वनामकृविच्या कृषि महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य व्याख्यानाचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी मांडलेल्या अनेक तत्वांचा
अभ्यास जगात केला जातो. यावर्षी युनोमध्ये डॉ. बाबासाहेब यांची १२५ वी जयंती
पहिल्यांदाच साजरी करण्यात येणार आहे. शेतक-यांच्या शोषणाबाबत परखड विचार
मांडुन शेतक-यांच्या समस्या व त्यावरील उपाय यावर त्यांनी अभ्यासपुर्ण मते
मांडली, त्या आजच्या परिस्थितीतही उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. प्रल्हाद
लुळेकर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या
वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीचे औचित्य साधुन औरंगाबाद येथील प्राध्यापक डॉ प्रल्हाद लुळेकर यांच्या व्याख्यानाचे
आयोजन दिनांक ७ एप्रिल रोजी करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी
परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, विभाग प्रमुख
डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. राकेश अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राध्यापक डॉ प्रल्हाद लुळेकर पुढे म्हणाले की, लहान
शेतक-यांना शेतसारा लावु नये, निराधारांना पेन्शन योजना, पाणी प्रश्नावर नदीजोड प्रकल्प,
अश्या शेतकरी हिताच्या अनेक संकल्पना त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी मांडल्या. शेतक-यांची
मुले भविष्यात अधिकारी झाले पाहिजेत. देशाचे पहिले पाटबंधारे मंत्री असतांना त्यांनी
दामोधर व्हॅली व भाक्रानानगल योजना पुर्ण केल्या. पाणी आडवुन शेतीस पाणी देणे,
पाण्याव्दारे वीज निर्मीती, धरणांच्या ठिकाणी पर्यटनस्थळांची निर्मीती,
जलवाहतुक आदी उदिष्टे धरण बांधतांना विचारात घ्यावीत असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतक-यांचे प्रश्न सोडविले नाहित तर शेतकरी आत्महत्या करतील असे भाकित महात्मा
फुले यांनी केले होते.
अध्यक्षीय समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाकरिता दयावा, हीच बाबासाहेबांना आदरांजली असेल असा सल्ला
विद्यार्थ्यांना दिला. कार्यकारी परिषदेचे माननीय सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले
यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवराज घाटुळ यांनी तर आभार प्रदर्शन विशाल
राठोड यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.