Friday, June 1, 2018

वनामकृविचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन मा. डॉ. अशोक ढवण यांची नियुक्‍ती


परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी दिनांक 31 मे रोजी डॉ अशोक श्रीरंगराव ढवण यांची महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यपीठाचे कुलपती माननीय श्री चे. विद्यासागर राव यांनी नियुक्‍ती केली. विद्यमान कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांचा कार्यकाळ दिनांक 31 मे रोजी संपत आहे. मा. डॉ अशोक ढवण विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सध्‍या बदनापुर (जिल्‍हा जालना) येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य पदावर काम करीत असुन त्‍यांची नियुक्‍ती पाच वर्षांच्‍या कार्यकाळासाठी अ‍थवा ते वयाची 65 वर्ष पुर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर होईल या कालावधीकरिता करण्‍यात आली आहे. डॉ अशोक ढवण हे परभणी कृषि महाविद्यालयाचे पदवीधर असुन मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्‍त्र या विषयात एम. एस्‍सी. (कृषी) व पीएच. डी. पदवी त्‍यांनी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्‍था येथुन प्राप्‍त केली आहे. त्‍यांनी यापुर्वी विद्यापीठात प्रभारी विस्‍तार शिक्षण संचालक व शिक्षण संचालक यापदावर कार्य केले असुन त्‍यांना अध्‍यापन, विस्‍तार शिक्षण व संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दिनांक 1 जुन रोजी ते कुलगुरूपदाचा पदभार स्‍वीकारणार आहेत.