Thursday, August 27, 2026

वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्रास कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन व विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी केसर आंबा गुणवत्ता केंद्रात नवीन ट्रॅक्टर व कृषि अवजारांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. आधुनिक कृषि यंत्रसामग्रीचा वापर वाढवून फळपिकांमधील उत्पादनक्षमता, कार्यक्षमता व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने अशा सुविधांचे महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

माननीय कुलगुरूंनी फळ संशोधन केंद्रातील विविध प्रक्षेत्रे, संरक्षित शेतीविषयक सुविधा तसेच संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची पाहणी केली. केंद्रामार्फत सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रभावी प्रसार करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही फळ संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रातील संशोधन कार्याचा आढावा घेतला. विविध फळपिकांवरील संशोधन, तंत्रज्ञान विकास, प्रक्षेत्रावरील उपक्रम आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशा याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील तसेच केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



कृषिच्या शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर; कृषि अभियंत्यांचे ३८ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू, दोन दिवस विविध तांत्रिक सत्रे

कृषि अभियांत्रिकीच्या माध्यमातून शाश्वत व अचूक शेतीला चालना देणे काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजितद इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – ३८वे राष्ट्रीय कृषि अभियंता अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद’ यास गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झाली.शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ ही परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना असून, देशभरातून सुमारे ५०० शेतकरी आणि १०० संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्र आणि एमआयटी यांच्या वतीने दिनांक २७ व २८ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्राचे अध्यक्ष अभियंता विजय कांबळे, आयईआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता मनीष कोठारी, कृषि अभियांत्रिकी विभागीय मंडळाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) नेमीचंद्रप्पा एम., एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा आणि अधिवेशनाचे निमंत्रक प्रा. (डॉ.) दीपक त्र्यंबक बोरनारे उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अधिवेशनात शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Emerging Technologies in Agricultural Engineering for Sustainable and Climate-Resilient Development) या विषयावर विशेष बीजभाषण (State-of-the-Art/Keynote Lecture) दिले. ते म्हणाले की, अभियांत्रिकी हे भविष्यातील कृषि विकासाचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे क्षेत्र असून, कृषि अभियांत्रिकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. २१व्या शतकातील अभियंत्यांना कृषि क्षेत्रासोबतच जैवशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शेतकरी आणि विद्यार्थी हे कृषि क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करून माननीय कुलगुरूंनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातशेतकरी देवो भव’ या भावनेतून शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याला, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. युवक हे राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख आधार असल्याने विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक आहे.

भविष्यातील शेतीसाठी अचूक व शाश्वत शेती (Precision and Sustainable Agriculture) यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. अचूक शेतीमुळे नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ आणि पर्यावरणीय शाश्वतता साध्य करता येते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास न करता ती पुढील पिढीकडे अधिक सक्षम स्वरूपात सुपूर्द करणे हीच विकासाची खरी कसोटी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी यांच्यापृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागवू शकते; मात्र प्रत्येकाची हाव भागवू शकत नाही’ या विचाराचा संदर्भ देत विकासाच्या प्रक्रियेत मानवी गरजा आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधने यांच्यात समतोल राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारताने कृषि क्षेत्रात मोठी प्रगती साधली असून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेपासून विविध कृषि उत्पादनांच्या निर्यातीपर्यंत देशाने मोठी झेप घेतली आहे. मात्र, भविष्यात भाजीपाला व फळपिकांचे उत्पादन वाढविणे, हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाणे आणि शेतीतील जोखीम कमी करणे ही महत्त्वाची आव्हाने आहेत.

शेतकऱ्यांना केवळ तंत्रज्ञान नको, तर त्यांच्या समस्यांचे समाधान देणारे तंत्रज्ञान हवे, असे स्पष्ट करून तंत्रज्ञान विकास हा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडला गेला पाहिजे, असे कुलगुरूंनी सांगितले. प्रभावी आंतरपीक पद्धती, अचूक शेती, हवामान-स्मार्ट तंत्रज्ञान तसेच जोखीम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हवामान बदलामुळे निर्माण होणारी अनिश्चितता ही शेतीतील ‘न्यू नॉर्मल’ ठरत आहे. त्यामुळे कृषि अभियांत्रिकीच्या माध्यमातून हवामान-सक्षम, संसाधन कार्यक्षम आणि शाश्वत शेती विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार तसेच आयईआय यंग इंजिनिअर्स पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेश तुळशीराम ठोकळ यांचे स्मृती व्याख्यान झाले. शुक्रवारी विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि विशेष तांत्रिक कार्यक्रम होणार असून, समारोप सत्रात अधिवेशनातून पुढे आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी अंतिम करण्यात येणार आहेत.

