स्त्री
पुरूष समानता, जाती निर्मुलन, संसाधनाचे फेरवाटप, धर्म चिकीत्सा, सर्वांसाठी शिक्षण
व आंतरजातीय विवाह ही सूत्रे राष्ट्राच्या उभारणेत मोलाचे मार्गदर्शक असल्याचे
महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारातून स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी अनेक खात्याचे मंत्री म्हणुन काम पाहिले त्यात उर्जा व पाटबंधारे
मंत्री असतांना देशातील पहिल्या पंधरा धरणांची पायाभरणी त्यांच्या काळात झाली.
देशाला 2000 साली जल आणि उर्जेच्या मागणीचे गणित त्यांनी सन 1945 सालीच मांडले.
त्यांची जल नियोजनाची रचना व मांडणी आजही आपणास मार्गदर्शक आहे. सर्वात मोठ्या
लोकशाही देशाचे घटना लिहीणारे डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता याला
महत्व दिले. ज्या ठिकाणी स्वातंत्र, समता व बंधुत्व असते त्याच ठिकाणी सर्व
सामान्यांना न्याय मिळू शकतो असे त्यांचे मत होते असे प्रतिपादन प्रा.हरी नरके
यांनी आपल्या भाषणात केले.
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122 व्या जयंती निमित्त मराठवाडा कृषि
विद्यापीठात दि. 14-04-2013 रोजी पुणे येथील प्रसिध्द विचारवंत प्रा. हरी नरके
यांचे ‘फुले – आंबेडकर
यांचे विचार’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.
किशनरावजी गोरे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे, संशोधन
संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ.
डि. बी. देवसरकर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांची प्रमुख
उपस्थिती होती.
प्रा. हरी
नरके पुढे म्हणाले की, 1938 मध्ये कुटूंब नियोजनाची संकल्पना डॉ. आंबेडकरांनी
मांडली. कुटूंब नियोजन हे सक्तीचे करण्याचा पुरस्कार त्यांनी केला. विद्यार्थ्यांना
शेतीचे शिक्षण सक्तीचे असावे असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी महिला
सक्षमीकरणाचाही पुरस्कार केला. 71 टक्के स्त्रिया शेतामध्ये राबतात परंतु 97
टक्के जमीन ही पुरुषांच्याच नावे आहे. तसेच 93 टक्के घरे ही पुरुषांच्या नावे
असून आजही स्त्रिया समाजात दुर्लक्षीत घटक आहेत. स्त्री-पुरुष समानतेसाठी फुले व
आंबेडकरांचे विचार महत्वाचे आहेत. जाती व्यवस्था हे कामाचे वाटप नसून काम
करणा-यांचे वाटप आहे. हा जाती-जातीचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा फुले व डॉ.
आंबेडकर यांचे विचार समाजासाठी महत्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या
घटनेमध्ये आम्ही भारताचे लोक या वाक्यापासून सुरूवात केलेली आहे. कारण
लोकशाहीमध्ये सामान्य जनताच सार्वभौम असते असे त्यांचे मत होते. डॉ बाबासाहेब
आंबेडकर हे मर्यादीत वर्गांचे नेते संबोधने म्हणजे त्यांचे व्यक्तीमत्व लहान
करण्यासारखे आहे असे विचार प्रा. हरी नरके यांनी आपल्या व्याख्यानात मांडले.
प्रा.
हरी नरके म्हणाले की, शेतक-यांच्या समस्येची जाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा
फुले यांना चांगलीच होती. डॉ. आंबेडकरांनी भारतातील जमीनीची विभागणी व त्यावरील
मार्ग या आपल्या शोध निबंधात शेतीचे तुकडीकरण यावर प्रकाश टाकला आहे. शेती
किफायतशीर करण्यासाठी शेतीवरील बोजा कमी करणे गरजेचे आहे व शेतीला जोडधंद्याची
साथ देणे व नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या शोध
निबंधात मांडले आहे. तसेच महात्मा फुले यांनी शेतक-यांचा असूड या पुस्तकात
शेतक-यांची परिस्थिती यावर प्रकाश टाकला आहे. शेतक-याचा लागवडीचा खर्च सुध्दा
निघत नाही त्यांचे गणित या पुस्तकात मांडले आहे. तलाव, तळे व जलसंधारण यांचे
महत्व त्यांनी त्या काळात मांडले आहे. भारतीय कृषि अर्थशास्त्राचा पाया महात्मा
फुले यांनी रचला तर त्याची सखोल मांडणी डॉ. बाबासाहेबांनी केली. डॉ. आंबेडकर व
महात्मा फुले यांनी त्या काळातच स्पष्ट केले होते की, आधुनिक शिक्षण व
तंत्रज्ञानाच्या आधारे शेती केली तरच शेतकरी यशस्वी होतील.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे म्हणाले की, कोरडवाहु शेती यशस्वी
करावयाची असेल तर जोडधंदे, प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धीत उद्योग याचा विकास
करावा लागेल. जमीन, वीज व जल यांचे समान वाटप होणे आवश्यक आहे. नदी जोड प्रकल्प
ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली संकल्पना आज उपयुक्त वाटते. भविष्यात
यांत्रीकीकरण करावे लागणार असून त्याबाबत शेतक-यांनी प्रशिक्षण घ्यावे. असे त्यांचे
मत होते. महात्मा फुले यांनी शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शन यांचे आयोजन करावे,
यशस्वी शेतक-यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन दिल्यास शेतीमधील
तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होईल असे मत मांडले होते असे सांगीतले. त्या दृष्टीने
काळाची गरज ओळखुन डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या आर्थीक व कृषि क्षेत्रातील
विचारांचा प्रसार व प्रसार करणे गरजेंचे आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास कृषि
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास
विद्यार्थी, प्राध्यापक,
कर्मचारी व नागरीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एच. व्ही. काळपांडे तर
आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. के. टी. आपेट यांनी केले.