परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार
शिक्षण संचालनालय मार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत रब्बी हंगाम २०१४ मध्ये
एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प संपूर्ण मराठवाडा विभागात
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्या
मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यात विभागातील आठही जिल्हयात हरभरा पिकात १६० एकर क्षेत्रावर
व रब्बी ज्वार पिकात २०० एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले
आहे. हा उपक्रम विद्यापीठाच्या विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राच्या माध्यमातुन
व कृषि विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पातंर्गत कृषि
तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे हिंगोली जिल्हयातील धारखेडा येथे ४० प्रात्यक्षिके
देण्यात आली असुन यासाठी बियाणे, बीजप्रक्रियेसाठीचे बुरशीनाशके, जिवाणु
संवर्धने, मित्र बुरशी संवर्धने शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या
अनुषंगाने दि २२ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते लाभार्थी शेतक-यांना हरभरा पिकाच्या आकाश व विजय या वाणांच्या
बियाण्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यापीठ निर्मित रायझोबीयम व पीएसबी जिवाणु
संवर्धके व ट्रायकोडर्मा मित्रबुरशीचे वाटप करण्यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ बी
व्यंकटेश्वरलु यांनी उपस्थित शेतकरी बांधवानी बीजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची
पेरणी करवी व उपलब्ध सिंचन कार्यक्षम पध्दतीने वापर करावा, जमिनीतील ओलावा दिर्घकाळ
टिकवुन ठेवण्यासाठी आंतरमशागत, मातीचे व इतर आच्छादनाचा वापर करण्याचा सल्ला
दिला. विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत
माहिती दिली तसेच सापळा पिके, पक्षी थांबे व जैविक किटकनाशकांचा वापर शेतक-यांनी करावा
असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कुलसचिव डॉ डी एल जाधव, तंत्र अधिकारी डॉ के
व्ही देशमुख, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ आनंद गोर, तालुका कृषि अधिकारी डॉ डी
बी काळे, शेतकरी अशोक क-हाळे, रामप्रसाद क-हाळे, शिवाजी क-हाळे हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ आनंद गोरे, उदय वाईकर, अशोक पंडीत गणेश कटारे आदींनी
परिश्रम घेतले.