“अण्विक मृद विज्ञान” यावर भोपाळ येथील मृद शास्त्रज्ञ डॉ. तपन अधिकारी यांनी केले मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था नवी दिल्ली शाखा परभणी व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. आर.एस. मुर्ती स्मृती ऑनलाईन व्याख्यानाचे दिनांक 30 सप्टेबर रोजी आयोजन करण्यात आले होते, यात अण्विक मृद विज्ञान यावर भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. तपन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे तर सहअध्यक्ष माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील हे होते.
मार्गदर्शनात डॉ. तपन अधिकारी यांनी मृदशास्त्रातील नविनतम विषयास अनुसरुन मृद विज्ञानातील भविष्यातील संशोधनाची दिशा स्पष्ट केली. माती, पिके यातील जीवभौतिक व रासायनिक अभिक्रियांचा परस्पर संबंधावरील संशोधनाचे सादरीकरण दिले. जमिनी कशा प्रकारे होते याची माहिती दिली. आण्विक मृद विज्ञानात संशोधन पदव्युत्तर संशोधकांस व शास्त्रज्ञास संधी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा.डॉ. अशोक ढवण यांनी सेंद्रीय घटक पदार्थाचे विघटन आणि ह्रुमस पदार्थांचे उत्पादन आणि अन्नद्रव्यांचा परस्पर संबंधाचा विस्तारीत अभ्यास या अण्विक शास्त्रात संशोधनाच्या अनेक संधी असल्याचे म्हणाले तसेच कै. डॉ. आर.एस. मुर्ती यांचे मृदशास्त्रातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व या संशोधनाविषयी मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. विलास पाटील मृदा शास्त्रातील मातीचे मुळ संशोधन आण्विक शास्त्राव्दारे अभ्यासता येते असे स्पष्ट केले आणि आधुनिक दुरस्थ संवेदन उपकरणांचा या आण्विक मृदशास्त्रास मोठा उपयोग होतो असे ते म्हणाले.
कार्यक्रमात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीचे अध्यक्ष तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी कै. डॉ. आर.एस. मुर्ती यांच्या मृद विज्ञानातील योगदानाबाबत माहिती देऊन प्रमुख पाहुण्याचा परिचय दिला. सुत्रसंचालन सचिव तथा प्राध्यापक डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. स्नेहल शिलेवंत, अजय चरकपल्ली आदीसह विभागातील कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी सहकार्य केले. अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाया स्मृती व्याख्यान मालेचा मान यंदा परभणी विद्यापीठास मिळाला. ऑनलाईन व्याख्यानात संपुर्ण देशातुन मृद शास्त्रज्ञ, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी असे दोनशे पेक्षा जास्त सहभाग नोंदविला.