वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलानुरूप शेती व्यवस्थापन या ऑनलाईन कार्यक्रम दिनांक ०५ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि हे होते. मार्गदर्शनात कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, आज हवामान बदलानुरूप शेती व्यवस्थापन कसे करावे हा महत्वाचा विषय असून जिल्हा पातळी ते राज्य पातळी पर्यंत हवामान बदलाचा सुक्ष्म अभ्यास करून हवामान बदलाला सामोरे जाणे गरजेचे आहे. राज्यात जिल्हानिहाय हवामानाच्या घटकात मोठी विविधता आढळून येत आहे. पावसाचे प्रमाण व वितरण यात तफावत दिसून येत आहे. दिवस व रात्रीच्या तापमानातही बदल दिसून येत आहेत. अशावेळी शेती क्षेत्रात या बदलत्या हवामानाकडे तांत्रिक दृष्टीने बघून याकडे समस्या म्हणून न बघता त्याचे रुपांतर संधीत करण्यासाठी शेती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर भविष्यात करावा लागणार आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजन व व्यवस्थापनावर भर देण्याची गरज आहे. पीकशास्त्र, मृदाशास्त्र, हवामान शास्त्र, बीजशास्त्र, कीटकशास्त्र, जल विज्ञान, रोगशास्त्र अशा विविध विषयांचे ज्ञान आणि तंत्रज्ञान एकात्मिक पध्दतीचे अवलंबन करून हवामान बदल समस्यांवर मात करणे काळाची गरज आहे. म्हणून शास्त्रज्ञांनी विविध विषयांच्या ज्ञान व तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर करून शेतकऱ्याचा समस्यांवर विविध तंत्रज्ञानरुपी समाधानाची थाळी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांच्या सध्यस्थितीत समस्या सोडविण्यासाठी कार्यरत रहावे, असे अवाहन त्यांनी केले.
हवामान बदलानुरूप शेती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनात डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी सांगितले कि, केवळ जिल्हा व राज्याचा किंवा देशाचा नाही तर जागतिक प्रश्न म्हणून पुढे आला आहे. हवामान बदलामध्ये जलचक्र व जलचक्रात होणारा बदल याची भूमिका महत्वाची आहे. आज मानवी वापरासाठी केवळ ०.०१ टक्के पाणी उपलब्ध आहे. एकूण सूर्यप्रकाश, ढगांचे प्रमाण, वातावरण ओझोन द्वारे शोषले जाणारा सूर्यप्रकाश याबाबतीच्या प्रमाणानुसार तापमान वाढ व त्यातून दुष्काळ, अतिवृष्टी अशा समस्यांत वाढ होत आहे. हवामान बदलास सामोरे जातांना योग्य पिकांची व पीक पद्धतींची निवड, मृद व जलसंधारण, आंतरपीक पद्धती, संरक्षित सिंचन आणि त्याबरोबरच निविष्ठांचा योग्य व कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या निविष्ठांचा वापर कमी करणे यावरही भर देणे गरजेचे आहे. भविष्यात यांत्रिकीकरण, स्वच्छ व जैविक ऊर्जा, कृत्रीम व बुद्धिमत्ता यातून खते व पाण्याची बचत यावरही भर देण्याची गरज आहे. अशावेळी वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती, उदा. एकात्मिक शेती पद्धती, शाश्वत शेती पद्धती, शून्य मशागत, सेंद्रिय शेती पद्धती यांच्यावर भर देण्याची गरज आहे. याबरोबरच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा व पर्यायांचा वापर करणे आवश्यक आहे असे नमूद केले.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून शेतीविषयक समस्या विचारल्या त्यास विद्यापीठातील शास्त्रज्ञानी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंग, युटूब, फेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.