शिक्षणाचा उपयोग शेतकरी आणि समाजाच्या विकासासाठी व्हावा... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नव्याने स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ आणि समुपदेशन कार्यक्रम दिनांक १० ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी भूषवले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.
उदय खोडके, कुलसचिव
श्री. संतोष वेणीकर, परळीचे तहसीलदार श्री. व्यंकटराव मुंडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
संजीव बंटेवाड, कृषी
व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर पेरके, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे प्रभारी
अध्यक्ष प्रा. सदाशिवआप्पा मुंडे, संचालक श्री. भास्करमामा चाटे, तसेच वैद्यनाथ महाविद्यालयाच्या
प्राचार्या डॉ. अर्चना चव्हाण यांचा समावेश होता.
माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय स्पष्ट
ठेवून त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःसाठी
नाही, तर
शेतकरी आणि समाजाच्या विकासासाठी व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सद्गुणांची जोपासना करत ज्ञानासोबत समाजसेवेची भावना अंगीकारणे महत्त्वाचे
असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे
महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हे शिक्षण केवळ कौशल्यवर्धनासाठीच नाही
तर उद्योजकता विकासासाठी देखील आहे. परळी परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी यांना
याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रभारी अध्यक्ष प्रा. सदाशिव आप्पा मुंडे यांनी महाविद्यालयाला
वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या
शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ संचालक श्री. भास्कर मामा चाटे यांनी विद्यार्थ्यांशी
संवाद साधत, शिक्षणासोबत
आरोग्याची काळजी घेणे आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव
बंटेवाड यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. दिगंबर
पेरके यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.