Tuesday, September 17, 2013

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनानिमित्‍त आयोजित रबी पीक शेतकरी मेळावा उत्‍साहात संपन्‍न

कृषि प्रदर्शनाचे उद् घाटन 
रबी पीक शेतकरी मेळावाचे उद् घाटन 
रबी पीक शेतकरी मेळावाचे उद् घाटन
उद् घाटक नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार मार्गदर्शन करतांना
मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखीत विविध प्रकाशनाचे विमोचन 
पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री. विजयरावजी कोलते मार्गदर्शन करतांना
वनामकृविचे कुलगूरू मा. डॉ. किशनरावजी गोरे मार्गदर्शन करतांना
माजी कृषि राज्‍यमंत्री मा. श्री सुरेश वरपुडकर मार्गदर्शन करतांना 
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड मार्गदर्शन करतांना 




विद्यापीठाने विकसीत केलेले विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीची सुरूवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घाटन करून करण्‍यात आली

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाचे औचित्‍त साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने 17 सप्‍टेंबर 2013 रोजी रबी पीक शेतकरी मेळावा उत्‍साहात संपन्‍न झाला.
मेळाव्‍याचे उद्घाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक (शिक्षण) मा. डॉ. अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते झाले तर अध्‍यक्षस्‍थानी वनामकृविचे कुलगूरू मा. डॉ. किशनरावजी गोरे होते. प्रमुख पाहुणे म्‍हणुन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री. विजयरावजी कोलते, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड व माजी कृषि राज्‍यमंत्री मा. श्री सुरेशराव वरपुडकर उपस्थित होते.
व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, नियंत्रक श्री ना ज सोनकांबळे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहिम व उपविभागीय कृषि अधिकारी श्री पि.एच. मालेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 मेळाव्‍याचे उद्घाटक मा. डॉ. अरविंद कुमार म्‍हणाले की, देशात महाराष्‍ट्र राज्‍य कृषि शिक्षणात आघाडीवर आहे. सर्वात जास्‍त कृषि महाविद्यालय राज्‍यात असून सर्वात जास्‍त कृषि पदवीधर या राज्‍यात तयार होतात. याचा निश्‍चीतच शेतक-यांना फायदा होत आहे. आजच्‍या मेळाव्‍यात शेतक-यांचा उत्‍स्‍फुर्त  प्रतिसाद पाहुन हे लक्षात येते की, शेतक-यांचे विद्यापीठाशी घनिष्‍ठ नाते आहे. देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण होण्‍यास शेतक-यांचे मोठे योगदान आहे. शेतक-यांनी बिजोत्‍पादनावर भर द्यावा. विद्यापीठातील विविध उपक्रमाचा व तंत्रज्ञानाचा लाभ घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
प्रमुख पाहुणे कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री विजयरावजी कोलते म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञान, शास्‍त्रज्ञांचे प्रयत्‍न व शेतक-यांची अथक मेहनतीमुळे आज आपण अन्‍नधान्‍यात निर्यातदार देश झालो आहोत. देशपातळीवर व राज्‍यात शासनाने शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्यामुळे शेतीचे चित्र बदलत आहेत. शासनाच्‍या योजनांचा अभ्‍यास करुन शेतक-यांनी त्‍याचा फायदा घ्‍यावा. कृषि विद्यापीठाने शेतक-यांच्‍या जीवनामध्‍ये परिवर्तन घडविले आहे. आज विद्यापीठाच्‍या बियाणावर शेतक-याचा मोठा विश्‍वास आहे. अधिक रोजगार देणारा व्‍यवसाय म्‍हणून आजही शेतीकडे पाहिले जाते. कृषि उद्योजकांनी व शेतक-यांनी पुढे येऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शाश्‍वत शेतीसाठी शास्‍त्रज्ञ, शासन व शेतकरी बंधुनी एकत्रीत प्रयत्‍न करावा असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
माजी कुलगुरू मा. डॉ. गोविंदराव भराड म्‍हणाले की, शेतकामामध्‍ये महिलांचा मोठा वाटा असूनही शेतकरी मेळाव्यामध्‍ये शेतकरी महिलांचा सहभाग नगण्‍य आहे तो वाढविणे आवश्‍यक आहे. शेतीत स्‍थैर्य आणण्‍यासाठी फळबाग, फुलशेती, भाजीपाला लागवड केल्‍या शिवाय गत्‍यंतर नाही. प्रत्‍येक शेतक-यांनी शेती नोंदवही तयार कराव्यात, त्‍यातील चांगल्‍या बाबी प्रसिध्‍द कराव्‍यात. त्‍याचा फायदा इतर शेतक-यांना होईल असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
