Tuesday, July 23, 2024

2024-25 केंद्रीय अर्थसंकल्पामधील कृषी ग्रामीण विकासासाठीच्या तरतुदींवर माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची प्रतिक्रिया

2024-25 साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींविषयी प्रतिक्रिया देतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी समाधान व्यक्त केले. 2024 च्या आर्थिक पाहणबाबत बोलतांना लोकसभेत माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्र हे भारत विकासाचे इंजिन म्हणून काम करण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित केले आहे. या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे.  कृषी क्षेत्राचा विकास दर २०२३-२४ या वर्षात १.५ टक्क्यांपेक्षा कमी असण्‍याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्‍या व गेल्‍या ५ वर्षाच्‍या सरासरी विकास दराच्‍या एक तृतीयांश पेक्षा कमी आहे. भारतीय कृषी क्षेत्र हे देशातील ४९.४ टक्के लोकांना जीवन निर्वाहाकरिता आधार देते तर देशाच्‍या सकल देशांतर्गत उत्‍पादनात (जीडीपी) १८.२ टक्के वाटा शेती क्षेत्राचा आहे, असे आर्थिक सर्वेक्षणात म्‍हटले आहे.

अर्थसंकल्‍पात कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्‍यात आली असुन याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या भागीदारीत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार आहे. या डिजिटल फ्रेमवर्कमुळे हवामान अंदाज, पीक सल्लागार सेवा आणि बाजारभाव, शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी यासारख्या महत्त्वाच्या माहिती शेतकरी बांधवापर्यंत त्‍वरित पोहोचण शक्‍य होणार आहे. 400 जिल्ह्यांमध्ये खरीपासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण केले जाणार आहे.

शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी आणि रासायनिक खते आणि कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून लागवडीचा खर्चही कमी करणे शक्‍य आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली जाणार आहे. याकरिता परभणी कृषी विद्यापीठ ही सेंद्रीय शेती संशोधनाव्‍दारे प्रयत्‍नशील आहे. सरकार मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन क्लस्टरला प्रोत्साहन देणार असुन उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि देशभरात भाजीपाला सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे क्लस्टर स्थापन केले जाणार असल्‍याचे घोषीत केले आहे.  

शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी संशोधनावर विशेष भर देण्यात येणार असून जास्त उत्पादन देणाऱ्या बदलत्‍या हवामानास अनुकूल वाण विकसित करण्यावर भर देणार असल्‍याचे घोषित केले आहे. परभणी कृषि विद्यापीठाने बदलत्‍या हवामान अनुकूल अनेक वाण विकसित केले असुन येेणा-या काळात यावर अधिक भर दिला जाईल. 

तेलबियांचे उत्पादन, साठवण, विपणन मजबूत केले जातील. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. शेती संशोधनासह विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. यात तरुणांसाठी कौशल्य विकास, शिक्षा, कृषी आणि रोजगार क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीय करण्यात आलंय. कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कृषि सिंचन पध्‍दती, जल व्यवस्थापन आणि अन्न प्रक्रिया यावर भर देत आहे. या अर्थसंकल्‍पामुळे यास बळकटी मिळेल. संशोधनाकरिता विद्यापीठातील कुशल मनुष्‍यबळाची आवश्‍यकता असुन विद्यापीठातील अनेक पदे रिक्त आहेत आणि या रिक्त जागा भरण्यासाठी शासन व विद्यापीठ प्रयत्नशील आहे. कृषि विद्यापीठे ही एकात्मिक शेती पध्‍दती आणि कृषी संलग्न उद्योगधंदे विकासावर भर देत असुन याचा लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. विद्यापीठात मोठ्या शेततळ्यांद्वारे पाण्याचा वापर करण्यावर भर देण्याचे काम सुरू केले आहे, कृषि यांत्रिकीकरण आणि स्वयंचलित तंत्रज्ञानावर संशोधन कार्य चालु आहे. तसेच अन्न प्रक्रिया साठी परभणी विद्यापीठात इन्क्युबेशन केंद्र सुरू केले आहे, ज्यास अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यमान अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे कृषी क्षेत्राला फायदा होईल. भविष्‍यात कृषी संशोधन आणि विकासासाठी अधिक तरतुदींची आवश्यकता असल्‍याचे ते म्‍हणाले.

