वनामकृविच्या मध्यवर्ती रोजगार
मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने
आण्विक कृषि व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संधी याविषयावर मुंबई येथील भाभा
अणुसंशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अशोक बडिगंनवार यांच्या व्याख्यानाचे
आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थ्यी
कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कक्षाचे सहअध्यक्ष डॉ एच व्ही काळपांडे आदींची व्यासपीठावर
प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ अशोक
बडिगंनवार म्हणाले की, कृषि संशोधनामुळेच देश आज 250 दशलक्ष मे. टन पेक्षा जास्त
अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष गाठु शकला. भाभा अणुसंशोधन केंद्राने आण्विक
तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेले विविध पिकातील अनेक उपयुक्त वाण देशातील
शेतक-यांमध्ये प्रचलित झाले आहेत. आण्विक कृषि व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नौकरीच्या
अनेक संधी कृषी पदवीधरांना आहेत, परंतु या क्षेत्राबाबत विद्यार्थ्यी अनभिज्ञ
आहेत. यावेळी त्यांनी देशातील व विदेशातील विविध संस्थेच्या वतीने देण्यात
येणा-या शिष्यवृत्त्याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात शिक्षण
संचालक डॉ विलास पाटील म्हणाले की, विद्यापीठस्तरावर स्थापन करण्यात आलेला मध्यवर्ती
रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष अधिक बळकट करून कृषि पदवीधरांना रोजगाराच्या विविध
संधीचे दालन उपलब्ध करून देण्यात येईल. कार्यक्रमात प्रमुख पाहुणाचा अल्प परिचय
डॉ एच व्ही काळपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले
तर आभार भागवत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी
व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.