१०० संशोधनपर लेखांचे पाच तांत्रिक सत्रांत सादरीकरण

परिसंवादासाठी देशभरातून सुमारे १०० संशोधनपर लेख प्राप्त झाले असून, त्यांचे पाच तांत्रिक सत्रांमध्ये प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण केले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, अचूक शेती, स्मार्ट सिंचन, कृषि यांत्रिकीकरण, मृदा व जलसंधारण, हवामान बदल, जैवकोळसा, नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत कृषि विकास या विषयांवर तज्ज्ञांकडून मंथन होणार आहे.

वनामकृविच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

राष्ट्रीय परिसंवादास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राहुल रामटेके तसेच फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागी झाले. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी मानवी झा आणि पद्मश्री उगिना यांनीही सहभाग नोंदवून त्यांच्या संशोधनाचे सारांश सादर केले.

कुलगुरूंच्या विशेष व्याख्यानानंतर कृषि अभियांत्रिकीतील भविष्यातील उदयोन्मुख क्षेत्रांवर विशेष चर्चा झाली. अधिवेशनातून हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्य आणि वाढता उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांवर व्यावहारिक व तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांना दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.







वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

वनामकृवितील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग 







महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, क्रीडा विकासाला चालना देणे आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका बळकट करणे, या उद्देशाने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी आभासी माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या लाखो युवकांशी तसेच परभणी जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधला.

यानिमित्ताने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि मेरा युवा भारत (MY Bharat), परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

युवा कनेक्ट’ या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, खेळाडू, युवा नेते, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून भारतातील क्रीडा क्षेत्राचा विकास, युवकांच्या आकांक्षा आणि भविष्यातील संधी याबाबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे सन्माननीय लोकसभा सदस्य मा. खा. श्री. संजय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाइन माध्यमातून अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिल्हा युवा अधिकारी श्री. प्रणित सांगवीकर तसेच टेबल टेनिसमधील राष्ट्रीय विजेते खेळाडू श्री. शिवानंद पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी युवकांना क्रीडा, युवाशक्ती आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांच्या भूमिकेबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमात माननीय केंद्रीय क्रीडामंत्री, माननीय क्रीडा राज्य मंत्री, विविध राज्यांचे माननीय मुख्यमंत्री तसेच देशभरातील विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ  आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी आभासी माध्यमातून सहभागी झाले.