Saturday, July 20, 2024

वनामकृविद्वारा शेतीकामातील महिलांचे श्रम बचतीच्या अवजारांचे संसाधन केंद्र स्थापन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील भाकृअप - केंद्रीय कृषिरत महिला संस्थान अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प- कृषिरत महिला या योजनेद्वारे महिला उपजीविका सुरक्षितताद्वारे सक्षमीकरण आणि शेतीशी निगडीत श्रम बचतीचे अवजारे संशोधनाचे कार्य सुरु आहे.  या योजने अंतर्गत परभणी तालुक्यातील पोखर्णी आणि दैठणा ही दोन गावे दत्तक घेण्यात आलेली आहेत. या गावामध्ये कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे व त्यांच्या कुटुंबाचे सक्षमीकरणाचे कार्य मागील काही वर्षापासून सुरू आहे. या कार्यास अधिकची बळकटी देण्यासाठी केंद्रीय कृषिरत महिला संस्थानच्या संचालिका माननीय डॉ. मृदुला देवी यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिनांक १९ जुलै रोजी परभणी येथे भेट दिली. दरम्यान त्यांनी परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृ.) आणि दैठणा या गावात भेट देऊन प्रकल्पाच्या कामकाजाची पहाणीसाठी दौरा केला. यावेळी योजनेतील लाभार्थी महिलांनी अतिशय उत्साहाने संचालिका डॉ. मृदुला देवी यांचे पारंपरिक पद्धतीने उत्सहात स्वागत केले व मुक्ता कच्छवे या विद्यार्थीनींने त्यांचे चित्र रेखाटून त्यांना भेट दिले. यावेळी केंद्रीय समन्वयिका डॉ. सुनिता काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड, डॉ. सुनिल जक्कावाड,  डॉ. जयश्री रोडगे. दैठणाचे सरपंच सौ. उज्वला कच्छवे व पोखर्णीचे सरपंच श्रीमती कौशल्या येडके आदींची उपस्थिती होती.

पोखर्णी व दैठणा येथे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प- कृषिरत महिला या योजनेअंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड यांनी विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी यांच्या सहकार्यातून स्थापित करण्यात आलेल्या शेतीकामातील महिलांचे श्रम बचत अवजारे तसेच उपजीविका सुरक्षितताद्वारे  सक्षमीकरणसाठी आणि  विकसित पोष्टिक पदार्थांच्या फलक यांच्या संसाधन केंद्रांचे उद्घाटन संचालिका डॉ. मृदुला देवी यांच्या हस्ते करण्यात आले. या संसाधन  केंद्रातील अवजारे व साधने शेतकरी महिलांसाठी शेतीकामातील कष्ट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या साधनाद्वारे महिलांचे शेतीकामातील श्रमाची व वेळेची बचत होणार आहे. यावेळी दोन्हीही गावामध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये पोखर्णी येथे मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते तसेच  वाचनासाठी घाडीपात्रिका आणि पुस्तके तसेच प्रशिक्षित शेतकरी महिलांनी बनवलेल्या भरडधान्याच्या खाद्य उत्पादनाचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मृदुला देवी, म्हणाल्या की, महिलांनी केवळ घरकामातच गुंतून न राहता उद्योगाकडे वळावे व स्वावलंबी बनावे, यासाठी योजनेद्वारे विविध उपजीविकेच्या सुरक्षा घटकांचा अवलंब करून आपले सक्षमीकरण साधण्यासाठी प्रेरित केले. तसेच त्यांनी शेतकरी महिलांशी कृषी आणि संबंधित क्षेत्रांमधिल अडचणी बद्दल विचारणा करून संवाद साधला. तसेच प्रकल्पातंर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित शेतीकामातील सुरक्षिततेसाठी ५००० हातमोजे तयार करुन शेतकरी महिलांना उपलब्ध करुन देवून व त्यामध्यमातून आर्थिक उन्नती साधणाऱ्या श्रीमती शीतल कच्छवे आणि अपर्णा कच्छवे यांचे व योजनेतील शास्त्रज्ञांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमात योजनेच्या घटक समन्वयिका डॉ. सुनिता काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञा डॉ. नीता गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

