Sunday, November 27, 2016

महाविद्यालयीन युवकांनी समाजात सकारात्‍मक बदल घडविण्‍यासाठी कार्य करावे ......नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महा‍निरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

वनामकृवित विसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धाचे शानदार उद्घाटन



महाविद्यालयीन युवकांनी समाजात सकारात्‍मक बदल घडविण्‍यासाठी कार्य करावे. देशात घडण्‍ाा-या समाज विघातक घटना रोखण्‍यांंसाठी युवकांनी पुढाकार घ्‍यावा, असे प्रतिपादन प्रमुख अतिथि नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महा‍निरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २७ नोव्‍हेंबर ते  डिसेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतरविद्यापीठ क्रीडा स्‍पर्धांच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्‍यासपीठावर जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुलरंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री अनंतराव चौंदे, मा. श्री रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष पोलिस महा‍निरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद पुढे म्‍हणाले की, शेतकरी आत्‍महत्‍या, अन्‍नसुरक्षा, स्‍वच्‍छता मोहिम आदीं बाबतीत महाविद्यालयीन युवकांनी योगदान द्यावे. समाजात शांतता व सुरक्षितता राखण्‍यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात युवक प्रत्‍यक्ष क्रीडांगणावर कमी व स्‍मार्टफोनवर जास्‍त वेळ घालवत आहेत. आजकालच्‍या जीवनशैली मुळे अनेक शारिरीक व मानसिक व्‍याधी कमी वयातच युवकांना ग्रासत आहेत, हे रोखण्‍यासाठी विविध क्रीडा प्रकारात युवकांनी सक्रीय सहभाग घ्‍यावा. खेळाच्‍या माध्‍यमातुन आपले शरीर व मन तंदुरूस्‍त ठेवावे, असा सल्‍ला देऊन उत्‍कृष्‍ट आयोजनाबाबत विद्यापीठाची प्रशंसा केली.  
जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुलरंजन महिवाल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, क्रीडास्‍पर्धेच्‍या माध्‍यमातुन महाविद्यालयीन युवकाच्‍या विविध क्रीडा गुणांचा विकास होतो, महाराष्‍ट्र राज्‍यातील खेळाडुंना या क्षेत्रात मोठा वाव आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सहभागी खेळाडुंना शिस्‍तीचे पालन करून आपल्‍या क्रीडा गुणांचे प्रदर्शन करण्‍याचा सल्‍ला दिला.   
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी स्‍वागतपर भाषण करून खेळाडुंना शपथ दिली तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डि जी मोरे व डॉ आशा आर्या यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांनी केले.
उदघाटन प्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून क्रीडाज्‍योत पेटविण्‍यात आली. याप्रसंगी विविध विद्यापीठाच्‍या संघानी पथसंचलन केले. स्‍पर्धेत राज्‍यातील २० विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले असुन यात कबड्डी, बास्‍केटबॉल, व्‍हॉलीबॉल, खो-खो व मैदानी स्‍पर्धा या खेळांचा समावेश आहे. राज्‍यातुन व स्‍थानिक पातळीवर दोनशे पंच व तीनशे संघ व्‍यवस्‍थापक सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणा-या क्रीडा स्‍पर्धेत सहभागी खेळाडुंना मोफत वाय-फायची सुविधा पुरविण्‍यात आली आहे. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे लोकनृत्‍य वाघ्‍यामुरळीचे सादरिकरण करण्‍यात आले. स्‍पर्धेनिमित्‍त एड्स विषयी प्रबोधनपर प्रदर्शनीचे तसेच समारोपाच्‍या दिनी रॅलीचेही आयोजन करण्‍यात आले आहे
मार्गदर्शन करतांना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

मार्गदर्शन करतांना भारतीय कृषि संशोधन परिषदेचे मा. डॉ. जी. व्‍यकंटेश्‍वरलु 

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी मा. श्री राहुलरंजन महिवाल