माननीय केंद्रीय क्रीडामंत्री श्री. मनसुख मांडविया यांनी युवकांना योग्य दिशा देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक हे राष्ट्रनिर्माणात योगदान देणारे महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या माध्यमातूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास येईल, असे त्यांनी नमूद केले. युवकांना घडविण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास, उद्योजकता विकास आणि रोजगाराच्या विविध संधींची दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून युवकांना २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी भारतीय खेळाडू तयार करण्याबरोबरच त्यांचा शारीरिक विकास साधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माननीय खासदार श्री. संजय जाधव यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांचा युवकांसाठीचा संदेश महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ‘सशक्त भारत, नशामुक्त भारत’ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही आई-वडिलांची अपेक्षा आपल्या पाल्याने सुसंस्कृत होऊन मोठे अधिकारी व्हावे, अशी असते; मात्र अनेक युवक व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. त्यांना या विळख्यातून बाहेर काढणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. मोबाईलचे अतिवापराचे व्यसनदेखील सध्याच्या काळातील गंभीर समस्या असून, युवकांनी त्यापासून दूर राहावे आणि इतरांमध्येही याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. शरीरसंपदा जपण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळाची आवड जोपासावी, असे त्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकत आहेत. खेळाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येतात; जात-धर्माचा भेद राहत नाही आणि एकोपा वाढतो. त्यामुळे सर्वांनी खेळाला महत्त्व द्यावे, तसेच युवकांनी परस्परांशी अधिकाधिक संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असून, युवकांना योग्य दिशा व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचे घटक असून, देशाचे यश आणि अपयश हे युवकांच्या शक्तीच्या योग्य वापरावर अवलंबून आहे. युवकांकडे मोठी ऊर्जा आणि क्षमता आहे; तिचा योग्य दिशेने उपयोग केला पाहिजे. आजचे युवक भविष्यात देशाची धुरा सांभाळणारे व्यक्तिमत्त्व असतील आणि त्यांच्या हातून देश घडणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात युवा कनेक्ट’च्या माध्यमातून युवकांशी सातत्याने संवाद व समन्वय ठेवणे आवश्यक आहे. यातूनच देश आणि समाजाचे हित साध्य होईल. विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनेही त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी हे केवळ स्वतःच्या भविष्यासाठीच नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीसाठीही महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी सदैव संपर्कात राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना निःसंकोचपणे संपर्क साधता येईल, असे वातावरण विद्यापीठात निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘युवा कनेक्ट’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दृढ नाते असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाची माहिती देताना क्रीडा संस्कृती जपण्यासाठी अभ्यासासोबतच खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धांच्या अनुषंगाने भारताला क्रीडा क्षेत्रात सक्षम करण्याच्या माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. भारतातील पारंपरिक व महत्त्वाच्या खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याची गरज असून, शरीर, मन आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठात शैक्षणिक उपक्रमांसोबतच नशामुक्ती आणि इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सुदृढ आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान एका मैदानी खेळाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे क्रीडा शिक्षक डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले, तर आभार जिल्हा युवा अधिकारी श्री. प्रणित सांगवीकर यांनी मानले.

यावेळी उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेतली. तसेच टेबल टेनिसमधील राष्ट्रीय विजेते खेळाडू श्री. शिवानंद पुरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मॉडरेटर अनुसया कुलथे यांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. बसलिंगाप्पा कलालबंडी, डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ. शंकर पुरी, संगणक प्रभारी अधिकारी डॉ. संतोष फुलारी तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे कक्ष अधिकारी श्री. गजानन गाडेकर, समन्वयक श्री. दीपक खुळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांतील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



















Monday, August 24, 2026

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा कपाशीवरील रसशोषक किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सल्ला


कपाशी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व मावा यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे १६ ते २७ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच योग्य उपाययोजना कराव्यात. अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून जैविक, यांत्रिक व रासायनिक उपायांचा योग्य समन्वय साधत एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विभागात कार्यरत असलेल्या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, क्रॉपसॅप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक तथा कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश मात्रे यांनी दिला आहे.

कपाशीवरील रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाचे निरीक्षण करावे. अंतरमशागत करून शेत तणविरहित ठेवावे तसेच नत्र खताचा संतुलित वापर करावा. रसशोषक किडींना भक्ष्य करणारे ढालकीडे व क्रायसोपा या मित्रकीटकांचे प्रौढ व अळ्या शेतात आढळल्यास त्यांचे संवर्धन करावे आणि शक्यतो कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे, तर फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे हेक्टरी १० ते १२ या प्रमाणात लावावेत. पिठ्या ढेकणाच्या व्यवस्थापनासाठी व्हर्टीसीलीयम लेकॅनी १.१५ टक्के डब्ल्यूपी या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम मात्रा १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

किडींची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी प्रति लिटर पाण्यात फ्लोनीकॅमीड ५० टक्के डब्ल्यूजी ०.२ ग्रॅम किंवा थायमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी ०.२ ग्रॅम किंवा डायफेन्थुरॉन ५० टक्के डब्ल्यूपी १.२ ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के एससी २ मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एससी ३ मिली किंवा टोल्फेनपायराड १५ टक्के ईसी २ मिली किंवा ॲसीफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के एसपी २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के + बुप्रोफेझीन २० टक्के एससी २ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या/नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. तसेच पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबर महिन्यापूर्वी सुरू करू नये. अन्यथा पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार आणि शिफारशीनुसारच कीटकनाशकांचा वापर करून कपाशीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.