या प्रसंगी योजनेतील लाभार्थी, श्रीमती गंगुबाई कच्छवे, श्रीमती शीतल कच्छवे, श्रीमती वैशाली गायकवाड, श्रीमती सोनाली गायकवाड, श्रीमती समीना शेख, यांनी प्रकल्पामुळे त्यांना झालेल्या फायदा व त्यांनी विकसित केलेले जिवनकौशल्य या विषयी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात उपसरपंच श्रीमती राधाबाई वाघ, देवस्थानचे अध्यक्ष श्री मंचकराव वाघ, अंगणवाडी शिक्षिका अश्विनी वाघ, सीआरपी गायत्री पुजारी, अंजना लोखंडे, तसेच पोखर्णी येथे २०० महिलांनी तर दैठणा येथे २५० महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग प्रोफेशनल्स श्री. प्रसाद देशमुख, नवाल चाऊस, संध्या शिंदे आणि अयोध्या गायकवाड, अमेर तसेच पोखर्णी येथील नृसिंह मंदिर संस्थान कर्मचारी, दोन्ही गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावातील सीआरपी, अंगणवाडी शिक्षिका, बचतगट अध्यक्ष्या यांनी  पुढाकार घेतला.












वनामकृविच्या ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

 शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ल्यांची नितांत गरज.... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय  व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रॉपसॅप प्रकल्प कीटकशास्त्र विभाग अंतर्गत ऑनलाईन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा तिसरा भाग मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ जुलै  रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० दरम्यान संपन्न झाला. यावेळी  लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, छत्रपती संभाजीनगर विभागाचे डॉ. तुकाराम मोटे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी ऑनलाईन कृषि संवादास तीनशे पंधरा अशा बहुसंख्येने शेतकरी, शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ल्यांची नितांत गरज आहे, त्यांना प्रत्येक आठवड्यातील हवामान बदल आणि वेळेनुसार पिकांची किडी, रोग, तण यापासून संरक्षणासाठी आणि आंतरमशागत, खत, सिंचन, व्यवस्थापनासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात यातूनच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यास नक्कीच मदत होईल असे नमूद केले. तसेच शेतकऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये निसंकोचपणे शेतीविषयक प्रश्न विचारावेत. या प्रश्नांचा आदर करून विद्यापीठातील शास्त्रज्ञ समर्पक निरसन करतील असे नमूद केले तसेच ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने माफक दरामध्ये  सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले. तदनंतर डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा सल्ला दिला. त्यांनी येणाऱ्या आठवड्यामध्ये पर्जन्यमान चांगले असल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा ठेवावा तसेच फवारणी सुद्धा पावसाच्या अंदाजानुसार पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. याबरोबरच पावसाचा अंदाज अचूक घेण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये दामिनी व मेघदूत या ॲपचे डाऊनलोड करून घेण्यास प्रोत्साहित केले.

