कर्मचाऱ्याना प्रेरणा देवून पूर्ण क्षमतेने कार्य करून घ्यावे लागेल.....कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संचालक संशोधन या पदावरून डॉ. जगदीश जहागीरदार हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च रोजी निवृत्त झाले आणि त्यांच्या जागेवर डॉ. खिजर बेग यांना नियुक्ती विद्यापीठ प्रशासनाने केली. यानिमित्त डॉ. जगदीश जहागीरदार यांना निरोप तर डॉ. खिजर बेग यांचा स्वागत समारंभ संशोधन संचालनालयाच्या वतीने दिनांक ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष्यस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी डॉ. जगदीश जहागीरदार यांनी विद्यापीठास दिलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल आणि संचालक संशोधन म्हणून अल्पकाळात केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले आणि त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल यथोचित सन्मान करून अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नवनियुक्त संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांचेही स्वागत करून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्याकडून संचालक संशोधन म्हणून कार्य करत असताना आपल्या आणि विद्यापीठाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि एकूणच कमी मनुष्यबळाची समस्या व इतर आव्हाने आहेत. यासाठी उपलब्ध मनुष्यबळास प्रेरणा देवून पूर्ण क्षमतेने कार्य करून घ्यावे लागेले असे सूचित करून राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थेशी संपर्क ठेवून विद्यापीठामध्ये संशोधनासाठी प्रकल्प मिळविण्याचा प्रयत्न सतत ठेवावा तसेच संशोधन लेख, प्रकाशने वाढवून विध्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हित जपावे व विद्यापीठाचे नांव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेवून जाण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ. जगदीश जहागीरदार यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यापीठामध्ये केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल आणि संचालक संशोधन म्हणून मिळालेलेल्या संधीबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले तसेच विद्यापीठ आणि विद्यापीठ प्रशासनाविषयी ऋण व्यक्त केले. याबरोबरच डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठ प्रशासनाचे संचालक संशोधन म्हणून दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले आणि ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडून विद्यापीठ प्रशासनाच्या आशा पूर्ण करू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमामध्ये संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, उपसंचालक सशोधन (अर्थ) डॉ. दिगंबर पेरके, उपसंचालक (बियाणे) डॉ. शिवाजी म्हेत्रे, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी आणि सौ. जागृती जहागीरदार यांनी सत्कारमूर्ती विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रांचालन श्री. ऋषिकेश औढेकर यांनी केले तर आभार डॉ. मदन पेंडके यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.