एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थी पात्र होण्याची विद्यापीठाच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात पहिलीच वेळ
विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा
नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या वतीने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परिक्षा – नेट परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेतील १५१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असुन परभणी कृषि विद्यापीठाच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात तीन विद्यार्थी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ व्दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व समकक्ष पदाकरिता राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. एकुण १५१ विद्यार्थी पैकी परभणी कृषि महाविद्यालयाचे ८५ विद्यार्थ्यांचा समावेश असुन लातुर कृषि महाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी तसेच बदनापुर कृषि महाविद्यालयाचे १२ विद्यार्थी आहेत.
परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी नेट परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन यात प्रशांत पावसे व विर शैलेश हे विद्यार्थी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळ व्दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी नेट परिक्षेत उत्तीर्ण झाले असुन अजय सातपुते हा कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
परभणी कृषि महाविद्यालयाचे ८५ विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि विद्याशाखेच्या २९, कृषि हवामानशास्त्राच्या १२, कृषि किटकशास्त्राच्या ११, विस्तार शिक्षण विभागाच्या १०, कृषि वनस्पतीशास्त्राच्या ८, मृदविज्ञान व रसायनशास्त्राच्या ५, उद्यानविद्याच्या ४, कृषि अर्थशास्त्राच्या ४, तर वनस्पती रोगशास्त्राच्या २ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. लातुर कृषि महाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि किटकशास्त्राच्या १५, कृषी विद्याच्या ११, मृदा विज्ञान व रसायनशास्त्राच्या ४, कृषि वनस्पतीशास्त्राच्या २, कृषि अर्थशास्त्राच्या १, उद्यानविद्याच्या १ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. बदनापुर कृषि महाविद्यालयाचे १२ विद्यार्थी यशस्वी झाले असुन यात कृषि विद्या शाखेच्या ८ तर कृषि किटकशास्त्राच्या ४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सदरिल यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करित असुन नेट परीक्षेतील यश म्हणजे विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा आहे. गेल्या दिड वर्षापासुन कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या काळाचा विद्यार्थ्यांनी सदोपयोग केला, प्राध्यापकांनीही ऑनलाईन माध्यमातुन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. याचाच अर्थ राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक दर्जेचे शिक्षण विद्यापीठातुन दिले जात असुन विद्यापीठाचा शैक्षणिक स्तर उंचावल्याचे हे द्योतक आहे. तसेच कृषि संशोधन व कृषि शिक्षण क्षेत्रात करियर करण्याकडे विद्यार्थ्याचा ओढा वाढत आहे, असेही ते म्हणाले. सदरिल यशाबाबत शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ अंगद सुर्यवंशी, प्राचार्य डॉ राकेश अहिरे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापकांचे माननीय कुलगुरू यांनी अभिनंदन केले. सदरिल १५१ हा आकडा अंतिम नसुन यात अधिक भर पडु शकते.