यानंतर कापूस पीक तज्ञ डॉ अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकातील तण आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले व तणामुळे पिकात होणारी विकृती तसेच उगवणी पूर्व आणि पश्चात तणनियंत्रक औषधाची माहिती दिली   तसेच कापूस पिकातील रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल कीटक शास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कपाशीवरील मुख्य आणि दुय्यम किडीची ओळख, त्यांच्यामुळे होणारे नुकसान व त्यांच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत तुडतुडे आणि फुलकिड्यांची नियंत्रण करण्याची गरज आहे असे नमूद करून मागील वर्षापासून टोबॅको स्ट्रीक या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे शेत, बांध आणि परिसर तणमुक्त ठेवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यासह जळगाव, सांगली, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून शेतकरी बांधव सहभागी झाले होते. त्यांनी सोयाबीनवरील कीड, नियंत्रणासाठी कीटकनाशके, पिकांची योग्य वाढ याबरोबरच खत, तण  व्यवस्थापन यासह सोयाबीन वरील चक्रीभुंगा, सोयाबीनचे पाने पिवळे पडणे, फळबाग आणि हळद पिकातील विविध समस्या बाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचे विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ गजानन गडदे, डॉ.अरविंद पांडागळे, डॉ. बसवराज भेदे, डॉ. कैलास डाखोरे. डॉ. अनंत बडगुजर, यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. या कार्यक्रमात सर्व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, क्षेत्रीय कृषि अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, रावेचे विद्यार्थी आणि बहुसंख्येने कृषि शेतकरी बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.



Thursday, July 18, 2024

वनामकृवि आणि भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थानचा राजस्थानच्या सिंघवी सेल्स कार्पोरेशन सोबत सामंजस्य करार

 महिलासाठी श्रम बचतीच्या साधनांच्या बळकटीकरणासाठी करार लाभदायक... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


महिलांचा शेती कामामध्ये लक्षणीय सहभाग असून त्यांना काम करतानाचे श्रम कमी होण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प - कृषिरत महिला या योजनेद्वारे   संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी श्रम बचतीचे विविध साधने विकसित केलेली आहेत. या साधनापैकी दूध काढण्यासाठीची घडवंची आणि तिपाई तयार करून बाजारामध्ये विक्रीसाठी सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गतच्या केंद्रीय कृषिरत महिला संस्थान यांनी राजस्थानमधील उदयपूर येथील सिंघवी सेल्स कार्पोरेशन सोबत दिनांक १८ जुलै रोजी सामंजस्य करार विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली केला. सदर करारामुळे दूध काढण्याची घडवंची आणि तिपाई उत्पादन कार्पोरेशनद्वारे करण्यात येईल व ते शेतकऱ्यांना खरेदीसाठी सहज उपलब्ध होईल. या करारावरती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, केंद्रीय कृषिरत महिला संस्थांच्या संचालक डॉ. मृदुला देवी आणि कार्पोरेशनचे संचालक श्री. दीपक सिंघवी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ स्मिता सोलंकी, उप विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आदींची उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, महाराष्ट्रातील महिला मेहनती आणि सक्षम आहेत. त्यांचे शेती विकास, खेळ, सांस्कृतिक क्षेत्रासह कुटुंबाच्या दैनंदिन जीवनमानात आणि विकासात महत्त्वाचे स्थान आहे. तसेच पुरुषांची आणि महिलांची शारीरिक रचना वेगवेगळी असून श्रमशक्ती वेगवेगळी असते. याकरिता महिलांना शेतीमध्ये काम करताना त्यांच्या श्रमाची बचत करून त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प कृषिरत महिला योजनेद्वारे विविध उपयुक्त साधने संशोधनातून विकसित केलेली आहेत. ही साधने शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चात आणि वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. यातील दूध काढण्याची घडवंची आणि तिपाई यामुळे दूध काढताना शेतकरी महिला व पुरुषांचे श्रम कमी होवून दूध काढते वेळी जनावरांनी लाथ मारून दुधाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. हे साधन कार्पोरेशन द्वारे उत्पादित करून शेतकऱ्यांना सहज विकत मिळणार असून महिलांसाठी विकसित श्रम बचतीचे इतर साधनांचे कार्पोरेशन आणि उद्योगाद्वारे उत्पादन प्रक्रियेस बळकटीकरणासाठी हा सामंजस्य करार लाभदायक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी केंद्रीय कृषिरत महिला संस्थानच्या संचालक डॉ. मृदुला देवी म्हणाल्या की, शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये महिला कामगार जवळपास ३८ टक्के आहेत. या महिलांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने तसेच श्रमाची बचत करण्यासाठी देशातील विविध राज्यातील समन्वयित प्रकल्पांतर्गत संशोधन करून साधने विकसित केली जात आहेत. याबरोबरच पाच वेगवेगळ्या प्रकल्पाद्वारे देशातील सर्व पर्यावरण क्षेत्रातून जवळपास ७० हजार महिला शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यात येणार असून त्यातील निष्कर्षावर संशोधनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. परभणी येथील समन्वयित प्रकल्पाने अनेक उपयुक्त साधने विकसित केली आहेत. यातील दूध काढण्यासाठीची घडवंची आणि तिपाई राजस्थान मध्ये अतिशय लोकप्रिय आहे म्हणून याची उपलब्धता राजस्थान सह संपूर्ण देशात होण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात येत आहे. याबरोबरच प्रकल्पातील सर्व संशोधनयुक्त साधने उद्योगाद्वारे सामंजस्य करार करून उत्पादित करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे नमूद केले. 

