महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे ...कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू
मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा
एक दिवस माझ्या बळीराजा सोबत हा अभिनव उपक्रम दिनांक ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण
मराठवाड्यात राबविण्यात आला. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके,
शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण ११ चमूमधिल
२८ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास ६०० शेतकऱ्यांना विविध
विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण केले.
विस्तार शिक्षण संचालनालयातील कृषी तंत्रज्ञान
माहिती केंद्र व
महिला विकास महामंडळ यांच्यातर्फे गंगाखेड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन आयोजित केले
होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले
होते. यावेळी बोलताना माननीय कुलगुरू म्हणाले की, महिलांचा शेतीमध्ये पुरुषांच्या
बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षाही अधिकच वाटा आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या
स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जर त्या स्वतः स्वस्थ राहिल्या तर
त्यांचे घर स्वस्थ राहील,
त्यांचे गाव स्वस्थ राहील, त्यांचे
राज्य स्वस्थ राहील आणि पर्यायाने आपला देश स्वस्थ राहील त्यामुळे महिलांनी
स्वतःकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आहार, आरोग्य
नेहमीच चांगले राहील याबद्दल महिलांनी काळजी घेतली पाहिजे. शासन सदैव महिलांच्या
विकासासाठी काम करते कारण जर महिलाची उन्नती झाली तर देशाची उन्नती ही होते. महिलांना
विद्यापीठाच्या संपर्कात राहण्याचे व विद्यापीठाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संचालक विस्तार शिक्षण डॉ. भगवान आसेवार, हे
बोलताना म्हणाले की विद्यापीठामध्ये सामुदायिक विज्ञान महाविद्यालय म्हणजेच
पूर्वीचे गृह विज्ञान महाविद्यालय हे महिलांसाठी विविध उपक्रम राबविते यामध्ये
शेतीमध्ये महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाची, अवजारांची
व साहित्यांची निर्मिती केली जाते, त्याचाही महिलांनी लाभ घ्यावा. महिलांच्या
गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत विद्यापीठ विविध प्रक्रिया
उद्योगाबद्दल प्रशिक्षणही देण्यास तयार आहे. याचाही लाभ घ्यावा असे नमूद केले.
विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी
येणाऱ्या रबी हंगामात गहू लागवड करताना उत्पादन वाढीसाठी लक्षात घ्यावयाच्या
महत्त्वाच्या बाबीमध्ये बियाण्याच्या निवडीपासून खत व्यवस्थापन, पाणी
व्यवस्थापन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर पटाईत यांनी यावेळी पीक संरक्षण करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या
बाबी याविषयी उपस्थित महिलांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी समस्येची सोडवणूक
करण्यासाठी विद्यापीठाच्या व्हाट्सअप हेल्पलाइन वापर करावा असेही आवाहन करण्यात
आले.
महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री. बालासाहेब झिंजाडे यांनी महिला विकास
महामंडळाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाला आत्माचे श्री. प्रकाश सोळंके, जनकल्याणीच्या
अध्यक्षा सौ. सुरेखा पवार,
शाखा व्यवस्थापक श्री. रमन, आत्माचे
श्री.डी.एल.सोनटक्के, व्यवस्थापक
श्रीमती भावना कुलकर्णी व श्रीमती जयश्री टेहरे तसेच श्रीमती सुनिता भिसे, श्रीमती
शीला साळवे व श्रीमती दिपाली पटणे या मान्यवराची उपस्थिती होती.
तसेच या उपक्रमांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या
प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चमू प्रमुख डॉ शंकर पुरी, प्रा.
ज्योती मुंडे, प्रा. प्रियांका स्वामी आणि
प्रा. मानसी बाभूळगावकर यांनी मौजे एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथे जिल्हा परिषद प्रशालेत
स्कूल कनेक्ट उपक्रम राबवून किशोर वयीन मुला मुलीनी घ्यावयाची काळजी व संतुलित आहार
यावर माहिती दिली तसेच शेतकरी महिलाना शेतीकामातील श्रम बचतीचे साधने, निरोगी जीवनासाठी
संतुलित आहार, मानसिक स्वास्थ आणि शेतीव्यवसायात सामाजिक माध्यमाचा योग्य वापर
याविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठातील शास्त्रज्ञानी श्री.मोहन टोले यांच्या
कापूस पिकास व श्री. उमाकांत कोल्हे यांच्या आंबा फळबागेस तसेच इतर ठिकाणी भेट
दिली.