पावसात खंड, अष्टसूत्रीद्वारे करा खरीप पिकांचे व्यवस्थापन; संरक्षित सिंचन, जलसंधारण, फवारणीतून अन्न द्रव्यांची फवारणी, तण नियंत्रण, आच्छादनाचा वापराने वाढवा मातीतील ओलावा आणि पिके वाचवा

 वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठा खंड पडला आहे. विविध हवामान संस्थांच्या अंदाजानुसार आगामी काळात जोरदार पावसाची शक्यताही कमी आहे. खरिपातील प्रमुख पिके सध्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत आहेत. त्याचवेळी नेमका पावसाचा खंड पडल्याने, पिकांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पावसाच्या खंड काळात नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले अखिल भारतीय कोरडवाहू प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा लक्षात घ्यावा, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करा आणि प्रत्येक पावसाच्या थेंबाचे संधारण करा या तत्त्वावर पुढील पीक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

१)  शेतातील परिस्थितीचे परीक्षण करा

सर्व शेतांमध्ये एकसारखे व्यवस्थापन करणे योग्य नाही. प्रत्येक शेतातील जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, पिकाची अवस्था, पिकाची वाढ, पाण्याची उपलब्धता आणि पुढील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. शेतातील माती हातात घेऊन तिच्यामध्ये पुरेसा ओलावा आहे का हे तपासावे. पिकाची पाने सकाळच्या वेळी तजेलदार आहेत का, दुपारच्या वेळी पाने वाकतात का, पाने गुंडाळली जात आहेत का, वाढ मंदावली आहे का, फुलगळ होत आहे का, याचे निरीक्षण करा. त्यानुसार पिकांना संरक्षित सिंचन देण्याचा निर्णय घ्या.

२) संरक्षित सिंचन काटेकोरपणे वापरा

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल, शेततळे, कालवा किंवा अन्य सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर करावा. पाण्याचा जास्त ताण बसलेल्या पिंकांसाठी, त्यांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचनाचा वापर करा. सिंचनासाठी शक्यतो, ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करा.

३) पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करा

जो काही पाऊस पडेल त्या पावसाचे पाणी शेतात मुरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेताच्या उतारानुसार जलसंधारणाच्या सऱ्या काढाव्यात, पुढील नियोजनासाठी शक्य तिथे कंपार्टमेंट बंडिंग, समतल बांध बंधिस्ती, सध्या शेततळ्यांचा आणि त्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर, नाला बांध व लघु जलसंधारण येथील पाण्याचा योग्य वापरपावसाचे पाणी शेताबाहेर वेगाने वाहून जाणार नाही याची काळजी घेणे, शेताच्या उतारानुसार योग्य ठिकाणी पाणी अडविण्याची व्यवस्था करावी. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध ओलावा पिकाच्या मुळांपर्यंत टिकवून ठेवा.  या सूत्रानुसार शक्य ते व्यवस्थापन करावे. सर्वात सोपे आणि कमी खर्चाचे तंत्रज्ञान म्हणजे कपाशी, तूर सारख्या अधिक अंतरावरील पिकांत एक ते दोन ओळीनंतर जल संधारण सरी काढावी.

४) तण नियंत्रणाला प्राधान्य

कमी पावसाच्या सध्याच्या परिस्थितीत तण हे पिकांशी पाणी,अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश व जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण केल्यास  मातीतील उपलब्ध ओलावा मुख्य पिकासाठी उपयुक्त ठरतो. सध्या पिकांची अवस्था पाहून खुरपणी आणि कोळपणी करावी. पीक फुलावर असल्यास कोळपणी टाळावी. शक्य तिथे उपट तण करावे.  मजूर उपलब्ध नसल्यास संबंधित पिकासाठी शिफारशीत उगवणपश्चात तणनाशकाचा वापर करावा. पिकांची आणि तणांची  योग्य अवस्था, तणनाशकाची फवारणी करताना एकरी योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरावी आणि यासाठी  पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. जमिनीत ओल असावी. मात्र पिकावर ताण असताना किंवा पाऊस/सिंचनानंतर अति ओलाव्याच्या स्थितीत तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी स्थानिक शिफारशींचे पालन करावे. आता तण नाशक वापरण्याची वेळ अनेक पिकात निघून गेली आहे. हळद, ऊस किंवा फळ पिकात वापर करता येईल. शिफारशी नुसारच तणनाशकांचा वापर करावा.