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाचे संशोधन कार्य, बीजोत्पादन, विद्यापीठाचे क्षेत्र विकास तसेच राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले विद्यापीठाचे विविध वाणाबद्दल तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठाचा इतिहास आणि शैक्षणिक कार्याची माहिती दिली.

सामंजस्य कराराची प्रस्तावना समन्वयित प्रकल्पाच्या घटक समन्विका डॉ. सुनिता काळे यांनी केली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड आणि यंग प्रोफेशनल श्री प्रसाद देशमुख लिखित श्रीअन्न ग्राम योजना आणि शेतकरी महिलासांठी उपजीविका सुरक्षितता या दोन घडीपत्रिकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयश्री रोडगे, डॉ. सुनीलदत्त जक्कावाड आणि सर्व यंग प्रोफेशनल उपस्थित होते.

घडवंची  


तिपाई






The VNMKV and Central Institute for Women in Agriculture, Bhubaneswar has signed a Memorandum of Understanding (MoU) with Singhvi Sales Corporation of Rajasthan.

The agreement is beneficial for the empowerment of drudgery reducing tools for women... Honorable Vice-Chancellor Dr. Indra Mani.

Women have a significant role in agricultural work, and in order to reduce their drudgery, the All India Coordinated Research Project on Women in Agricultural at Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani has developed various drudgery reducing tools for farmers through research. Among these tools, a revolving milking stand and stool  have been developed and made readily available for sale in the market. To facilitate this, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani and the ICAR - Central Institute for Women in Agriculture, Bhubaneswar, Odisha, signed a Memorandum of Understanding with Singhvi Sales Corporation, Udaipur, Rajasthan, on July 18 under the chairmanship of the Honorable Vice-Chancellor Dr. Indra Mani. As a result of this agreement, the production of the revolving milking stand and stool will be undertaken by the corporation, making them easily available for purchase by farmers. The agreement was signed by Dr. Khizer Baig, Director of Research, VNMKV, Dr. Mridula Devi, Director of the Central Institute for Women in Agriculture, and Mr. Deepak Singhvi, Director of the Corporation. Present at the occasion were Dr. Uday Khodke, Director of Instruction, , Dr. Bhagwan Asewar, Director of Extension Education, Dr. Jaya Bangale, Associate Dean, Dr. Smita Solanki, Head of Department, and Dr. Dayanand Tekale, Associate University Engineer.

