Saturday, October 12, 2024

रेशीम व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनावरील ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद

 शेती व्यवसायामध्ये उत्पन्नाचे पर्याय आवश्यक ….कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


हवामान बदलाच्या काळात शेती व्यवसायात पर्यायी उत्पन्नाचे स्रोत आवश्यक आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाच्या पंधराव्या भागात बोलत होते. या भागाचा विषय "रेशीम व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन" हा होता.

माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनात असे स्पष्ट केले की रेशीम व दुग्ध व्यवसाय (सिल्क आणि मिल्क) हे शेतीसाठी पर्यायी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यांनी सांगितले की, शेती व्यवसाय उभारण्यासाठी जमीन, बियाणे, खते, पाणी, यांत्रिकीकरण, ज्ञान आणि पैसा या सात बाबी महत्त्वाच्या आहेत. शेती व्यवसायास उभारण्यासाठी शासन विविध प्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असून, सिल्क आणि मिल्क प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी ग्रामपातळीवर रेशीम उद्योग स्थापन करून दुग्ध व्यवसायस चालना देण्यासाठी विद्यापीठ ज्ञानदानासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने कार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यानुभवातून हा कार्यक्रम राबवण्यासाठीही कार्य करण्यात येईल तसेच रेशीम व दुग्ध व्यवसाय या संयुक्त उद्योगास प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध करण्यात येईल. याद्वारे विद्यापीठाचे नवीनतम विस्तार कार्य साधण्यात येईल. शेतकरी देवो भवो या भूमिकेतून विद्यापीठाद्वारे दर मंगवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामधील लोकांचा उत्साही सहभागच या कार्यक्रमाचे महत्त्व विशद करतो.या कार्यक्रमाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेती व्यवसायात शाश्वतता निर्माण करण्यासाठी सिल्क आणि मिल्क प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासह पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उभारावा. याबरोबरच शेती व्यवसायात खर्च कमी करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी विविध उपाययोजना सुचवून त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी असे नमूद केले.

सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगितला. तदनंतर सिल्क आणि मिल्क या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना किफायतशीर जोडधंदा उभारता येईल असे नमूद करून रेशीम उभारणीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाबद्दल मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी यावेळी पशुधनासाठी प्रति पाणी एक उत्तम पर्यायी गोष्टी खाद्य असल्याचे स्पष्ट केले.  तर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी दुग्ध व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या उपायोजना सुचविल्या तसेच सिल्क आणि मिल्क प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योगास जोड म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचे आवाहन केले.

यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री सुनील हटेकर यांनी सिल्क आणि मिल्क प्रकल्पांतर्गत बँकेद्वारे अर्थसहाय्य केले जाते असे नमूद करून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी विशद केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री सदाशिव गीते यांनी रेशीम उद्योगाबाबत त्यांची यशोगाथाही सांगितली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञानी समाधानकारक उत्तरे दिली. सूत्रसंचालन आणि आभार कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी केले.