Friday, August 16, 2013

‘विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी’ विशेष विस्‍तार कार्यक्रमास प्रारंभ



      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या संकल्‍पनेतून व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या परिश्रमातून विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम संपूर्ण मराठवाडयात 2011 पासून यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. मागील दोन वर्षीचे यश लक्षात घेऊन याही वर्षी हा कार्यक्रम मा. संचालक, विस्‍तार शिक्षण डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठवाडा विभागात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्‍या सहकार्याने राबविण्‍यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी मा. श्री.सोपानरावजी अवचार हे प्रमूख पाहूणे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ.विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, कुलसचिव श्री. का. वी. पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके  उपविभागीय कृषि अधिकारी श्री. पी. एच. मालेगावकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
      याप्रसंगी उद घाटनपर भाषणात मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे म्‍हणाले की, विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांना उपयोगात आले तरच त्‍याला मूल्‍य आहे, मागील दोन वर्ष या कार्यक्रमास शेतक-यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यास गती प्राप्‍त झाली. विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ शिक्षण व संशोधनाची जवाबदारी सांभाळून या विस्‍तार कार्यक्रमात मोलाचा सहभाग देत आहेत. यावर्षी या कार्यक्रमात गृहविज्ञान महाविद्यालय व अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञांचा समावेश करण्‍यात आला आहे. यामूळे शेतकरी महिलावर्गांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रकिया उद्योगावर अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सध्‍या शेतक-यांना किड व रोगाचे व्‍यवस्‍थापण, मृद व जलसंधारण तंत्रज्ञान व येणा-या रबी हंगामाचे नियोजन याबाबत शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्‍त ठरणार आहे.
      याप्रसंगी प्रमूख पाहूणे श्री. सोपानराव अवचार म्‍हणाले की, शेतक-यांना शेतीत अनेक संकटांना सामोरे जावे लागते तसेच हि संकटे अचानक येतात, त्‍या प्रसंगी विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांचे शेतावरील प्रत्‍यक्ष भेट व सल्‍ला मोलाचा ठरतो. हा कार्यक्रम वर्षभर राबविणे आवश्‍यक आहे.
      विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा शेतक-यांच्‍या गरजेवर आधारित काटेकोर विस्‍तार कार्यक्रम असून या कार्यक्रमाची नोंद राजभवनाने सुदधा घेतली आहे. हा कार्यक्रम व्‍यापक व कायमस्‍वरुपी राबविण्‍याचा मानस विद्यापीठाचा आहे.
      उद घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. अनिल गोरे यांनी केले. या प्रसंगी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ व अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येन उपस्थित होते. कार्यक्रम यशसवीतेसाठी डॉ.डि.डी.पटाईत, डॉ.बि.के.आरबाड, श्री.एस.बी.जाधव, श्री. आर.एल.औंढेकर, डॉ.महेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
      विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी या कार्यक्रमामध्‍ये छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रश्‍न–उत्‍तरे अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असून हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण, एकात्मिक शेती पध्‍दती, मृद व जलसंधारण इ. विषयांवर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांची शास्‍त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे.शेतक-यांचे तातडीचे प्रश्‍न आणि शेतक-यांचे समाधान प्रत्‍यक्ष विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञाकडुन होणार आहे. यामुळे शेतक-यांमध्‍ये उमेद निर्मिती होणार आहे. सदरील कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍हयांसाठी 16 ऑगस्‍ट 2013 ते 03 सप्‍टेंबर 2013 कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तथा परभणी येथील विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या मार्फत राबविला जाणार आहे. या दोन जिल्‍हयांसाठी शास्‍त्रज्ञांचे एकूण तीन चमू तयार करण्‍यात आले असुन साधारणता 110-115 गावांत राबविण्‍यात येणार आहे.