In his presidential speech, Honorable Vice-Chancellor Dr. Indra Mani stated that the women of Maharashtra are hardworking and capable. They hold an important place in agricultural development, sports, cultural fields, and the daily life and development of their families. Additionally, the physical structure and drudgery capacity of men and women are different. Therefore, to save drudgery and maintain the health of women working in agriculture, the All India Coordinated Research Project for Women in Agriculture, VNMKV has developed various useful tools through research. It is essential that these tools reach farmers cost-effectively and timely. Among these, the revolving milking stand and stool are extremely useful tools for reducing drudgery for both men and women while milking, and they help prevent the loss of milk due to animals kicking during the process. This tool will be produced by the corporation and made readily available for purchase by farmers. They expressed that this Memorandum of Understanding will be beneficial for strengthening the production process of other drudgery reducing tools developed for women through collaboration with corporations and industries.

On this occasion, Dr. Mridula Devi, Director of the Central Institute for Women in Agriculture, stated that nearly 38% of the laborers working in agriculture are women. To enhance the efficiency of these women and save their drudgery, tools are being developed through research under coordinated projects in various states of the country. Along with this, around 70,000 women farmers from all ecological zones of the country will be studied through five different projects, and the direction of the research will be determined based on the conclusions drawn from this study. The coordinated project in Parbhani has developed many useful tools. Among these, the revolving milking stand and stool are very popular in Rajasthan, and hence, this agreement is being made to ensure their availability throughout Rajasthan as well as the entire country. Additionally, all research-based tools from the project will be produced through industrial agreements and made accessible to farmers, as noted.

On this occasion, Dr. Khizer Baig, Director of Research, provided information about the university's research activities, seed production, field development, and the various nationally acclaimed varieties developed by the university. Dr. Uday Khodke, Director of Instruction, shared the history of the university and its educational activities.

The introduction to the Memorandum of Understanding was presented by Dr. Sunita Kale, Unit Coordinator of the Coordinated Project. During the event, two brochures titled "Shrianna Gram Yojana" and "Livelihood Security for Women Farmers," authored by Senior Scientist Dr. Neeta Gaikwad and Young Professional Mr. Prasad Deshmukh, were released by the dignitaries. Present at the occasion were Honorable Vice-Chancellor's Technical Officer Dr. Praveen Kapse, Senior Scientist of the Project Dr. Jayashree Rodge, Dr. Sunildutt Jakkawad, and all Young Professionals.

Saturday, July 13, 2024

ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात

सद्यस्थितीत सोयाबीन पिकातील कीड व तण व्यवस्थापनावर शास्त्रज्ञांचे  मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालकाच्या पदावर नुकतेच रुजू झालेले डॉ. भगवान आसेवार यांच्या संकल्पनेतून झाली असून दिनांक १२ जुलै रोजी कार्यक्रमाचा दुसरा भाग संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी, पिकांमध्ये हवामान बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव कशाप्रकारे वाढतो, याचा अभ्यास करून त्याच्या नियंत्रणासाठी सोप्या पद्धतींच्या शिफारशी देण्याचे निर्देश शास्त्रज्ञांना दिले. तसेच शेतकऱ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा आणि दोन्ही बाजूने संभाषण ठेवून आपले शेती संबंधी प्रश्न विचारावेत. यातून संशोधनाची दिशा ठरवून उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत मिळेल. याबरोबरच अनेक प्रकारे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल. नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आणि शासनाच्या शेतीउत्पनात घट येते असा दुहेरी तोटा होतो. याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, कृषि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपातळीवरील कार्य करणाऱ्या विस्तार कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्र राज्यास नुकताच केंद्राचा उत्कृष्ट कृषि राज्य म्हणून बहुमान मिळाला आहे. हा बहुमान स्वीकारण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी हा बहुमान दिल्ली येथे एका मोठ्या समारंभात स्वीकारला. या समारंभात मी सहभागी झालो होतो. या  समारंभातील क्षणांचे वर्णन करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी स्पष्ट करून हा कार्यकम आठवड्यातून एक दिवस सायंकाळी ७.०० वाजता ऑनलाइन आयोजित केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार आणि वेळेत माहिती मिळणार असल्याचे नमूद केले.

