Wednesday, August 27, 2025

वनामकृवि आणि आय.सी.ए.आर. - नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (ICAR-NBPGR), नवी दिल्ली यांच्यात सामंजस्य करार

पिकांच्या जनुक संसाधन संवर्धन व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासासाठी सामंजस्य करार... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि आय.सी.ए.आर. - नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (ICAR-NBPGR), नवी दिल्ली यांच्यातील सामंजस्य करार (MoU) आज, दिनांक २७ ऑगस्ट रोजी संपन्न झाला.

या कराराच्या निमित्ताने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ परिसरातील विविध संशोधन केंद्रांना भेट देण्यात आली. या प्रसंगी आय.सी.ए.आर. - नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्लीचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र प्रताप सिंह आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कुलदीप त्रिपाठी यांनी विद्यापीठातील मध्यवर्ती प्रक्षेत्र, बायोमिक्स युनिट, हवामान संशोधन केंद्र आणि अन्न तंत्र महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान विविध संशोधन उपक्रम, चालू प्रकल्प आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून विद्यापीठातील प्रगत संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या सामंजस्य करारामुळे पिकांच्या जनुक संसाधनांचे संवर्धन, नवीन वाणांची निर्मिती, हवामान बदलास अनुरूप संशोधन तसेच नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या क्षेत्रांत नवे दालन खुले होणार असल्याचे सांगितले. या सहकार्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या संशोधन प्रकल्पांसह संशोधकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामंजस्य करार आणि भेटीदरम्यान संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ राहुल रामटेके, सहयोगी संचालक (बियाणे) तसेच कृषि वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, कृषिशास्त्र विभाग प्रमुख तथा मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, कृषि रसायनशास्त्र व मृदा विज्ञान विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडिकर, हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे तसेच कृषि वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.