माजी कृषि राज्‍यमंत्री मा. श्री सुरेशरावजी वरपुडकर म्‍हणाले की, शासनाने दुष्‍काळाचे निकष हे पैसेवारी व आणेवारीबरोबर जमीनीतील पाण्‍याच्‍या पातळीवर दुष्‍काळ जाहीर करावा.  कृषि विद्यापीठाने संशोधनामार्फत शेतक-यांना विविध पिकांचे अनेक वाणे व शिफारशी दिल्‍या असुन शेतक-यांचा त्‍याचा निश्‍चीतच फायदा झाला आहे. विद्यापीठाने कापूस वेचणीचे तंत्रज्ञान विकसीत करण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
अध्‍यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे म्‍हणाले की, भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या पाठींब्यामुळे विद्यापीठात शैक्षणीक व संशोधनाच्‍या सुविधा निर्माण झाल्‍या आहेत. कोरडवाहू शेतीमध्‍ये शाश्‍वत उत्‍पादनासाठी संरक्षीत पाण्‍याची व्‍यवस्‍था करणे, एकात्मिक पिक व्‍यवस्‍थापन तसेच एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन सोबतच जोडधंदे, प्रक्रिया उद्योग, मूल्‍यवर्धीत पदार्थ तयार करणे यासह काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा. आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शेतक-यांची प्रगती नाही. शक्‍य असेल तिथे शेतक-यांनी सामुदायीक यांत्रीकीकरण करावे. शेतक-यांनी विद्यापीठातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमास सहभाग घ्‍यावा व विद्यापीठातील संशोधन केंद्रास नियमीत भेटी द्याव्‍यात असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍ताराच्‍या विविध कार्यक्रमाबाबत माहिती दिली. विद्यापीठ शेतक-यांना उभारी देण्‍यासाठी कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केले.  
या प्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखीत विविध प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ.राकेश अहिरे यांनी केले.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक चर्चासत्रामध्‍ये खरीप व रबी पिकातील कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ बी बी भोसले, हरभरा लागवडीवर डॉ डी के पाटील, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे, गहु लागवडीवर डॉ व्‍ही डी सोळुंके, रबी पिकावरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ डी एन धुतराज व डॉ ए पी सुर्यवंशी, हरितगृहांतर्गत फुलशेती व भाजीपाला लागवडीवर डॉ एस डी जेटुरे, कोरउवाहु फळझाडांची लागवडीवर प्रा डी एम नाईक, रबी हंगामातील भाजीपाला लागवडीवर डॉ व्‍ही एस खंदारे, पुर्व हंगामी उस लागवडीवर डॉ पी ऐ पगार व डॉ आनंद गोरे, शेतीपुरक दुग्‍धव्‍यवसायावर डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ के आर कांबळे, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ अशोक जाधव, डॉ मदन पेंडके, डॉ एस बी पवार, डॉ के टी जाधव, प्रा ए व्‍ही गुट्टे, डॉ एच के कौसडीकर, डॉ डी जी मोरे व प्रा आर बी क्षीरसागर यांनी शेतक-यांच्‍या शेती विषय विविध शंकाचे समाधान केले. सदरील मेळाव्‍यास शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
आयोजित कृषि प्रदर्शनातील विविध नामांकित कंपन्‍याचे व विद्यापीठ प्रसारीत तंत्रज्ञान, विविध पिकांच्‍या वाणांचे तसेच शेतक-यांना उपयुक्‍त असे अवजारांची दालनांना शेतक-यांनी मोठ्या संख्‍येने भेटी दिल्‍या. प्रदर्शनांतर्गत सार्व‍ज‍निक-खाजगी भागीदारी तत्‍वावर आधारीत कृषि अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व झेन नॅचरल अग्रो प्रा. लि. यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सुरु असलेल्‍या प्रकल्‍पांतर्गत उत्‍पादीत विविध फळ प्रक्रिया पदार्थाच्‍या नाविन्‍यपुर्ण दालनास शेतक-यांचा व बचत गटाच्‍या सदस्‍यांचा विशेष प्रतिसाद होता.
विद्यापीठाने विकसीत केलेले विविध रबी पिकांच्‍या बियाणे विक्रीची सुरूवात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घाटन करून करण्‍यात आली. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्राची सुरूवात, ग्रीष्‍म वसतीगृह व विद्यापीठ ग्रं‍थालयाच्‍या नुतनीकरणाचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. शेतक-यांसाठी शिवार फेरीचे आयोजन देखिल करण्‍यात आले होते.   
मान्‍यवरांनी विद्यापीठामधील विविध नाविण्‍यपुर्ण कार्यरत असलेले उपक्रम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, पिंगळगडनाला सिंचन प्रकल्‍प, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालायातील फळ प्रक्रिया प्रकल्‍प तसेच गृहविज्ञान महाविद्यालय इत्‍यादींना भेटी दिल्‍या.