Saturday, October 16, 2021

कापुस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

कापसातील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा....वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सद्यपरिस्थितीत कपाशी बोंड लागण्याच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत असुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसुन येत आहे. गुलाबी बोंडअळी ही अतिशय नुकसानकारक कीड असुन ही बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, होणारे नुकसान टाळण्‍यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

गुलाबी बोंडअळी अंडयातून निघुन ताबडतोब कळया, फुले बोंडाना छोटे छिद्र करून आत शिरते. सुरूवातीला अळया पाते, कळया, फुलांवर उपजीवीका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलल्या कळीसारखी दिसतात, अशा कळयांना डोमकळया म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्क होताच फुटतात गळून गेलेली बोंडे सडतात. बोंडामध्ये एकदा का ही अळी शिरली की तिची विष्ठा बोंडाचे बारीक कण यांच्या साहाय्याने ही छिद्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी रूई कातरून नुकसान करते. त्यामुळे रूई सडते खराब होते. प्रादुर्भावग्रस्त बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटत नाहीत. अळी बोंडातील बिया खाते एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते, त्यामुळे रूईची प्रत खालावते.

उपाय योजना

बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते बोंडे जमा करून नष्ट करावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी डोमकळया दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळ्यांच्या सर्वेक्षणासाठी हेक्‍टरी कामगंध सापळे तर मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्‍टरी २५ सापळे लावावेत. अळीच्‍या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रती दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायेकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजिवी कीटकाच्या अंडयाचे एकरी २ ते ३ कार्ड फुलोरा बोंडअवस्थेत पिकावर लावावेत जेणेकरून अंडी अवस्थेत बोंडअळीचा नाश होईल.

शेतात प्रती कामगंध सापळा ८-१० पतंग सलग रात्री किंवा ते १० टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे, आढळल्‍यास ही किडीची आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. ही पातळी ओलांडल्यानंतर प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन ९.५ झेडसी ४ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३० अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६० हे किडकनाशक ५ मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. कपाशीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी व्यवस्थापन करावे असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन यांनी केले आहे.

प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलली कळी - डोमकळी