परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने दि २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली तसेच शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले होते तर सहयोगी अधिष्ठाता (निम्नस्तर शिक्षण) डॉ डि बी देवसरकर, कुलसचिव डॉ डि एल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ अशोक ढवण म्हणाले की, राष्ट्रीय स्वच्छता अभियान संपुर्ण भारतात पुढील पाच वर्ष राबविण्यात येणार असुन तरूणांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जागरूक राहीले पाहीजे. संपुर्ण देश स्वच्छता अभियानात सामील होत असुन तरूणांनी यात आपले योगदान दयावे. महात्मा गांधी यांनी आधी स्वत: चांगल्या गोष्टी आचरणात आणल्या व नंतर सांगितल्या हे लक्षात ठेवा. या स्वच्छता अभियानाची सुरूवात वैयक्तीक स्वच्छते होते यांची जाण ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अनिस कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रविण तिडके यांनी केले. अभियानानिमित्त विद्यापीठ परिसरात रॅली काढण्यात येऊन विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थीनी व अधिकारी-कर्मचारी यांनी श्रमदान करून विद्यपीठ परिसर स्वच्छ करण्यात आला.