 ५) आंतर मशागत आणि जमिनीतील भेगा बुजवा

आंतर मशागत करताना पिकांच्या अवस्थेनुसार हलक्या कोळपण्या कराव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, तण नियंत्रण करावे. परंतु जिथे पीक फुलावर असताना कोळपणी करू नये. फळ बागेत यावर भर द्यावा. जमिनीतील भेगा बुजवा पावसाचा दीर्घ खंड पडल्यास विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडू शकतात. या भेगांमधून जमिनीतील ओलावा वेगाने निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून पिकाच्या  योग्य अवस्थेत आंतरमशागत करून पृष्ठभागावरील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

६) एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

पावसातील खंड आणि त्यानंतर मध्यम पाऊस अशा स्थितीत  शेताचे नियमित निरीक्षण करावे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मक्यामध्ये पानांवरील कीड, शेंगा/बोंडांवरील कीड, खोडकिडी या शिवाय रस शोषण करणाऱ्या किडींचे निरीक्षण करावे.

आणि शिफारशी नुसार त्या त्या कीटक नाशकांची किंवा बुरशीनाशकांची  फवारणी कीड किंवा  आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यावर करावी. तसेच रोगांची लक्षणे तपासावीत. कमी खर्चाचे तंत्रज्ञान जसे फेरोमोन सापळे, पिवळे चिकट सापळे, पक्षी थांबे आणि निंबोळी अर्क किंवा इतर जैविक उपायांचा योग्य वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केवळ गरजेनुसार आणि शिफारशीनुसार करावा.

७) आच्छादनाचा वापर

ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे पिकांचे अवशेष जमिनीवर ठेवणे किंवा योग्य आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. आच्छादनामुळे: बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते,जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. यात सोयाबीन पीक भुसा किंवा इतर पिकांचे अवशेष ५ टन प्रति हेक्टरी वापरावे.  किंवा सुबाभूळ, गिरीपुष्प यांचा पाला ३ टन प्रति हेक्टरी आच्छादन म्हणून वापरावे. साधी कोळपणी करून मातीचे आच्छादन करावे.

८)  अन्नद्रव्यांची फवारणी

पावसाचा खंड पडून जमिनीतील ओलावा कमी झाल्यास आणि पिकांची वाढ मंदावल्यास, जमिनीतून अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाच्या अवस्थेनुसार पर्णीय अन्नद्रव्यांची फवारणी करता येते.  पोटॅशियम नायट्रेट (13:00:45): दोन टक्के द्रावण, म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी, फवारणी करता येईल. किंवा 19:19:19 (पाण्यात  विरघळणारे नत्र, स्फुरद, पालाश): एक टक्का द्रावण, म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी, फवारणी करता येईल. 10 लिटर पाण्यासाठी अनुक्रमे 200 ग्रॅम 13:00:45 किंवा 100 ग्रॅम 19:19:19 आवश्यक राहील.  यामुळे काही दिवस पाण्याचा ताण सहन करता येईल. साध्या पाण्याची फवारणी केली तरी  पिके 2 ते 4 दिवस ताण सहन करू शकतील. सध्या हळद, ऊस आणि फळ पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. गांडुळ खत, जैविक खते वापरावीत.

योग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक

पाऊस कमी असला तरी जल संधारणपाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा आधुनिक सिंचन पद्धतीने कार्यक्षम वापर आणि मृदओलावा संवर्धन आपल्या हातात आहे. पुढील पावसाचे पाणी जलसंधारण सऱ्यांद्वारे शेतात मुरवा, उपलब्ध सेंद्रिय अवशेषांनी आच्छादन करा, योग्य वेळी आंतरमशागत करून मातीचे आच्छादन तयार करा, जमिनीतील भेगा बुजवा आणि पिकाच्या अवस्थेनुसार मातीची भर द्यावी. कमी खर्चाच्या जैविक निविष्ठांचा वापर करा आणि फवारणीतून अन्नद्रव्यांची फवारणी करा आणि पिके वाचवा.

 

असा सल्ला विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकार तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड, कनिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे, यंग प्रोफेशनल (वन) श्री. सुरेश खटिंग आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मंगेश राऊत यांनी दिला.

अधिक माहितीसाठी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९५८८६४८२४२ यावर संपर्क साधावा.