वनामकृवित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
आयोजीत प्रसिध्द कवी प्रा संतोष पवार यांचे प्रतिपादन
भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर हे असामान्य व्यक्तीमत्व होते, बाबासाहेबांच्या शेती व
शेतकरी विषयक विचारांचा कृषि विद्यापीठात अभ्यास व्हावा. त्याकाळी
बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्पाची कल्पना मांडली होती. बाबासाहेबांची दृष्टी ही
काळाच्या पुढे पाहणारी होती, असे विचार प्रसिध्द कवी प्रा संतोष पवार यांनी
मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असेलल्या कृषि महाविद्यालयाच्या
जिमखान्याच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि
१३ एप्रिल रोजी आयोजीत व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण होते तर सहयोगी
अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्ठाता
डॉ. के आर कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ.
बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी प्रतिनिधी नितीन थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा संतोष पवार पुढे म्हणाले की, आजचा युवक चंगळवादाकडे झुकत असुन
बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचे व विचारांचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे. बाबासाहेबांनी
तयार केलेल्या राज्यघटनेत सामाजिक समता, न्याय, बंधुता, शिक्षणाचा हक्क आदी तरतुदींचा
लाभ आज आपण सर्वजण उपभोगत आहोत. जो पर्यंत देशात जातीविरहीत समाज निर्माण होणार
नाही, तो पर्यंत देशाची खरी प्रगती साधता येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी
केले.
अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्हणाले की, भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते, त्यांच्या विचारांचे चिंतनासाठीच
जयंती साजरी करण्याचा उद्देशच असतो, विद्यार्थींनी बाबासाहेबांसारखेच ज्ञान लालसाचे
अनुकरण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाज
संघटीत करण्याचे महान कार्य केल्याचे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे सह्योगी
अधिष्ठाता डॉ धर्मराज गोखले यांनी आपल्या भाषणात केले.
विद्यार्थी विशाल राठोड व जीवन धोत्रे
यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आपले विचार मांडले तर प्रमुख पाहुण्यांचा
परिचय तुकाराम मंत्रे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी तर सुत्रसंचालन प्रा विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास
विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण |