटेकोर शेती प्रचलित होत असुन हीच शेती आता डिजिटल शेतीकडे वाटचाल करित आहे. भारतातील बहुसंख्य शेतकरी अल्पभुधारक असुन हे डिजिटल तंत्रज्ञान त्‍यांना आर्थिकदृष्टया किफायतीशीर असले पाहिजे, असे प्रतिपादन मलेशिया येथील पुत्रा विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ सिवा बालसुंदरम यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांच्‍या वतीने दिनांक 13 ते 15 मार्च दरम्‍यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी (दिनांक 13 मार्च रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अमेरिकेच्या राष्ट्रीय आंतरीक्ष संस्थेचे अंतरीक्ष राजदूत श्री अविनाश शिरोडे होते, व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, खरगपुर येथील आयआयटीचे प्रा आर माचावरम, प्रा ए के देब, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ सिवा बालसुंदरम पुढे म्‍हणाले की, एका बाजुस वाढती लोकसंख्‍या असुन दुस-या बाजुस जागतिक हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत आहे. पंरतु संगणकीय क्षमता प्रचंड वाढत असुन प्रत्‍येकाच्‍या हातात मोबाईलच्‍या माध्‍यमातुन एक शक्‍तीशाली यंत्र आले आहे. डिजिटल शेतीत या स्‍मार्टफोनचा मोठा उपयोग होणार आहे. सद्यस्थितीत विदेशात शेतीत डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, रोबोट, ड्रोन, स्‍वयंचलित यंत्र याचा वापर होत आहे. आज तरूण शेतीपासुन दुर जात आहेत, परंतु डिजिटल शेतीमध्ये तरूणांना आकर्षीत करण्‍याची ताकत आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

श्री अविनाश शिरोडे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आजच्‍या जागतिक हवामान बदल व कमी होत जाणारी साधनसंपत्‍ती पाहाता, भविष्‍यात मानव अंतरीक्षात वस्‍तीकरण्‍यासाठी स्‍थंलातरित होईल, याकरिता लवकरच नासा चंद्रावर वस्‍तीकरण्‍यासाठी अभियान राबविणार असुन अंतरिक्षात शेती ही संकल्‍पनाही राबविणार आहे. अंतरिक्ष शेतीबाबत ही कृषि विद्यापीठास संशोधनास वाव आहे.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतीतील मनुष्‍यांचे कष्‍ट कमी करण्‍यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. डिजिटल शेती संकल्‍पनेस चालना देण्‍याकरिता जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषदेने परभणी कृषि विद्यापीठास सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्पास मान्‍यता दिली, यात विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी यांना देश व विदेशातील डि‍जिटल तंत्रज्ञान समजुन घेण्‍यास मोठी मदत होऊन डिजिटल शेती संशोधनास मोठी चालना मिळेल. आजही मोठी लोकसंख्‍या अन्‍नावाचुन भुकेली आहे तर दुस-या बाजुस मोठया प्रमाणात शेतमालाची नासाडी होत आहे. या शेतमालाचे मुल्‍यवर्धन करणे, शेतमाल प्रक्रिया यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यास मोठा वाव आहे. डिजिटल तंत्रज्ञानामाध्‍यमातुन शेतीनिविष्‍ठाचा कार्यक्षम वापर व उत्‍पादन खर्च कमी करणे शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी केले  तर आभार प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी मानले. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीतील उपयुक्त ठरू शकणारे कृत्रिम बुध्दीमत्त, डिजिटल साधनेयंत्रमानवड्रोनव्दारे फवारणी आदीं विषयावर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असुन यामुळे डिजिटल शेती संशोधनास चालना मिळणार आहे. कार्यशाळेचे उदघाटन डिजिटल पध्दतीने दिप प्रज्वलन करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाच्या पोर्टलचे विमोचन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मो

नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्यता प्राप्‍त व जागतिक बॅक अर्थसहाय्यीत 'कृषि उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानवड्रोन व स्वयंचलित यंत्राव्दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्प परभणी कृषि विद्यापीठास सन 2022 पर्यंत मंजुर झाला असुन पुढील दोन वर्षात यंत्रमानवड्रोन व स्वयंचलीत यंत्र सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्यी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहेया केंद्राव्दारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहेतयात डिजिटल शेतीच्या तंत्रज्ञानात्मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेनयुक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहेतसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणुन सहकार्य लाभणार आहेप्रकल्पास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहेयात पन्नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा भारत सरकार कडुन भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या माध्यमातुन प्राप्त होणार आहे. प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे असुन या प्रकल्‍पाचे चार उप घटक आहेत, याचे डॉ उदय खोडके, डॉ राजेश कदम, डॉ संजय पवार, डॉ भगवान आसेवार हे प्रमुख आहेत. तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम तयार करण्यात आली असुन इतर ४० संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग राहणार आहे. 
शास्त्रज्ञ मा डॉ सिवा बालसुंदरम

मा श्री अविनाश शिरोडे 
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण