भारतीय विश्वविद्यालय संघाद्वारा २८ मार्च ते १ एप्रिल २०२४ दरम्यान पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय युवक महोत्सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या संघातील विद्यार्थ्यांनी साक्षी गणेश डाकुलगे यांनी पोस्टर मेकिंग या ललित कलाप्रकारात रौप्य पदक प्राप्त केले तर सिध्दी देसाई यांनी मेहंदी या कलाप्रकारात कांस्य पदक प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचे आणि समन्वयकांचे अभिनंदन केले. या महोत्सवात देशभरातील ८ विभागातील एकूण ११० विद्यापीठे सहभागी झाली होती. या महोत्सवात वनामकृविच्या सहभागी संघाची निवड ही २२ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे पार पडलेल्या ३७ व्या पश्चिम विभागीय युवक महोत्सवातून मेहंदी, पोस्टर आणि मातीकाम या तीन ललित कला प्रकारातून झाली होती. अशाच प्रकारे देशभरातून आलेल्या विविध विभागातील निवडक संघांशी स्पर्धा करत वनामकृवि परभणीच्या संघातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करून चमकले. विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी विद्यार्थ्यांचे आणि समन्वयकांचे अभिनंदन केले. समन्वयक म्हणून डॉ. वैशाली भगत यांनी कार्य केले त्यांना डॉ. सचिन पवने यांनी सहकार्य केले.