Friday, January 19, 2024

बदलत्‍या हवामान परिस्थितीत बांबु लागवड एक चांगला पर्याय ....... महाराष्‍ट्र राज्‍य कृषि मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल यांचे प्रतिपादन





कार्बन उत्सर्जन वाढल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम ऋतुचक्रावर झाला आहे. हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे, वाढते तापमान, अनिश्चित पर्जन्‍यमान यामुळे कृषि उत्‍पादनात अनिश्चितता निर्माण होत आहे. भविष्‍यात शेतीमाल उत्‍पादनात मोठी घट होण्‍याचे भाकित अनेक जागतिक संस्थांनी केले आहे. बदलत्‍या हवामानात शाश्‍वत शेती करिता कृषि संशोधनात भर दयावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍य कृषि मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल यांनी दिनांक १८ जानेवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  यावेळी माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि, यावेळी शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री पी के काळे, विभाग प्रमुख डॉ दिगांबर पेरके, डॉ सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.

मा श्री पाशा पटेल पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत शेतकरी बांधवाकरिता बाबु लागवड उपयुक्‍त ठरू शकेल. बांबु पासुन अनेक वस्‍तु बनवु शकतो, घरातील व कार्यालयातील फर्निचर बनविण्‍याकरिता बांबुला प्रोत्‍साहन दिले पाहिजे. बांबुचे झाड सर्वाधिक काबॅन डायऑक्‍साईड शोषुन घेते, त्‍यामुळे तापमान कमी करण्‍यासाठी बांबु लागवड उपयुक्‍त ठरेल. बांबुपासुन आकर्षक फर्निचर, विविध वस्‍तु तयार तसेच इथेनॉल निर्मिती शक्‍य आहे. बांबू लागवडीच्‍या स्‍वरूपात शेतकरी बांधवाना एक चांगला पर्याय आहे. देशातील विविध राज्‍यात विविध पिकांच्‍या लागवड खर्च मुल्‍यामापनामुळे लागवडी खर्चात मोठी तफावत आढळते, याबाबत अभ्‍यास करण्‍याची गरज आहे.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, लवकरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृषि विद्यापीठात राबविण्‍यात येणार असुन कौशल्‍य विकास आधारीत विविध अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येत आहेत. यात बांबु लागवड तंत्रज्ञान व फर्निचर निर्मिती याचा समावेश करण्‍यात येईल. बांबुचा वापर प्राचीन काळी आपण करतच होतो, त्‍याच प्रमाणे बाबु आधारीत अनेक बाबी आपण करू शकतो. बदलत्‍या हवामानात अनूकुल सौरऊर्जा आधारीत अॅग्रीपीव्‍ही, शेततळे यासारख्‍या तंत्रज्ञान विकास व संशोधन यावर कृषि विद्यापीठ कार्य करीत असल्‍याचे ते म्‍हणाले. 

बैठकीचे सुत्रसंचालन डॉ सचिन मोरे यांनी केले. बैठकीस प्राचार्य डॉ व्‍ही एस खंदारे,  प्रा के एल कातकडे, डॉ अनिल गोरे, डॉ पी आर झंवर, डॉ हरिश आवारी, डॉ के एस बेग, डॉ एस डि विखे आदी उपस्थित होते.