Tuesday, October 8, 2024

आर्वी येथे कापूस संशोधन योजनेअंतर्गत जागतिक कापूस दिवस उत्साहात साजरा

 

जागतिक कापूस दिवसाचे औचित्य साधून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन योजना अंतर्गत किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प (आयआरएम) द्वारा आर्वी (ता. परभणी) येथे ७ ऑक्टोबर रोजी जागतिक कापूस दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जगभरातील अनेक देशांमध्ये कापूस हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगार मिळतो. महाराष्ट्राच्या अर्थकारणात, विशेषतः मराठवाडा विभागात, कापूस पिकाचे विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांना कापूस लागवडीबाबत नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आणि कापसाचे उत्पादन अधिक परिणामकारक बनवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कापूस पिकाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. विद्यापीठाद्वारा कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यातील आर्वी, खानापूर (ता. परभणी), लोणी, टाकळगव्हाण, आणि लिंबा (ता. पाथरी) या पाच गावांमध्ये कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत प्रती गाव १२ शेतकऱ्यांची निवड करून, एकूण ६० शेतकऱ्यांच्या शेतांवर कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके, ट्रायकोकार्ड्स, कामगंध सापळे आणि रासायनिक कीटकनाशकांसारख्या निविष्ठांचे वाटप करण्यात येत आहेत. याद्वारे कीड व्यवस्थापनाची योग्य पद्धती अवलंबता येतील.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना गटचर्चेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना अधिक रासायनिक खतांचा वापर टाळावा, विद्यापीठाच्या शिफारसीनुसार सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादनात वाढ कशी करता येईल याविषयी माहिती दिली. तसेच घनपद्धती लागवड, शेंडा खुडणे आणि योग्य खत व्यवस्थापन याविषयीही सल्ला दिला.

प्रकल्प समन्वयक तथा सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी कीड व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा करताना शेतकऱ्यांना फवारण्या कमी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन, कपाशीची फरदड टाळण्याचे महत्त्व, तसेच विविध कीटकनाशकांचा मिसळून वापर करणे कसे धोकादायक आहे याची माहिती दिली.

कार्यक्रमात आर्वी गावातील श्री.प्रकाश हारकळ, श्री.भगवान झटकवडे, श्री.शिवाजी हारकळ, श्री.विलास हारकळ, श्री.नारायण उगले, श्री.हरिभाऊ हारकळ, श्री.एकनाथ हारकळ, श्री.संजय कदम व श्री.प्रभाकर हारकळ यांच्यासह ४० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. प्रगतशील शेतकरी श्री. भगवान झटकवडे यांच्या कापूस प्रक्षेत्रास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. गोपाळ भिसे आणि तांत्रिक सहाय्यक श्री. नारायण ढगे यांनी विशेष प्रयत्न केले.