वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषि
विभाग, हिंगोली यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील
कृषि विज्ञान केंद्रात सकाळी ११.०० वाजता महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन व
अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री मा. ना. श्री.
दिलीप कांबळे यांच्या हस्ते होणार असुन हिंगोली लोकसभा संसद मा. खा. श्री. राजीव
सातव व हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. लक्ष्मीबाई यशवंते हे विशेष
अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ.
बी. व्यंकटेश्वरलु राहणार असुन विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. अब्दुला खान
दुर्राणी, मा. आ. श्री. विक्रम काळे, मा. आ. श्री. सतीश चव्हाण, मा. आ. श्री.
रामराव वडकुते, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. जयप्रकाश मुंदडा, मा. आ. श्री.
तानाजी मुटकूळे, मा. आ. डॉ. संतोष टारफे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. एच.
पी. तुम्मोड, कोल्हापुर येथील स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या मा. कांचनताई परूळेकर
आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे
काबाटकष्ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्न व फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा
विकास आदी विषयांवर विद्यापीठाचे तज्ञ मार्गदर्शन करणार असुन नाबार्डच्या वतीने
कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचेही
आयोजन करण्यात आले असुन यात विद्यापीठ तंत्रज्ञानावर आधारित विविध दालनांचा व
महिला बचत गटाच्या दालनांचा समावेश राहणार आहे. सदरिल मेळाव्यास शेतकरी महिलांनी
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ.
बी. बी. भोसले, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
श्री विजय लोखंडे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा विशाला पटनम
यांनी केले आहे.