तांत्रिक मार्गदर्शनामध्ये सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा पुढच्या पाच दिवसाचा सविस्तर तर पुढील पंधरा दिवसाचा पावसाचा अंदाज दिला. तसेच जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल म्हणून पिकामध्ये पाणी साचणार नाही याची आणि जनावरांना चिखलामुळे रोग होवू नयेत म्हणून त्यांचीही काळजी घ्यावी असे नमूद केले.

तदनंतर कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी पीक उगवणी पश्चात  तण व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, पेरणी नंतर पहिल्या ४५ दिवसात तणाची आणि पिकांची अन्नद्रव्य, पाणी, जागा यासाठी स्पर्धा होत असते, म्हणून या काळात तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोळपणी, निंदणी सारख्या पारंपारिक पद्धती सोबतच विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तणनाशकाचा अवलंब करावा आणि तणनाशक फवारताना किमान १५० ते २००  लिटर पाणी एकरी वापरण्याचा तसेच तणनाशक वापरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला. यानंतर सोयाबीन मधील किडी यांच्या नियंत्रणासाठी डॉ. राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन करताना विविध उपायोजना सुचविल्या.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक आणि कृषि विभागाचे अधिकारी बहुसंखेने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन  विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले तर आभार उपसंचालक डॉ. सुर्यकांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, संगणक कार्यालयाचे डॉ. संतोष  फुलारी, श्री.   डि. व्ही.  इंगळे, श्री. योगेश मात्रे आणि श्री खंदारे यांनी पुढाकार घेतला.

Thursday, July 11, 2024

पदव्युतर कृषि अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न





पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेद्वारा पदव्युतर पदवी कृषि अभ्यासक्रमाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक १० जुलै रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी आभासी माध्यमाद्वारे भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे होते तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सय्यद  इस्माईल, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे आणि जिमखाना उपाध्यक्ष,  डॉ. पुरूषोत्तम झंवर आदींची उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आभासीमाध्यमाद्वारे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी साठी फक्त एमसीएइआरची तयारी न करता आयसीएआर च्या परीक्षेचीपण तयारी करून एसआरएफ  मिळवावी व भारतातील  इतर राज्यातील नामांकित विद्यापीठामध्ये देखील पदव्युत्तर पदवी साठी प्रवेश मिळवावा असे आव्हान केले. तसेच संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके म्हणाले की, इतर विद्यापीठ्यांच्या मानाने या विद्यापीठात संसाधने किंवा भौतिक सेवा सुविधा, संशोधनासाठी लागणारे साहित्य व उच्च शिक्षित प्राध्यापक हे उपलब्ध आहेत. याबरोबरच विद्यार्थी कठोर परिश्रम करतात आणि अशा परीक्षांमध्ये यश मिळवतात हे अभिमानास्पद आहे, त्यामुळेच राज्यस्तरावर परभणीची ओळख निर्माण होत आहे, असे प्रतिपादन केले.

या नंतर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद  इस्माईल हे विद्यार्थीच्या यशाबद्दल अभिमान असल्याचे म्हणाले. या महाविद्यालयाचे विद्यार्थी २०१८ या वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहेत आणि यापुढेही हि परंपरा ते नक्कीच सुरु ठेवतील. त्यांचा सत्कार करणे आणि त्यांचे कौतुक करणे ही आमची जबाबदारी आहे असे नमूद केले. तसेच प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम झंवर, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, सहयोगी प्राध्यापक डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आलेला विद्यार्थी निखिल पाडोळे व इतर ३० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नरेंद्र कांबळे व डॉ. अनुराधा लाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संजना भांडारवार व कु. गायत्री खोडके या विद्यार्थीनिनी केले. कार्यक्रमास सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.