वनामकृवित ७५ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
देशाच्या प्रगतीमध्ये कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असुन आज देश अन्नधान्यात स्वयंपुर्ण झाला तर फळ भाजीपाला उत्पादनात आघाडीवर आहे. याचे सर्व श्रेय शेतकरी बांधवाचे परिश्रम, शासनाचे धोरण, कृषि संशोधनाची जोड यामुळे शक्य झाले आहे, म्हणुनच जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हा नारा दिला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रविण निर्मल, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ व्ही एस खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी प्रजासत्ताक दिनांच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पुढे म्हणाले की, कृषि क्षेत्राच्या विकासात कृषि संशोधनाचे महत्व असुन कृषि तंत्रज्ञानाच्या आधारेच देशात हरित क्रांती झाली. परभणी कृषी विद्यापीठाने संशोधनाव्दारे विविध पिकांच्या अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले, त्यास शेतकरी बांधवामध्ये मोठी मागणी आहे. यावर्षी विद्यापीठातील साधारणत: दोन हजार एकर पडित जमीन लागवडी खाली आणण्यात आली, त्यामुळे विद्यापीठाचे बीजोत्पादन दुप्पट होण्यास मदत झाली आहे. कृषि डिजिटल तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स मध्ये परभणी कृषी विद्यापीठ कार्य करित आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवा पर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्याकरिता आपण यावर्षी ३५० पेक्षा जास्त गावात माझा एक दिवस माझा बळिराजासाठी उपक्रम राबविला, यामुळे कृषी शास्त्रज्ञ – शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ होत आहे.
याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.